श्री भराडीदेवी (मालवण) आणि श्री देव कुणकेश्वर (देवगड) यात्रांच्या नियोजनाचा आराखडा सिद्ध करा !
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकार्यांच्या सूचना
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी आणि महाशिवरात्रीला होणारी देवगड तालुक्यातील स्वयंभू श्री देव कुणकेश्वर या देवतांच्या वार्षिक जत्रोत्सवांना येणार्या भाविकांची असुविधा होऊ नये, या दोन्ही यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन आणि संबंधित देवस्थान समित्या यांनी नियोजनाचा, तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा सिद्ध करून जिल्हा प्रशासनास सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
४ फेब्रुवारी या दिवशी श्री भराडीदेवी आणि १८ फेब्रुवारी या दिवशी श्री देव कुणकेश्वर या देवतांच्या वार्षिक यात्रा होणार आहेत. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात १९ जानेवारी या दिवशी नियोजन आढावा बैठक झाली. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, तसेच आंगणे कुटुंबीय आणि श्री देव कुणकेश्वर देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या जत्रोत्सवांसाठी दक्षता पथकांची स्थापना, आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत प्रशिक्षण देणे, नियंत्रण कक्ष उभारणे, भाविकांच्या रांगाचे नियोजन करणे, पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करणे आदी विविध गोष्टींचे नियोजन करावे, तसेच सर्व विभागांनी समन्वयाने उत्तरदायित्व पार पाडावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.