बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम भव्यदिव्य होईल ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा
मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची घोषणा मी नागपूर येथील अधिवेशनामध्ये केली होती. यानुसार २३ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनामध्ये या तैलचित्राच्या अनावरणाचा भव्यदिव्य स्वरूपात कार्यक्रम होईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्त राहुल नार्वेकर यांनी १८ जानेवारी या दिवशी विधानभवनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘सायंकाळी ६ वाजता तैलचित्राचे अनावरण होईल. बाळासाहेबांची वेगवेगळे हावभाव असलेली ३-४ तैलचित्रे काढण्यात येत आहेत. विधीमंडळ सभागृहासाठी उचित असलेल्या तैलचित्राची त्यातून निवड करण्यात येईल. ही निवडप्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक होईल. महाराष्ट्रातील केंद्रातील मंत्री, विधीमंडळाचे सर्व सदस्य, तसेच सर्व मान्यवर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्र आणि देश यांची सेवा केली, त्यांचा गौरव म्हणून हे तैलचित्र लावण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अराजकीय आहे.’’