साधकांची साधना व्हावी, ही तळमळ असल्याने त्यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील साधक श्री. प्रकाश शिंदे वर्ष १९८९ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संपर्कात आहेत. परात्पर गुरु डॉक्टर ठिकठिकाणी अध्यात्मप्रसारासाठी जात. त्या वेळी श्री. प्रकाश शिंदे यांना त्यांच्या समवेत जाण्याची संधी लाभली. त्यांच्या सत्संगातील आठवणी आणि मिळालेली शिकवण यांविषयीची त्यांनी दिलेली सूत्रे येथे दिली आहेत. १९ जानेवारी २०२३ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधकत्व आणि साधना या दृष्टीने दिलेले काही दृष्टीकोन पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. (भाग ३)
भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/646538.html
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधकत्व आणि साधना या दृष्टीने दिलेले दृष्टीकोन
४ इ. साधनेचे तत्त्व सांगून साधकांना मार्गदर्शन करणे : परात्पर गुरु डॉक्टर भाव असलेल्या नवीन साधकांच्या घरीही जायचे. त्या वेळी ते साधकांचे पूर्ण घर फिरून पहायचे. पुष्कळ ठिकाणी देवघरात अनेक देवतांची मांडणी केलेली असायची. ‘देवतांची पूजा करण्यासाठी साधकांना १ – २ घंटे लागतात’, असे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्या साधकांना योग्य दृष्टीकोन देऊन ‘अनेकातून एकात कसे आणि का यायचे ?’ याचे महत्त्व सांगून साधनेची योग्य दिशा द्यायचेे.
४ ई. ‘साधकांचा वेळ वाया जाऊ नये आणि साधना योग्य दिशेने व्हावी’, या दृष्टीने त्यांना मानसिक स्तरावर नाही, तर आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टर एका साधिकेच्या घरी गेल्यावर त्यांनी साधिकेला ती ‘साधना म्हणून काय करते ?’, असे विचारले. तेव्हा तिने ‘मी नागदेवतेची पूजा करते’, असे सांगितले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘तुमचा नागदेवतेच्या साधनेचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता पुढच्या टप्याची साधना करा. आता कुलदेवतेचे नाम घ्या.’’ अशा प्रकारे ते नवीन साधकांना साधनेची योग्य दिशा देत. तेव्हा ते ‘समोरच्या व्यक्तीला काय वाटेल ? ती दुखावली जाईल का ?’, असा विचार करत नसत. ‘साधकांचा साधनेतील वेळ वाया जाऊ नये, त्यांची साधना योग्य व्हावी’, ही त्यांची तळमळ आम्हाला पहायला मिळायची आणि ‘अध्यात्मप्रसार मानसिक स्तरावर न करता आध्यात्मिक स्तरावर कसा करायचा ?’, हे शिकायला मिळायचे.
४ उ. ‘साधकांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी त्यांना पुढच्या टप्प्याची साधना करायला सांगणे : एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज भजनातून ‘नाम घ्या’, असे सांगतात. तुम्ही मात्र साधनेचे नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आदी सर्व टप्पे करायला सांगता. असे का ?’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘मी पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना आधीच करायला सांगतो. ५० टक्के आध्यात्मिक पातळीला सेवा सहजतेने होते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला त्याग सहजतेने होऊ लागतो; पण तोपर्यंत साधकांनी थांबून राहू नये. आधीच सेवा आणि त्याग करायची सवय लागली की, पुढे त्यांना ते करणे सोपे जाते. ‘साधकांची शीघ्र प्रगती व्हावी’, यासाठी मी तसे सांगतो.’’
४ ऊ. ईश्वर एकदाच अवतार घेऊन सर्व दुष्प्रवृत्तींचा नाश करतो ! : एकदा एका साधिकेच्या मनात विचार आला, ‘समाजाची एवढी अधोगती होेईपर्यंत ईश्वर का थांबतो ?’ तिने याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या घरातील केर दिवसातून किती वेळा काढता ? दिवसभर केर काढत नाही ना ? त्याप्रमाणे ईश्वरही त्याचे घर (पृथ्वी) सारखे स्वच्छ करत नाही. तो एकदाच अवतार घेऊन सर्व दुष्प्रवृत्तींचा नाश करतो.’’
४ ए. स्वतःची चूक नसतांनाही समोरची व्यक्ती अकारण रागवत असेल, तर शांत न रहाता त्या व्यक्तीला कडक भाषेत सांगता आले पाहिजे ! : एकदा एक साधक चारचाकी गाडी चालवत होता. त्याच्या मागे परात्पर गुरु डॉक्टर बसले होते. काही चूक नसतांना समोरून येणार्या एका वाहनातील चालकाने साधकाला शिवीगाळ केली आणि साधकाने शांतपणे ऐकून घेतले. वाहनचालक निघून गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टर साधकाला म्हणाले, ‘‘आपली चूक नसतांना असे शांतपणे ऐकून घ्यायचे नाही. आपल्यालाही समोरच्याला कडक भाषेत सांगता आले पाहिजे !’’ तेव्हा ‘प.पू. भक्तराज महाराज एका शिष्याला म्हणाले होते, ‘व्यवहारात १० टक्के तरी अहंकार हवाच, नाहीतर लोक तुला पिळून खातील (त्रास देतील) !’ या बोलण्याची मला आठवण झाली.
(क्रमशः)
– श्री. प्रकाश शिंदे (वय ६० वर्षे), डोंबिवली, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. (६.९.२०२०)