गुजरातमध्ये जैन धर्मीय हिरे व्यापार्याच्या ८ वर्षांच्या मुलीने घेतली संन्यास दीक्षा !
सुरत (गुजरात) – येथे हिरे व्यापार्याच्या अवघ्या ८ वर्षांच्या मुलीने जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. देवांशी असे या मुलीचे नाव असून तिने विलासी जीवन सोडून भिक्षुकी होण्याचा निर्णय घेतला. देवांशी मोठी झाल्यावर कोट्यवधी रुपयांच्या हिरे आस्थापनाची मालकीण बनली असती; परंतु तिने सर्व ऐषाराम सोडून संन्यासी जीवन स्वीकारले. हिरे व्यापारी धनेश आणि आमी संघवी या दांपत्याची ती थोरली मुलगी आहे. देवांशीचे वडील हे ‘संघवी अँड सन्स’ या आस्थापनाचे मालक असून मागील ३० वर्षांपासून त्यांचा हिर्यांना पैलू पाडण्याचा आणि त्यांची निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे घराणे पूर्वीपासूनच धार्मिक आहे. ८ वर्षांच्या देवांशीला हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषा अवगत आहेत. इतकेच नाही, तर देवांशी संगीत, नृत्य आणि योगा यांमध्येही पारंगत आहे. देवांशीचा अगदी लहानपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आचार्य कीर्तीयशसुरी यांनी देवांशीला संन्यास दीक्षा दिल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.
#Gujarat diamond merchant’s 9-year-old daughter turns to monkhood, gives up luxurious lifehttps://t.co/Dx0iHeZBHw
— Zee News English (@ZeeNewsEnglish) January 18, 2023
काय असते जैन धर्मातील दीक्षा !
जैन धर्मातील दीक्षा घेणे म्हणजे सर्व भौतिक सुखसोयींचा त्याग करणे आहे. दीक्षा घेणार्यांना तपस्वीचे जीवन जगावे लागते. जैन धर्मात याला ‘चरित्र’ किंवा ‘महानिभिश्रमण’ असेही म्हणतात. दीक्षा घेतल्यानंतर अंहिसा, सत्य बोलणे, ब्रह्मचर्य पालन, अस्तेय म्हणजे लालसा न करणे, अपरिग्रह म्हणजे आवश्यक इतकेच संचय करणे यांचे पालन करावे लागते. भिक्षा मागून जीवन जगावे लागते. सूती कपडे परिधान करावे लागतात. पायीच प्रवास करावा लागतो. दीक्षा घेतांना आपल्या डोक्यावरील केस स्वत:च्या हाताने ओढून काढावे लागतात. त्यानंतर दीक्षा घेण्याचा क्रम पूर्ण होतो.
का घेतात मुले-मुली दीक्षा !
१. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर लहान मुले आणि तरुण जैन धर्माची दीक्षा घेत आहेत. भौतिक सुखसोयी त्यांना आनंद देऊ शकल्या नाहीत; म्हणूनच साधे जीवन जगण्याचा आणि स्वतःला देवाच्या उपासनेसाठी समर्पित करण्याचा निर्णय ही मुले-मुली घेत आहेत.
२. जैन मुनींची कठोर जीवनशैली त्यांना वास्तविक जीवनाचे सार वाटते.
३. घरातील पालकांचा धर्माशी असलेला दृढ संबंधही त्यांना दीक्षेच्या दिशेने घेऊन जातो.
संपादकीय भूमिकाजैन मुले लहान वयात संन्यास दीक्षा घेतात, याचे प्रमुख कारण म्हणजे पालकांकडून त्यांच्यावर होणारे धार्मिक संस्कार होय ! हिंदु पालक मात्र त्यांच्या मुलांना साधना शिकवत नाहीत. यामुळे मुले खर्या आनंदापासून वंचित रहातात ! |