तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्यात आल्यास असंतोष निर्माण होईल ! – केतन शहा
सोलापूर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’
सोलापूर – जैन समाजाच्या २४ तीर्थंकरांमधील २० तीर्थंकर ‘सम्मेद शिखरजी’ या पवित्र पर्वतावर साधना करून मोक्षाला गेले आहेत. अशा पवित्र ठिकाणाला सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे, याचा आम्ही निषेध करतो. याविरोधात मागील १ मासापासून जैन समाजाच्या वतीने आंदोलन उभारण्यात येत आहे. तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्यात येत असेल, तर यापुढे जनमानसात मोठा असंतोष निर्माण होईल. अल्पसंख्यांक जैन समाज हा सर्वाधिक टॅक्स भरणारा समाज आहे, हेही सरकारने लक्षात घ्यावे. याचा विचार न झाल्यास त्याचे परिणाम यापुढे सरकारला भोगावे लागतील. त्यामुळे झारखंड सरकारने हा निर्णय मागे घेऊन ‘सम्मेद शिखरजी’ला ‘तीर्थक्षेत्र’ घोषित करावे, असे आवाहन जैन संघटनेचे श्री. केतन शहा यांनी केले. येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त ते बोलत होते.
आंदोलनात सर्वश्री अभिनंदन अगरथडे, हुकुमचंद हेसे, महावीर दुरुगकर, महेश नळे, कल्पेश मालु, शिवलाल शहा, रवि सास्तुरे, अरविंद शहा यांसह सकल जैन समाज संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सुनील गांधी, चंदुभाई डेडीया, सुमती शहा, स्नेहा वनकुदरे हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी मनोगत व्यक्त केले.
‘सम्मेद शिखरजी’सह हिंदूंच्या सर्व पवित्र स्थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करावे ! – बाबूभाई मेहता
‘सम्मेद यात्रा पूर्ण केल्याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्ही मानतो. अशा पवित्र स्थळाला पर्यटन क्षेत्र घोषित करणे चुकीचे आहे. सरकारने केवळ ‘सम्मेद शिखरजी’च नव्हे, तर हिंदूंच्या सर्वच पवित्र स्थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्न नाहीत.
क्षणचित्र : समितीने आंदोलनाच्या माध्यमातून ‘सम्मेद शिखरजी’ या पवित्र तीर्थस्थळाविषयी आवाज उठवल्यासाठी सकल जैन समाज संघटनांच्या वतीने आभार मानण्यात आले.