गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त हिंदूंचा आविष्कार !
‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याची मागणी
१० सहस्रांहून अधिक हिंदूंचा मोर्च्यास अभूतपूर्व प्रतिसाद !
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), १८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने गडहिंग्लज शहरात १८ जानेवारीला ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी करत १० सहस्र हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला. शहरातील म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथून प्रारंभ झालेल्या मोर्च्याची सांगता श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात झाली. गडहिंग्लज येथे हिंदुत्वाच्या सूत्रावर निघालेल्या या मोर्च्यास हिंदूंनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
सभेच्या समारोप्रसंगी भाजपचे गडहिंग्लज तालुका विस्तारक श्री. संदीप नाथबुवा, आजरा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नाथा देसाई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल शिंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी केले. मोर्च्याच्या प्रारंभी श्री. राजू मोरे यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. वेदमूर्ती आदित्य जोशी-कापशीकर यांनी पौरोहित्य केले.
आंदोलनाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
श्री. संदीप नाथबुवा यांनी मोर्च्याचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी ते म्हणाले, ‘‘या मोर्च्याच्या माध्यमातून आज भगवी लाट निर्माण झाली आहे. समाजातील विकृती नष्ट करण्यासाठी आपल्या पिढीला त्रास होऊ नये यासाठी ‘कथित धर्मनिरपेक्षता’ संपलीच पाहिजे. धर्मांवर आलेली संकटे आपण संघटिपणे परतवली पाहिजेत.’’
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राहुल शिंदे म्हणाले, ‘‘हिंदूंनीच संघटित होऊन हिंदु धर्मावरील आक्रमणांचा प्रतिकार केला पाहिजे.’’ आजरा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नाथा देसाई म्हणाले, ‘‘हा पुरोगाम्यांचा जिल्हा नसून हिंदुत्वनिष्ठांचा आहे, हे आता आपण ठासून सांगितले पाहिजे. यापुढे आपण थांबायचे नाही, तर यापेक्षाही मोठे संघटन उभे करायचे आहे. नेसरी येथे सहस्रो धर्मांधांचे आक्रमण हिंदूंनी परतवून लावले.’’
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी म्हणाल्या, ‘‘लव्ह जिहाद, तसेच वक्फ बोर्डाच्या माध्यमातून हिंदूंवरील आक्रमण वाढले आहे. वर्ष २०१७ मध्ये २९ सहस्र, वर्ष २०१८ मध्ये २३ सहस्र ९३३ हिंदु युवती लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. ही आकडेवारी केवळ मुंबईची असून देशात किती असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. तरी यासाठी हिंदूंनी संघटित होऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे.’’
क्षणचित्रे
१. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सागर कुराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला.
२. बसवेश्वर चौकात श्री. आप्पा शिवणे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला.
३. श्री. दीपक भादवणकर यांच्या जिजाऊ शिवकालीन शस्त्र कला पथकाने विविध मर्दानी खेळ सादर केले. यात ७ ते ८ वर्षांपासूनची मुले-मुली सहभागी झाली होती. या पथकाने उपस्थितांची मने जिंकली.
४. बसवेश्वर तरुण मंडळ आणि संतोषदादा युवा मंच यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. अनेकांनी चौकाचौकात स्वयंस्फूर्तीने पाण्याची व्यवस्था केली होती.
५. वडरगे येथील तरुण आणि महिला यांनी ट्रॅक्टरवर चित्ररथ सिद्ध करून आणला होता.
६. समारोपप्रसंगी विविध ठराव करण्यात आले.
७. या पुढील काळात आजरा आणि महागाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
विशेष
१. आजूबाजूच्या गावांतून अनेक हिंदु तरुण भगवे ध्वज घेऊन दुचाकीवरून मोर्च्यात सहभागी झाले होते.
२. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने मोर्च्याचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
३. मोर्च्याच्या मार्गावर युवक, तसेच काही हिंदू थांबून मोर्च्यात सहभागी होत होते. अनेक ठिकाणी मोर्चा पहात होते.
उपस्थित संघटना आणि पक्ष
भाजप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना (शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट), मनसे, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांसह विविध तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळ यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते
उपस्थित मान्यवर
गडहिंग्लजचे भाजप शहराध्यक्ष श्री. राजेंद्र तारळे, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उंचगाव येथील उपसरपंच श्री. विराग करी, हुपरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे, भाजपचे श्री. राजेंद्र तारळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री. नागेश चौगुले, मराठा सकल मोर्चाचे श्री. आप्पा शिवणे