आतंकवादाची परिणती : पाकिस्तान फुटीच्या उंबरठ्यावर !
पाकिस्तानरूपी आतंकवादाच्या भस्मासुराला भारत सरकारने वेळ साधून नेस्तनाबूत करावे !
अमेरिकेच्या नेत्या हिलरी क्लिंटन यांनी वर्ष २०११ मध्ये केलेले एक अत्यंत प्रसिद्ध वक्तव्य जगभर गाजले. त्या म्हणाल्या होत्या, ‘‘तुम्ही सापांना दूध पाजत आहात आणि हे पाळलेले साप तुम्हाला चावणार नाहीत, अशी तुमची जी अपेक्षा आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.’’ हे वक्तव्य त्यांनी पाकिस्तानसंबंधी केले होते. आज पाकिस्तानला याची प्रचीती येतांना दिसत आहे. पाकिस्तानने आतंकवादाच्या रूपाने जी विषवल्ली पोसली होती, तीच आता त्यांना डंख मारू लागली आहे. ज्या पाकने एक हत्यार म्हणून आतंकवादाचा वापर केला, आतंकवादाला निर्यात करणारा कारखाना (फॅक्टरी) म्हणून जो जगभरात कुप्रसिद्ध आहे, तोच आज आतंकवादाचा पीडित आहे. पाकने केलेल्या कर्माची ही फलनिष्पत्ती आहे. आज पाकच्या मानगुटीवर आतंकवादाचे भूत अत्यंत घट्ट पकड घेऊन बसले आहे. परिणामी जगभरातील अभ्यासक आता असे म्हणत आहेत, ‘ वर्ष १९७१ मध्ये ज्याप्रमाणे पूर्व बंगाल फुटून पाकमधून बाहेर पडला आणि स्वतंत्र बांगलादेश म्हणून उदयाला आला. तशाच प्रकारे पश्चिम पाकिस्तान आता फुटण्याच्या मार्गावर आहे.’ थोडक्यात पाकिस्तानचे तुकडे होण्याची वेळ आता आली आहे. आधीच दिवाळखोरीमुळे भिकेकंगाल झालेल्या पाकिस्तानसाठी हा दुष्काळात तेरावा मास आहे. विशेष म्हणजे अत्यंत बिकट बनलेल्या या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी पाकच्या साहाय्याला अमेरिकाही जवळ नाही; कारण अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतलेली आहे. दुसरीकडे चीनही अलीकडील काळात पाकविषयी सावध पावले उचलू लागला आहे. त्यामुळे पाकिस्तान आता पूर्णपणे एकाकी पडला आहे. परिणामी त्याचे विभाजन अटळ असल्याचे मानले जात आहे.
१. पाकमध्ये अशी स्थिती का उद़्भवली ?
‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही आतंकवादी संघटना पाकमध्ये पुन्हा एकदा सक्रीय झालेली आहे. या संघटनेने पाकमध्ये मोठ्या प्रमाणावर आतंकवादी आक्रमणे चालू केली आहेत. नोव्हेंबर मासात या संघटनेने १०० हून अधिक, तर डिसेंबर मासात ६० हून अधिक आतंकवादी आक्रमणे घडवून आणली आहेत. वर्ष २०२२ मध्ये या आतंकवादी संघटनेने केलेल्या विविध आक्रमणांमध्ये पाकचे जवळपास २ सहस्र सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. या संघटनेची शक्ती आता इतकी वाढली आहे की, तिने पाकच्या अंतर्गत असणार्या काही क्षेत्रांवर स्वतःचा दावा सांगितला आहे. केवळ यावर न थांबता तिथे त्यांनी स्वतंत्र सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे एकीकडे शाहबाज शरीफ यांचे, तर दुसरीकडे तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचे सरकार अशी दोन सरकारे पाकिस्तानात आजघडीला दिसत आहेत. पाकिस्तानच्या आजवरच्या ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
२. पाकविरोधात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान आक्रमक का झाला ?
जून २०२२ मध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेशी पाकने युद्धबंदीचा एक करार केला होता. तो करार नोव्हेंबर २०२२ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर या संघटनेने पाकमध्ये मोठ्या संख्येने आतंकवादी आक्रमणे चालू केली. या पार्श्वभूमीवर ही युद्धबंदी का संपुष्टात आली ? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने मध्यस्थी केलेली होती; परंतु पाकने याचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न केला. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या अनेक नेत्यांना पाकिस्तानी सैन्याने यमसदनी धाडले. परिणामी या युद्धबंदीचा लाभ पाक सरकारलाच अधिक झाला. या मधल्या काळात या संघटनेची अफगाणिस्तानातील प्रशिक्षण स्थळे उद़्ध्वस्त करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे आता युद्धबंदी संपल्यानंतर ही संघटना कमालीची आक्रमक झालेली दिसत आहे.
वझिरीस्तान आणि स्वात या दोन प्रांतात या संघटनेने स्वत:चे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे या भागात पाकमधील लोकशाही सरकार नसून शरीयतवर आधारित कट्टर इस्लामी शासन प्रस्थापित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी आता सर्व तालिबान्यांना आमंत्रित केले असून त्यांच्याकडे प्रचंड मोठा शस्त्रास्त्रसाठाही आहे. त्यामुळे पाकने पोसलेला भस्मासूर त्याच्यावरच उलटला आहे.
३. पाकिस्तान आणि तालिबान एकमेकांचे वैरी बनण्यामागील कारणमीमांसा
या संघर्षाच्या निमित्ताने तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. ही संघटना वर्ष २००७ मध्ये पाकिस्तानात अस्तित्वात आली. अमेरिकेने वर्ष २००१ मध्ये अफगाणिस्तानात लष्करी हस्तक्षेप केला आणि ‘अल् कायदा’ अन् तालिबान यांच्या विरुद्ध सैनिकी मोहीम हाती घेतली. या मोहिमेला पाकिस्तानने समर्थन दिले. त्यामुळे अप्रसन्न झालेल्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान हा गट स्थापन केला. हा गट प्रामुख्याने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवरील जिला ‘ड्युरंड लाईन’ म्हणतात, तेथे कार्यरत आहे. खरे तर हा संपूर्ण भाग पख्तुनिस्तान म्हणून ओळखला जातो; कारण तेथे पख्तुनी समुदायाचे प्राबल्य अधिक आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानला ही ‘ड्युरंड लाईन’ मान्य नाही. त्यांना पख्तुनिस्तानचा पूर्ण प्रदेश पाकिस्तानातून वेगळा काढायचा आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ नये, यासाठीच पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानी सरकार आणले. पाकिस्ताननेच तालिबान्यांना साहाय्य केले आणि अफगाणिस्तान अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपातून मुक्त केला. सध्या अफगाणिस्तानातील सरकारमध्ये असणारे जवळपास सर्व तालिबानी नेते त्या काळात पाकिस्तानात आश्रयाला होते; परंतु आता याच तालिबानी सरकारविरुद्ध पाकिस्तानने युद्ध पुकारल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अलीकडेच पाकिस्तान सरकारकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यानुसार ‘आम्ही कोणत्याही प्रकारचा आतंकवाद सहन करणार नाही आणि आतंकवादाला समर्थन देणार्या देशाच्या विरोधात आम्ही आक्रमण करू’, असे सांगितले गेले. ही चेतावणी त्यांनी अफगाणिस्तानला दिलेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पाकिस्तान आणि तालिबान हे आजवरचे मित्र आता एकमेकांचे वैरी बनले आहेत. एकूणच पाकिस्तानची धोरणे त्यांच्यावरच उलटली आहेत.
४. येत्या काळात बलुचिस्तान आणि पख्तुनिस्तान वेगळे होण्याची शक्यता
वस्तूत: वर्ष २०१० मध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही संघटना फुटून तिचे १० तुकडे झाले होते; पण आता ते सर्व तुकडे एकत्र झाले असून त्यांनी पाकिस्तानविरुद्ध एल्गार (युद्ध) पुकारला आहे. या संघटनेने बलुचिस्तानातील ‘बलुच लिबरेशन आर्मी’लाही समर्थन देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे ही आर्मी प्रबळ बनली असून तेथे पुन्हा एकदा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर धरू लागली आहे. परिणामी येणार्या काळात एकीकडे बलुचिस्तान आणि दुसरीकडे पख्तुनिस्तान पाकिस्तानपासून वेगळे होऊ शकतात. अशा प्रकारची अत्यंत भीषण परिस्थिती पाकिस्तानात उद़्भवली आहे.
५. आतंकवादामुळे पाकची होणारी दुःस्थिती आणि परिणाम
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा एकदा ‘टीटीपी’सह शस्त्रसंधी करावी लागेल. यासाठी पाकला त्यांच्यापुढे झुकावे लागेल; परंतु असे करण्याने त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाचक्की होईल. त्यामुळे शाहबाज शरीफ सरकार किंवा पाक सैन्य यासाठी सिद्ध होणार नाही. दुसरीकडे पाकला चीनचे साहाय्य मिळणे अवघड दिसत आहे. अमेरिका या प्रश्नापासून पूर्णत: अलिप्त रहाण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे येत्या काळात ‘टीटीपी’ची आक्रमणे वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पाकपुढील अडचणी कमालीच्या वाढतील. ‘टीटीपी’चा सामना करण्यासाठी आणि आतंकवादी आक्रमणे रोखण्यासाठी पाक सरकारला सैन्यावर अधिक व्यय करावा लागेल. त्यातून पाकचा आर्थिक पाय अधिक खोलवर रुतला जाईल. दुसरीकडे आतंकवादी आक्रमणांमुळे निर्माण झालेल्या अशांतता आणि असुरक्षितता यांमुळे पाकमधील गुंतवणूक न्यून होईल. या सर्वांचा परिणाम म्हणजे पाक हा दुभंगलेला आणि कंगाल झालेला देश बनेल.
पाकिस्तानने स्वतःच्या परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून ज्या आतंकवादाचा वापर केला, ज्याच्या माध्यमातून त्याने भारतात असुरक्षितता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तोच आतंकवाद आज पाकला गिळंकृत करायला निघाला आहे. याची परिणती त्याच्या फुटीतून दिसून येणार, हे अटळ आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक (६.१.२०२३)
(साभार : साप्ताहिक ‘विवेक)