‘ऑनलाईन खेळ’ एक जुगार ?
आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ आणले. त्यासह खेळाडूंनाही मैदानावरून ‘ऑनलाईन’ खेळांच्या माध्यमांतून आपल्या घरात आणलेले आहे. मैदानावर घाम गाळण्यापेक्षा घरात बसून आरामात गेम खेळण्याची ‘क्रेझ’ तरुणाईमध्ये दिसते. खेळांच्या ऑनलाईन स्पर्धा आयोजित करून विजेत्या गटाला बक्षिस म्हणून विशिष्ट रक्कम दिली जाते. या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने तरुणांशी संवाद साधला असता तरुणांनी अतिशय धक्कादायक मत प्रदर्शन केले आहे. ‘सतत गेम्स खेळल्याने सराव होऊन त्यातील बारकावे कळून कौशल्यही निर्माण करता येते. कल्पकता वाढल्याने खेळात प्राविण्य मिळवणे शक्य होते. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ नोकरी करण्यापेक्षा ऑनलाईन गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणे कधीही चांगलेच.’ यातून युवा पिढी ऑनलाईनच्या आभासी विळख्यात किती प्रचंड प्रमाणात गुरफटली आहे, याचे हे अत्यंत बोलके उदाहरण आहे. युवा पिढी अशा पद्धतीने जीवन जगण्याचे ध्येय ठेवत असेल, तर त्यांचे आणि पर्यायाने राष्ट्राचे भविष्य कसे असेल ? याचा विचारच न केलेला बरा.
या सर्व गोष्टीचा आध्यात्मिक स्तरावर विचार केल्यास भारतीय तत्त्वज्ञानानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितलेले आहेत. यांतील अर्थ म्हणजे सचोटीने, नैतिकतेने, प्रामाणिकपणे आणि कष्टाने अर्थार्जन करून कुटुंबाचे योगक्षेम चालवणे. असे असतांना उपरोक्त मार्गाने अर्थार्जन म्हणजे एक प्रकारे जुगार खेळणेच आहे. जुगार खेळणे म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे होय.’ कष्ट न करता, प्रसंगी लोकांना फसवून किंवा भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे म्हणजे अधर्मच आहे. यामुळे जीवन सुखी आणि समृद्ध होईल का ? पैसा घाम न गाळता आणि कष्ट न करता अगदी सहजपणे खेळता-खेळता कसा मिळवता येईल, याकडे माणसाची दृष्टी असते अन् तसाच त्याचा स्वभाव बनतो. जुगार किंवा तत्सम खेळ यात माणूस अडकला की, तो बुद्धीभ्रष्ट होतो. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. यातून मनुष्यावर पहाता-पहाता सर्वस्व हरवून बसण्याची वेळ येते. याविषयी इतिहासात अनेक दाखले असून ते सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळून पैसे मिळवण्याचा मार्ग सुकर वाटला, तरी तो रसातळाला नेणारा असल्याने याचे धोके ओळखून सावध होणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि यातून धर्मशिक्षणाची अपरिहार्यता लक्षात घ्यावी !
– श्रीमती धनश्री देशपांडे, गोवा.