छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणायला लाज का वाटते ?
१. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ न म्हणता ‘स्वराज्यरक्षक’ म्हणण्यास सांगणे
‘धर्माचा ठेका घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते जाणीवपूर्वक छत्रपतींचा अपमान करत आले आहेत. त्यांनी हा चावटपणा असंख्य वेळा केलेला आहे. त्यात ‘हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे’, हे सांगण्याचा अट्टाहास असतो. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या योगदानाविषयी महाराष्ट्र हा निःसंशय कायमच त्यांच्या ऋणात राहील; पण हे राज्य ज्यांच्यामुळे ‘महाराष्ट्र’ बनले आहे, त्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांना तुम्ही आदराने आणि या सर्व नावांच्या आधी घेणार कि नाही ? महाराष्ट्र विधीमंडळाच्या भर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बोलून गेले, ‘संभाजी महाराज हे कधीच ‘धर्मवीर’ नव्हते, त्यांना ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ म्हणा !’ असे का म्हणायचे ? तर त्यांच्याच एका खासदाराने लिहिलेल्या ‘स्क्रिप्ट’ (संहिते) मुळे ! सुबोध भावे यांना एक व्यक्तिरेखा घेऊन चित्रपट काढण्यावरून चिडवले जाते. अलीकडे त्यांनी एका चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकाही वठवली आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज आलटून पालटून दोन्ही भूमिकेत तुम्हाला अमोल कोल्हेच दिसतील. जणू काही यांनी महाराजांचे ‘पेटंट’च (स्वामीत्व हक्क) घेतले आहे. अजित पवार यांनी असे वक्तव्य करण्यामागे त्यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मालिकेेचा बहुतेक परिणाम असावा. ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’, असे प्रमाणपत्र एका जातीयवादी म्हणवणार्या पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी देणे, हे आश्चर्यकारक आहे. अजित पवार यांचा इतिहासाचा अभ्यास कदाचित् अमोल कोल्हे यांनाच अधिक ठाऊक असावा; कारण त्यांनी शंभूराजेंनी लिहिलेले ग्रंथ वाचलेले नसावेत. किमानपक्षी त्यांना हे तरी ठाऊक आहे का की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून का मारले ? शंभूराजेंचे डोळे का काढले गेले? त्यांची नखे का उपटली ? त्यांच्या कानात गरम लोखंडी गज का घुसवण्यात आले ? ‘धर्म पालट, मुसलमान हो, तुला दख्खनचा राजा बनवतो, तुझे माझ्या पोरीशी लग्न लावून देतो’, असे कोण बोलले होते ? हे कुठे वाचले आहे का दादा (अजित पवार) ? या जिगरबाज छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या सन्मानासाठी देह छिन्नविछिन्न करू दिला. हसत हसत मरणाला कवटाळणार्या शंंभूराजांना जर आम्ही धर्मवीर मानतो, तर तुमच्या पोटात का दुखायला लागले ? आहेच ते धर्मवीर; कारण तसा इतिहास आहे. तुम्हालाही कोकाटे (विद्रोही इतिहासकार श्रीमंत कोकाटे) आणि नरके (प्रा. हरि नरके) यांची चटक लागली का ?
२. छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’च होते, हे स्पष्ट करणारे त्यांचे अजरामर साहित्य
छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ‘बुधभूषण’ हा ग्रंथ सुबोध मराठीत उपलब्ध आहे. तो वाचा. संभाजी महाराजांना उर्दू, पोर्तुगीज यांसह १५ भाषांचे ज्ञान होते. ते संस्कृतमध्ये ‘पंडित’ या पदवीला धारण करण्याच्या कुवतीचे ज्ञानी होते. ‘बुधभूषण’मधील सर्व कवणे (काव्ये) ही त्यांनी संस्कृतमध्ये सांगितली आहेत आणि कवी भूषण यांनी ती लिहून काढली आहेत. या ग्रंथाच्या पानोपानी त्यांनी हिंदु देवीदेवतांचा उल्लेख केला आहे. या ग्रंथाची प्रत्येक ओळ ही जाज्वल्य धर्माभिमान प्रसारित करणारी आहे. ज्याप्रमाणे ‘बुधभूषण’च्या पानापानांवर हिंदु धर्माचा जागर दिसतो, त्याप्रमाणे शंभूराजांच्या जीवनातही अनेक घटना दिसतात. त्यांचेच काय स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘धर्मवीर’ असणे आणि धर्मध्वजासाठी आग्रही असणे, हे जोखायचे (वाचायचे) असेल, तर ‘बखर संभाजी’ नावाचे एक पुस्तक आहे, त्यातील पान क्र. १०३ वाचा, सगळे स्पष्ट होईल. डॉ. जयसिंह पवार हे तटस्थ इतिहास संशोधक समजले जातात. त्यांचे ‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा’ हे पुस्तक आहे. त्यानंतर ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’ हा ग्रंथ आहे. त्याच्या पानापानांतून छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मवेडेपण अधोरेखित होत जाते. मग अजित पवार हे कोण नवीन इतिहासकार आहेत की, जे जगाला निक्षून सांगायला लागले, ‘छत्रपती संभाजी महारांना धर्मवीर म्हणू नका, ते केवळ स्वराज्यरक्षक होते !’ म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे ? हेही जगाला कळू द्या.
३. छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ न म्हणणे, हा त्यांच्या प्रखर धर्माभिमानाचा अपमान !
आमच्या राजाने सलग ४० दिवस औरंग्याचा छळ सहन केला. त्यांनी एकेक दिवस निवळ धर्माभिमानासाठी त्यांचे लचके लांडग्यांना तोडू दिले. छिन्नविछिन्न झालेला हा देह अखेर ११ मार्च १६८९ या दिवशी फाल्गुन अमावास्येला अनंतात विलीन झाला. त्यालाही कारण हेच की, ‘मुसलमान हो’, ‘मुसलमान हो’, असे ज्या छत्रपती संभाजी महाराजांना सतत सांगितले जात होते, त्या छत्रपतींचे शरीर ३९ दिवसांमध्ये तुकड्या तुकड्यात विभागले गेले होते. त्यातील प्रत्येक तुकडा हा स्वत:चे हिंदु असणे ओरडून ओरडून सांगत होता. वैतागलेला यवन मग आणखीनच पिसाळला. सरतेशेवटी त्याने संभाजी राजांचे डोके शरिरापासून वेगळे करण्याचा आदेश दिला. एक धर्माभिमानी राजा त्याने संपवला; पण त्या राजाचे देव, देश आणि धर्म यांच्याप्रतीचे जाज्वल्य प्रेम तो संपवू शकला नाही. शंभूराजेंच्या प्रत्येक थेंबाथेंबातून सहस्रो, लाखो प्रखर ‘हिंदु धर्मरक्षक’ मावळे जन्माला आले. त्यांनी त्या औरंग्याला जेरीला आणले आणि पुढे टाचा घासून घासून या मराठी मातीत दफन व्हायला भाग पाडले. हिंदवी स्वराज्य हिसकावण्याचे त्याचे संपूर्ण स्वप्न कायम त्याच्यासह त्याच्या कबरीतच विसावले. हा होता, हिंदु धर्माचा धगधगता अंगार, जो छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने मोगल पदपातशाहीने अनुभवला. त्याला कोत्या मनोवृत्तीचे जातीयवादी राजकारणी काय नाकारणार ? छत्रपती संभाजी राजे प्रत्येक हिंदूसाठी धर्मवीर होते, आहेत आणि रहातील. ते आमच्यासाठी धर्मवीर आहेत, हे आमच्या कानीकपाळी भिनले आहे. आमच्या मनाच्या कानाकोपर्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बसले आहेत. त्यांचे नाव घेतले की, अंगावर काटा येतो. ज्यांनी माना मोडून पडलेल्या मराठी मुलुखाला अभिमानाने जगायला शिकवले आणि गाढवाचा नांगर फिरवलेल्या आमच्या धार्मिक अस्मितांना जागृत केले. ते राजे आमच्यासाठी कायम धर्मवीरच आहेत. तुम्ही कितीही कांड्या केल्या, तरी आमच्या अस्मिता पुसू शकत नाहीत. तुम्ही तसा प्रयत्नही करू नका, महाराष्ट्र तुम्हाला क्षमा करणार नाही.’
– श्री. प्रभाकर सूर्यवंशी
(साभार : ‘आकार डिजी ९’ यू ट्यूब चॅनेल)