वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानचे २ तुकडे होणार !
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सध्या राजकीय संकट, आर्थिक संकट, सुरक्षा संकट, व्यवस्था संकट, लाजेचे संकट आणि पर्यावरण संकट अशा ६ संकटांचा सामना करत आहे. या संकटांमुळे वर्ष २०२३ मध्ये पाकचे २ तुकडे होऊ शकतात किंवा देशातील सर्व सरकारी संस्था निकामी होऊ शकतात, असे भाकीत अमेरिकेतील डेलावेर विद्यापिठातील ‘इस्लामिक स्टडीज प्रोग्राम’चे संस्थापक संचालक प्राध्यापक मुक्तदार खान यांनी केले. ‘भारताला वाटले, तर तो युद्ध घोषित करून पाकव्याप्त काश्मीर आणि इतर भाग स्वतःमध्ये विलीन करू शकतो’, असेही खान यांनी म्हटले आहे.
‘टूट सकता है पाकिस्तान’, भारत चाहे तो कर दे चढ़ाई और POK वापस ले ले’- मुक्तदर खान#Pakistan #POK #India #MuqtedarKhanhttps://t.co/Sx3mwXK70p
— ABP News (@ABPNews) January 19, 2023
प्राध्यापक मुक्तदार खान यांनी म्हटले की,
१. पाकिस्तानमध्ये परिस्थिती सुधारली नाही, तर सहस्रो निर्वासित पाक सोडून जगभरात जातील. भारतावर त्याचा मोठा परिणाम होईल.
२. इम्रान खान यांना सत्तेवरून हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. इम्रान खान कधी मोर्चे काढत आहेत, तर कधी भाषण करत आहेत. हे राजकीय संकट सरकारला राज्यकारभार नीट चालवू देत नाही.
३. पाकिस्तानमध्ये प्रचंड महागाई आहे. विकासाचे प्रमाण अत्यंत अल्प झाले आहे. निर्यातही घटली आहे. त्यामुळे अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वांत मोठी अडचण अशी की, त्यांना कशाचीही आवश्यकता भासली, तर ते विदेशातून खरेदी करू शकत नाहीत. दिवाळखोरीतून बाहेर पडण्यासाठी १० ते २० वर्षे लागतात.
४. पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. एक म्हणजे सीमेवर तालिबान आणि दुसरे ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)’. टीटीपीने खरे तर पाकमध्ये स्वतःचे वेगळे सरकार घोषित केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात २ सरकारे राज्य करतात. पाकिस्तान सरकारने टीटीपीविरुद्ध युद्ध चालू केले, तर ते अफगाणिस्तानात पळून जातील. तालिबान पाकिस्तानवर आक्रमण करेल, अशी स्थिती आहे.
५. भारताने जर पाकिस्तानवर आक्रमण केले, तर तो त्याला हवा तो प्रदेश पाककडून आरामात घेऊ शकतो. पाकिस्तानने त्याचे अर्धे सैन्य तालिबानशी लढण्यासाठी पाठवले आहे. निम्मे सैन्य घेऊन भारताशी कसे युद्ध करणार ? असाही प्रश्न आहे; परंतु भारत पाकिस्तानसारखा कुटील विचार करणारा नाही.
६. पाकिस्तानात लोकांचे सरकार, सैन्याचे सरकार आणि टीटीपीचे सरकार आहे, ही परिस्थिती अतिशय गोंधळात टाकणारी आहे. जे लोक टीटीपीच्या सावटाखालील भागात रहातात, त्यांच्यासाठी सरकार कोण आहे ? हेच कळत नाही. पाकिस्तानमध्ये व्यवस्थेचे संकट आहे, जे संपवण्यासाठी त्याला राज्यांची पुनर्रचना करावी लागेल. सैन्यालाही पालटावे लागणार आहे.