महाजनांमधील वादामुळे मंदिरांचे उत्सव बंद होऊ नयेत, यासाठी कायद्यात पालट करू ! – महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात

पणजी – मंदिराच्या महाजनांमधील वादामुळे मंदिरांचे उत्सव बंद होऊ नयेत, यासाठी कायद्यात आवश्यक पालट करू, असे आश्वासन महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत दिले. भाजपचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात मंत्री मोन्सेरात यांनी हे आश्वासन दिले.

भाजपचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट

आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, ‘‘मंदिराच्या उत्सवाच्या काळात महाजनांमधील दोन गटांत वाद उद्भवतो. त्यावर सरकारनियुक्त प्रशासक केवळ कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणे, हे एकच काम करतो. ‘भाविकांना मंदिरातील उत्सव चांगल्या रितीने पार पडावा’, असे वाटत असते; मात्र मंदिराच्या महाजनांना याविषयी काहीच वाटत नसते. प्रशासन उत्सव बंद पाडत असल्याने भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचते. यामुळे सरकारने कायद्यात पालट करून प्रशासकाला ‘कोणत्याही परिस्थितीत उत्सव बंद होणार नाही’, असा अधिकार दिला पाहिजे. महाजन त्यांचा वाद न्यायालयात जाऊन सोडवू शकतात; मात्र उत्सव साजरीकरणावर त्याचा परिणाम होऊ नये, याची सरकारने काळजी घ्यावी आणि कायद्यात आवश्यक सुधारणा करावी.’’ महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, ‘‘अलिकडेच न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यानुसार मामलेदाराला मंदिरातील धार्मिक कृतीशी संबंधित कोणतेच अधिकार देण्यात आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर कायद्यात पालट करणे आवश्यक वाटते आणि पुढील अधिवेशनात हा पालट केला जाणार आहे.’’