पुणे जिल्ह्यामध्ये ४३ बोगस शाळा; त्यातील ३० कायमस्वरूपी बंद
पुणे – शहरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सी.बी.एस्.ई.) शाळांना बनावट (खोट्या) ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आले. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील शाळांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून पुणे जिल्ह्यात ४३ बोगस शाळा आढळल्या आहेत. (एवढ्या बोगस शाळा चालू असेपर्यंत कुणालाच याची कल्पना कशी आली नाही ? – संपादक) ४३ पैकी ३० शाळा कायमस्वरूपी बंद करण्यात येत आहेत, तर १३ अनधिकृत शाळांवर गुन्हा नोंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या शाळांपैकी ४ शाळांनी प्रत्येकी १ लाख रुपये दंड जिल्हा परिषदेकडे भरला असल्याचे समजते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, या १३ शाळांची व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक यांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात येतील. तसेच शाळांच्या पडताळणीमध्ये काही शाळा मूळ अनुमती ठिकाण सोडून अन्यत्र भरत होत्या, असे आढळले आहे. आता त्या मूळ पत्यावर भरत आहेत. इतर शाळांना शासनाची अनुमती नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.