बोगस खतनिर्मिती करणार्या आस्थापनांना कृषी यंत्रणा पाठीशी घालत आहे !
|
सोलापूर – बोगस रासायनिक खतनिर्मिती करणारी आस्थापने आणि विक्रेते यांच्यावर ठोस कारवाई न करता केवळ काही दिवसांसाठी परवाने रहित केले जातात. या विरोधात ‘प्रहार जनशक्ती संघटने’च्या वतीने २६ जानेवारी या दिवशी कृषी आयुक्तालय येथे आंदोलन करण्याची चेतावणी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी खुपसे यांनी सांगितले की,
१. रासायनिक आस्थापने, कृषी खतांचे दुकानदार आणि कृषी विभाग यांची साखळी आहे. प्रत्येक जिल्ह्यात बोगस खतांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यातून शेतकर्यांची फसवणूक होत असून पंचनामे करणारी कृषी यंत्रणाही रासायनिक आस्थापनांना पाठीशी घालत आहे.
२. बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे बोगस रासायनिक खताचा कारखाना आढळल्याने पोलिसांनी त्यावर गुन्हा नोंद केला; मात्र कृषी विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. सावळेश्वर येथील शेतकर्यांनी द्राक्ष बागेवर औषधाची फवारणी केली; पण यामुळे द्राक्षे बागच जळून गेली. आस्थापनांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घातले जाते. असे अनेक अपप्रकार सोलापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांत समोर आले आहेत. याविषयी शासनाने संबंधित आस्थापनांवरच थेट कारवाई करावी.