त्र्यंबकेश्वर येथे पौषवारी यात्रा उत्सवाला उत्साहात प्रारंभ !
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने १६ ते २१ जानेवारीपर्यंत ‘पौषवारी यात्रा उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ‘राम कृष्ण हरि’, ‘जय हरि विठ्ठल’ नामाचा गजर करत वारकर्यांच्या ५०० दिंड्या त्र्यंबकेश्वर नगरीत आल्या आहेत. त्र्यंबकनगरीसह परिसर वारकर्यांनी फुलून गेला आहे. भगव्या पताका आणि हाती टाळ-मृदुंगाच्या तालात त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे. त्र्यंबकनगरीत येणार्या दिंडीचे नगरपालिका प्रशासनासह नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.
१८ जानेवारी या दिवशी पहाटे ४ वाजता शासकीय महापूजा होईल. महापूजेनंतर नगरपरिक्रमा होणार आहे. या वेळी श्री त्र्यंबकराज भेट आणि कुशावर्त स्नान होईल. डोक्यावर तुळशी वृंदावन, माऊलीचा गजर, विणेकरी-टाळकरींचा अखंड नाद असे उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरण त्र्यंबकनगर येथे पहायला मिळत आहे. आलेल्या बालकर्यांचे प्रशासनाकडून स्वागत करण्यात येत आहे, तसेच मानाच्या दिंड्या मानकरी आणि स्वयंसेवक यांना नारळ प्रसाद देत स्वागत करण्यात येत आहे. वारकर्यांची कुठलीही अपसोय होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह आणि आरोग्यविषयीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.