काश्मिरी हिदूंची सुरक्षितता आणि त्यांच्या मागण्या !
आज काश्मिरी हिंदू विस्थापनदिन !
१. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांच्याशी संवाद साधला न जाणे
आजची परिस्थिती पहाता काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंसाठी केंद्रशासित राज्य निर्माण करायला हवे. त्याची ‘ब्ल्यू प्रिंट’ (एखाद्या योजनेची विस्तृत रूपरेषा) आम्ही बनवली आहे. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी अर्थसाहाय्य देण्याची गोष्ट केली जाते; पण त्या अगोदर त्यांच्याशी संवाद साधला जात नाही.
२. काश्मीरच्या संदर्भात ३३ वर्षांपासून केली जाणारी मागणी आणि वास्तव !
काश्मीर हे कलम ३७० नसलेले एक केंद्रशासित राज्य व्हावे, जेथे देशातील कुणीही माणूस येऊन राहू शकेल आणि तेथे संतुलित व्यवस्था असेल. ज्यांचे लोकतांत्रिक संतुलन नाही, तेच ओरडतात. येथे हिंदु, मुसलमान, शीख, ख्रिस्ती असे कुणीही येऊन राहू शकतील, अशी स्थिती व्हायला हवी; पण भारतात येणार्यांनी येथील राज्यघटना मानली पाहिजे. ही आमची गेल्या ३३ वर्षांपासूनची मागणी आहे.
३. काश्मीरच्या संदर्भात वेगळे धोरण का ?
भारतीय राज्यघटनेत ३६८ वे कलम आहे. ते राज्य पुनर्रचनेच्या समितीविषयीचे कलम आहे. मिझोराम तर केवळ एका जिल्ह्याप्रमाणे आहे, त्याला राज्य बनवण्यात आले. पंजाब प्रांत होता, त्यालाही राज्य केले. तेलंगाणा, उत्तराखंड आणि झारखंड ही जर राज्ये होऊ शकतात, तर मग काश्मीरच्या संदर्भातच वेगळे धोरण का ?
४. काश्मीरमध्ये हिंदु संस्कृती अस्तित्वात नसल्याने मुलांना त्याविषयी माहिती नसणे
गेल्या ३३ वर्षांपासून काश्मीरमध्ये रहाणार्या मुलांनी कधी हिंदु, हिंदूंची मंदिरे आणि मंदिरांतील घंटा पाहिलेल्या नाहीत. तेथे प्रथमपासूनच वहाबी संस्कृती असल्याने ही मुले तेथे हिंदूंना कशी स्वीकारतील ? दिवाळीत दिवे लावल्यास तेथील मुलगा त्यावर दगड मारेल आणि दिवे लावण्यास विरोध करील. यामध्ये शासनही काही करू शकत नाही. हे कसे रोखणार ?
५. स्वभूमी होणे, ही काश्मिरी हिंदूंना आशा असणे
काश्मिरी हिंदूंना हीच आशा आहे की, स्वभूमी झाली पाहिजे. काश्मिरी हिंदूंना त्यांच्या भौगोलिक संबंधाच्या आकांक्षेनुसार तेथे स्थान मिळाले पाहिजे. यासाठी दीर्घ कालावधी लागत असला, तरीही हा एकच मार्ग आहे.
६. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये दंगली झाल्यावर मंदिरांची झालेली स्थिती
काश्मीरमध्ये हिंदूंची तीर्थक्षेत्रे धोक्यात आहेत. आमची जी प्रमुख मंदिरे होती, त्या भागांना हिंदू नावे होती. त्यामुळे येथे हिंदु संस्कृती असल्याची ओळख होत होती; पण आता ही संस्कृती उखडून टाकण्याचे काम केले जात आहे.
६ अ. शंकराचार्य मंदिराच्या डोंगराचे नाव ‘तख्त-ए-सुलेमान’ झाले ! : श्रीनगर येथे डोंगरावर शंकराचार्य मंदिर आहे. त्या डोंगराचे नाव शंकराचार्य डोंगर असे आहे; पण त्याला आता ‘तख्त-ए-सुलेमान’ म्हटले जात आहे.
६ आ. ‘हरिपर्वत’ या शक्तीपिठाचे नामकरण ‘कोहीमारन’ केले असणे : श्रीनगर येथील एक इष्टदेवी आहे. ते शक्तीपीठ आहे. तेथे आंध्रप्रदेश आणि कोलकाता येथून लोक येतात. त्याला ‘हरिपर्वत’ म्हटले जातेे. माता देवीनानाचे ते एक पुष्कळ मोठे शक्तीपीठ आहे. त्याचेही नाव पालटून ‘कोहीमारन’ असे केले आहे.
६ इ. श्रीनगर नव्हे, ‘शहर-ए-खास’ करण्याचा घाट घालणे : श्रीनगर हे शहर राजा अशोक याने वसवले आहे. त्याचे नामकरण आता ‘शहर-ए-खास’ असे करण्याचा घाट घातला जात आहे. हिंदूंची प्रमुख मंदिरे असलेल्या ठिकाणच्या भागांना हिंदू नावे होती. यामुळे तेथे हिंदु संस्कृती असल्याची ओळख होत होती. ही संस्कृती उखडून टाकण्याचे कामही केले जात आहे.
६ इ १. शंकराचार्य मंदिराच्या ठिकाणी अरबी भाषेतील लिखाण केलेले असणे : काही वर्षांपूर्वीच शंकराचार्य मंदिर पीरबाबाचे करण्यात आले आहे. पूर्वी तर या शंकराचार्य मंदिरात कोणताही पीरबाबा नव्हता. तेथील पर्वतावर कोणतेही बांधकाम करण्यास अनुमती नव्हती; पण आता तेथे आतमध्ये पुष्कळ मोठमोठे ध्वज आहेत. त्यांवर अरबी भाषेत काहीतरी लिहिले आहे. मोठमोठे सापळे लावण्यात आले आहेत.
६ इ २. शंकराचार्य मंदिराचे नाव ‘तख्त-ए-सुलेमान’ ठेवलेले असणे आणि त्याविरोधात आंदोलन केल्याने त्या नावाचा फलक हटवला जाणे : श्रीनगर शहरात जेथे सैन्याची सुरक्षा आहे, तेथे अशी स्थिती असेल, तर मग जेथे सुरक्षा नाही, तेथील परिस्थिती कशी असेल ? येथे येणारा महाराष्ट्राचा पर्यटक शंकराचार्य मंदिरात जातो; पण त्या मंदिराचे नाव ‘तख्त-ए-सुलेमान’ ठेवले जाते. त्यासाठी पुण्यात आम्हाला लढावे लागले. धरणे आंदोलने केली. पुण्यात आवाज उठवल्याने लोकांनीही आम्हाला साथ दिली आणि त्यातून तो फलक हटवला गेला. काश्मीरला ५ सहस्र वर्षे जुना इतिहास आहे, त्याला नष्ट करून नवीन इतिहास जोडण्यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत.
७. कौसरनाग यात्रेला जाण्यासाठी विघटनवादी नेत्याने विरोध करणे आणि त्या दबावापोटी खोटे कारण देत सरकारने यात्रेची अनुमती रहित करणे
प्राचीन कौसरनाग यात्रेला जाण्यासाठी काहींनी एक गट केला होता. त्यांनी तेथील जिल्हाधिकार्यांकडे अनुमती मागितली आणि ती मिळालीही; पण तेथे गिलानी नावाच्या विघटनवादी नेत्याने यात्रेला विरोध केला. त्यामुळे राज्य सरकारने ही अनुमती रहित केली. ‘यात्रेमुळे तेथील पर्यावरण धोक्यात येईल’, असे कारण या वेळी सांगण्यात आले. पर्यटकांना तेथे जाण्याची अनुमती आहे, मग भाविकांना का नाही ? तेथे विष्णुपाद नावाचे एक तीर्थक्षेत्र आहे, जेथे ‘भगवान श्रीविष्णूंनी आपले तिसरे चरण ठेवले होते’, अशी श्रद्धा आहे. त्या प्राचीन मंदिरात जाण्याची या धर्मनिरपेक्ष भारतात भाविकांना अनुमती नाही.
७ अ. विष्णुपाद तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मशीद बांधली जाणे : तेथे मशिदीची रचना करण्यात येत होती. या हिंदूंच्या प्राचीन तीर्थक्षेत्राचा उल्लेख ‘नीलमत’ पुराणात आहे, तसेच ‘राजतरंगिणी’ ग्रंथातही उल्लेख आहे. त्या ठिकाणी वर्ष २०१४ मध्ये एक मशीद बांधली जात होती. ‘धर्मनिरपेक्ष भारतात हिंदूंवर किंवा काश्मिरी पंडितांवरच अन्याय का ?’, याचे उत्तर मिळालेच पाहिजे.
७ आ. कौसरनाग मशीद उभारली जाऊ नये, यासाठी हिंदूंचे संघटन अपेक्षित ! : येणार्या काळात जर सर्व हिंदू एकवटले नाहीत, तर तेथे कौसरनाग मशीद उभी राहील. मग आपण ती तोडू शकणार नाही. यासाठी आपण सरकारवर दबाव आणायला हवा. तसे झाल्यासच हिंदूंना त्यांची तीर्थक्षेत्रे परत मिळतील. अंतर्गत निरीक्षणानुसार ५ सहस्र मंदिरांच्या ठिकाणी मशिदी उभारल्या गेल्या आहेत.
७ इ. कौसरनाग यात्रा त्वरित चालू करण्यासाठी राज्य शासनाने अनुमती द्यावी ! : माझी अशी मागणी आहे की, कौसरनाग यात्रा त्वरित चालू केली जावी आणि तेथे चालू असलेली मशीद उभारण्याची प्रक्रिया बंद करावी, तसेच तेथेे हिंदूंना यात्रा करण्याची अनुमती दिली जावी. तेथील मूळनिवासींना तेथे जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज्य शासनाने यासाठी अनुमती द्यावी.
८. एका गावात प्रारंभी २ मंदिरे असणे; परंतु आता तेथे काहीच शेष राहिलेले नसणे आणि शेजार्याने तेथील सर्व भूमीही बळकावणे
मी माझ्या गावात गेलो होतो. तेथे २ मंदिरे होती. आता तेथे मंदिरांचा दगडही शिल्लक नाही. केवळ एक झाड होते. दुसर्या दिवशी तर झाडही जाळण्यात आले. पोलिसांत याविषयी तक्रार केल्यावर ते म्हणाले, ‘‘आम्ही याची चौकशी करू.’’ तेथील लहान मंदिराची भूमीही आमच्या शेजार्याने कह्यात घेतली आहे. मी त्याला विचारले, ‘‘तुम्ही येथे कुठून आला ?’’ तो म्हणाला, ‘‘आता येथे तुमचे कुणी नाही.’’
८ अ. ‘टेंपलिझम शेअरनेस विधेयक’ पारित करण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य न करणे : ही स्थिती पालटण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे ‘टेंपलिझम शेअरनेस विधेयक’ (मंदिरांविषयीचे एक विधेयक) पारित करण्याची मागणी करत आहोत; पण ते करत नाहीत.’’ यामध्ये जर मुसलमानांच्या संदर्भात काही असते, तर लगेच कार्यवाही झाली असती; पण हा हिंदूंचा विषय असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
– श्री. रोहित भट, सचिव, यूथ फॉर पनून कश्मीर