सिक्कीम येथे महिला कर्मचार्यांनी मूल जन्माला घातल्यास त्यांना वेतनवाढ !
गंगटोक – सिक्कीम राज्यात मागील काही वर्षांत प्रजनन दर अल्प झाला आहे. तो वाढवण्यासाठी सिक्कीम सरकारने प्रयत्न चालवले असून महिला कर्मचार्यांनी मूल जन्माला घातल्यानंतर त्यांना वेतनवाढ मिळणार आहे. राज्य सरकारने बनवलेल्या एका प्रस्तावानुसार महिला कर्मचार्यांनी दुसर्यांदा मूल जन्माला घातल्यानंतर त्यांना दुप्पट वेतनवाढ मिळणार आहे. सर्वसामान्य महिलांनीही अधिक मुले जन्माला घातल्यास त्यांना सुविधा मिळणार आहेत. त्यासह कृत्रिम गर्भधारणा करून माता बनणार्या महिलांना ३ लाख रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी जोरथांग येथे माघ संक्रांतीच्या उत्सवाच्या वेळी ही माहिती दिली. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महिला कर्मचार्याने मूल जन्माला घातल्यास तिला ३६५ दिवसांची रजा मिळणार आहे. प्रेमसिंह तमांग यांनी सांगितले की, सिक्कीममध्ये गेल्या काही वर्षांत प्रति महिला एक बालक असा प्रजनन दर नोंदवला गेला आहे. त्यामुळे महिलांनी मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी ही घोषणा केली.