साधकांची साधना व्हावी, ही तळमळ असल्याने त्यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील साधक श्री. प्रकाश शिंदे वर्ष १९८९ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संपर्कात आहेत. आरंभी ते वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांकडे जायचे. त्यांना होणार्या वाईट शक्तीच्या त्रासासाठी परात्पर गुरु डॉक्टर नामजपादी उपाय सांगायचे. त्यानंतर श्री. प्रकाश शिंदे यांनी साधनेला आरंभ केला आणि ते मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करायला जाऊ लागले. परात्पर गुरु डॉक्टर ठिकठिकाणी अध्यात्मप्रसारासाठी जात. त्या वेळी श्री. प्रकाश शिंदे यांना त्यांच्या समवेत जाण्याची संधी लाभली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील त्यांच्या आठवणी आणि मिळालेली शिकवण यांविषयीची त्यांनी दिलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१८ जानेवारी २०२३ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची श्री. प्रकाश शिंदे यांनी घेतलेली भेट आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता यांविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/646256.html
(भाग २)
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती आणि सर्वज्ञता !
२ ई. मामीचे निधन झाल्यावर साधक मामाच्या घरी जात असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला स्वतःची चारचाकी गाडी घेऊन जाण्यास सांगणे आणि यातून ते ‘साधकांच्या प्रत्येक सुख-दुःखात कसे समरस होतात ?’, हे शिकायला मिळणे : माझे मामा चुनाभट्टी, मुंबई येथे रहात होते. वर्ष १९९३ मध्ये त्यांची पत्नी, म्हणजेच माझ्या मामीचे निधन झाले. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या घरी सेवा करत होतो. मामीचे निधन झाल्याने मला तिकडे जाणे भाग होते. याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना समजल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आपली चारचाकी गाडी घेऊन जा. तेथे काही साहित्य न्यायचे असल्यास वाहन असल्यास सोयीचे होईल.’’ त्यांनी दिनेशदादांसह चारचाकी गाडी पाठवून दिली. खरेतर माझे मामा-मामी साधक नव्हते. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी एकदा साधकाला स्वीकारले की, ते साधकाच्या प्रत्येक सुख-दुःखाशी समरस होतात. ते साधकाला स्वतःच्या कुटुंबातीलच एक घटक समजतात आणि त्याला आवश्यकतेनुसार सर्व साहाय्य करतात.’
३. अध्यात्मप्रसारासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ठिकठिकाणी प्रवचने करणे
३ अ. प्रत्येक शनिवार-रविवारी स्वतःचे चिकित्सालय बंद ठेवून परात्पर गुरु डॉक्टरांनी लहान गावांत जाऊन प्रवचन करणे आणि भविष्यात प्रसार वाढल्यावर प्रवचने घेण्यासाठी साधक न्यून पडू नयेत; म्हणून साधकांनाही सिद्ध करणे : परात्पर गुरु डॉक्टरांना अध्यात्मप्रसाराची तळमळ असल्याने वर्ष १९९१-९२ मध्ये ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी स्वत:चे चिकित्सालय बंद ठेवून लहान गावांत जाऊन प्रवचन करायचे. त्या वेळी त्यांना कधी कधी विश्रामालयात (‘लॉज’वर) किंवा सरकारी विश्रामगृहात रहावे लागायचे. एकदा रायगड जिल्ह्यात प्रसार चालू असतांना ते अलिबाग येथील कोर्लई गावातील डॉ. विलास आठवले (परात्पर गुरु डॉक्टरांचे लहान भाऊ) यांच्या बंगल्यात मुक्कामाला होते. रात्री सर्वांचे जेवण झाल्यावर आम्ही सर्व जण समुद्राकाठी शतपावली करण्यासाठी गेलोे. शतपावली झाल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांसह वाळूवर बसले आणि आम्हाला म्हणाले, ‘‘समोर डोंगरावर जुनाट किल्ला आहे आणि आपण जेथे बसलो आहोत, तेथे बाजूलाच स्मशान आहे.’’ त्यांच्या सहवासात साधकांना कसलीच भीती किंवा चिंता वाटत नसे किंवा विचारही येत नसत. केवळ ‘आनंदी आनंद’ असे. परात्पर गुरु डॉक्टर स्मशानाच्या बाजूला बसून साधकांना ‘प्रवचन कसे करायचे ? प्रवचनाच्या वेळी प्रस्तावना कोण करणार ? अनुभूती कोण सांगणार ?’, इत्यादीचे नियोजन आम्हाला सांगत होते. ‘भविष्यात प्रसार वाढल्यावर प्रवचन करणार्या साधकांची उणीव भासू नये’, यासाठी ते समवेत आलेल्या साधकाला ‘प्रवचन कसे करायचे ?’, हे शिकवत असत. ते आम्हाला आधीच्या प्रवचनात झालेल्या चुकांविषयीही सांगायचे.
३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रोत्यांना कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहाण्याची जाणीव करून दिल्यावर ‘व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर चुकीची जाणीव कशी करून द्यायची ?’, हे शिकायला मिळणे : परात्पर गुरु डॉक्टरांची अनेक ठिकाणी प्रवचने व्हायची. ते प्रवचनाच्या ठिकाणी नेहमी वेळेत पोचत. काही जण उशिरा यायचे. परात्पर गुरु डॉक्टर आरंभी त्यांना काही बोलायचे नाहीत; परंतु नंतरच्या प्रवचनाच्या वेळी ते सांगायचे, ‘‘आध्यात्मिक कार्यक्रमाला देवता उपस्थित असतात. अशा ठिकाणी आपण वेळेत पोेचायला हवे. आपण छोट्या कार्यक्रमालाही वेळेत येत नाही, तर ईश्वराशी कसे एकरूप होणार ?’’ त्यांच्या अशा सांगण्यामुळे नंतर सर्व जण वेळेत येऊ लागले. ‘परखडपणे जाणीव करून दिल्यामुळे काही जण पुढच्या प्रवचनाला येणार नाहीत’, असा विचार परात्पर गुरु डॉक्टरांनी कधी केला नाही. यातून ‘समोरच्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर चुकीची जाणीव कशी करून द्यायची ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले.
३ इ. देवळात प्रवचन करतांना परात्पर गुरु डॉक्टरांंनी उपस्थितांना देवळातील अस्वच्छतेची जाणीव करून देणे आणि लोकांना चुकीची जाणीव होऊन त्यांनी देवळाची स्वच्छता करायला आरंभ केल्यावर त्यांना चांगले वाटू लागणे : एकदा एका देवळात परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रवचन होते. त्या प्रवचनाला वाडीतील पुष्कळ लोक उपस्थित होते. त्या देवळात पुष्कळ जळमटे झाली होती. प्रवचनाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आपण आपले घर स्वच्छ ठेवतो; कारण अस्वच्छ घरात आपण राहू शकत नाही. येथे देवळात एवढी जळमटे झाली आहेत, तर अशा ठिकाणी देव तरी कसा राहील ?’’ त्यानंतर तेथील लोक नियमितपणे देवळाची स्वच्छता करू लागले. नंतर पुन्हा एकदा परात्पर गुरु डॉक्टर प्रवचनासाठी त्याच देवळात गेले. तेव्हा तेथील लोकांनी सांगितले, ‘‘तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली. आता आम्ही प्रतिदिन देऊळ स्वच्छ करतो. त्यामुळे आम्हालाही चांगले वाटते.’’
ज्या गोष्टी अयोग्य दिसत, त्याविषयी परात्पर गुरु डॉक्टर प्रवचनांत सांगत. प्रवचन ऐकणार्या काही जणांवर तरी त्याचा निश्चितच परिणाम व्हायचा आणि ते योग्य कृती करायला उद्युक्त व्हायचे.
३ ई. साधकांना नवीन व्यक्तींची ओळख योग्य प्रकारे करून द्यायला शिकवणे : वर्ष १९९२-९३ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांचे नागोठणे (जि. रायगड) येथे प्रवचन होते. या प्रवचनाला मराठी चित्रपट सृष्टीतील तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे, अश्विनी भावे यांचे वडीलही आले होते. त्यांची ओळख करून देतांना साधकाने ‘हे अश्विनी भावे या अभिनेत्रीचे वडील’, अशी ओळख करून दिली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर साधकाला म्हणाले, ‘‘अशी ओळख करून द्यायची असते का ? इथे ‘मुलगी मोठी आहे आणि वडिलांचे अस्तित्व मुलीमुळे आहे’, असे वाटते. त्यापेक्षा ‘हे श्री. भावे आहेत आणि यांची मुलगी अभिनेत्री अश्विनी भावे आहे’, अशी ओळख करून द्यायला हवी होती.’’
प्रवचन करण्यासाठी साधकांची सिद्धता करून घेतांना परात्पर गुरु डॉक्टर साधकांना लहान-सहान गोष्टीही शिकवत असत.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधकत्व आणि साधना या दृष्टीने दिलेले दृष्टीकोन
४ अ. सर्वज्ञ अशा गुरूंना साधकाचा भूत, वर्तमान आणि भविष्य काळ ज्ञात असल्याने गुरूंपासून काहीही लपवू नये ! : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी अभ्यासवर्गात सांगितले, ‘‘तुम्हाला स्वतःविषयी केवळ १ टक्काच माहिती असते आणि तीही वर्तमानकाळातील माहिती असते, म्हणजे नाव, आडनाव, नातेवाईक, तुमच्या जीवनात घडलेले प्रसंग इत्यादी. गुरूंना मात्र तुमचा ‘भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळ अन् भविष्यात तुमच्या जीवनात घडणारे प्रसंग यांविषयी सर्व ठाऊक असते. त्यामुळे गुरूंपासून काहीच लपवू नये आणि आपण काही लपवावे म्हटले, तरी लपवू शकत नाही.’’
४ आ. एखाद्याच्या घरी गेल्यावर त्याने त्याच्या क्षमतेप्रमाणे केलेला पाहुणचार आपल्याला प्रेमाने स्वीकारता यायला हवा ! : एकदा परात्पर गुरु डॉक्टर दौर्यावर असतांना आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या एका साधकाच्या घरी गेले होते. त्या साधकाने सर्वांसाठी चहा केला. परात्पर गुरु डॉक्टर चहा घेत नसूनही त्यांनी त्या वेळी चहा घेतला. तेव्हा त्यांच्या समवेत असलेले एक साधक म्हणाले, ‘‘मी चहा घेत नाही.’’ तेव्हा त्या साधकासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली. नंतर परात्पर गुरु डॉक्टर समवेत आलेल्या साधकांना म्हणाले, ‘‘परिस्थिती पाहून आपण आपल्या आवडी-निवडी बाजूला ठेवायला हव्यात. तुम्ही माझ्या समवेत अध्यात्म शिकायला आला आहात कि स्वतःच्या आवडी-निवडी जपायला आलात ?’, याचा विचार करा.’’ त्यांनी त्या साधकाला दृष्टीकोन दिला, ‘आपण ज्यांच्या घरी जातो, ते त्यांच्या क्षमतेप्रमाणे घरी आलेल्यांचा पाहुणचार करतात. त्यांनी दिलेले आपल्याला प्रेमाने स्वीकारता आले पाहिजे !’’
हा प्रसंग पाहून मला ‘श्रीकृष्ण आणि सुदाम्याचे पोहे’ यांची आठवण झाली. ‘देव वेगवेळ्या रूपांत अवतार घेतो; पण लीला त्याच प्रकारच्या करत असतो’, असे मला वाटले.
– श्री. प्रकाश शिंदे (वय ६० वर्षे), डोंबिवली, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. (६.९.२०२०)
भाग ३ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/646841.html
(क्रमशः)