(म्हणे) ‘भारताविरुद्ध ३ युद्धे लढल्यामुळेच आम्ही गरीब झालो !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ
पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे नक्राश्रू !
रियाध (सौदी अरेबिया) – भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत आणि त्यांना एकमेकांसमवेत रहायचे आहे. आपण एकत्र शांततेत रहायचे, प्रगती करायची कि लढत रहायचे, हे आपल्यावर अवलंबून आहे. आम्ही भारताविरुद्ध ३ युद्धे लढले, त्यामुळेच आम्ही गरीब आणि बेरोजगार झालो. आम्ही युद्धातून धडा घेतला आहे. आम्हाला शांततेत जगायचे आहे. आम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे आहेत, असे विधान पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘अल् अरेबिया’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. या वेळी त्यांनी ‘पंतप्रधान मोदी यांना माझा संदेश आहे की, आपण समोरासमोर बसून काश्मीरसारख्या सूत्रांवर समजूतदारपणे चर्चा करू’, असे आवाहनही केले.
Pakistan’s PM Shehbaz Sharif on War with India pic.twitter.com/e1h5yIA2mX
— RVCJ Media (@RVCJ_FB) January 17, 2023
पाकिस्तानात बेरोजगारी आणि महागाई टोकाला पोचली आहे. देशात लोकांना गव्हाचे पीठ मिळत नसल्याने त्यांच्यात मारामारी चालू आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला भारताची आठवण झाली. दुसरीकडे पाकिस्तानची माध्यमे उघडपणे भारताचे पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करत असून ‘भारत प्रत्येक गोष्टीत शक्तीशाली आहे’, असे म्हणू लागली आहेत.
(म्हणे) ‘भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत !’
पंतप्रधान शाहबाज शरीफ पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये नेहमीच मानवी अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकमध्ये गेल्या ७५ वर्षांपासून अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचार होत असतांना आणि भारतात मुसलमान प्रतिदिन संख्येने वाढत असतांना अशा प्रकारचे विधान म्हणजे ‘खोटे बोला; पण रेटून बोला’च्या पठडीतील आहे ! – संपादक) कलम ३७० अंतर्गत काश्मिरींना मिळालेले अधिकार भारताने काढून घेतले. ऑगस्ट २०१९ मध्ये स्वायत्तता रहित करण्यात आली. भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत. हे सर्व कोणत्याही परिस्थितीत थांबले पाहिजे. त्यामुळे जगाला संदेश जाईल की, भारत चर्चेसाठी सिद्ध आहे. (काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. त्यासंदर्भात पाकशी चर्चा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. पाकने त्याच्या कह्यातील काश्मीर भारताला विनाअट परत करावा, हाच काश्मीरच्या समस्येवरील एकमेव उपाय आहे ! – संपादक)
आम्हाला गरिबी संपवायची आहे !
शाहबाज शरीफ म्हणाले की, आम्हाला गरिबी संपवायची आहे. आम्हाला समृद्धी आणि प्रगती हवी आहे. आम्हाला आमच्या लोकांना शिक्षण द्यायचे आहे, त्यांना चांगली आरोग्य सुविधा आणि रोजगार द्यायचा आहे. आम्ही आमची संसाधने बाँब आणि दारूगोळा यांवर वाया घालवू शकत नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाच संदेश द्यायचा आहे. आपण दोघेही अण्वस्त्रधारी देश आहोत. पूर्ण सशस्त्र आहोत. देव न करो की युद्ध व्हावे. असे झाले, तर ‘काय झाले होते’, हे सांगायला, तरी कोण वाचेल? (शाहबाज शरीफ यांनी युद्ध झाल्यावर भारताचा नाही, तर पाकचा विचार करावा. सध्यातरी युद्ध न होताच पाकची शकले होणार आहेत आणि तो पूर्णपणे भिकेला लागणार आहे, हेच संपूर्ण जगाला दिसत आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाभारताने युद्ध लढण्यास सांगितले नव्हते, तर पाकलाच ती खुमखुमी होती आणि त्याचाच हा परिणाम आहे. हा परिणाम इतक्यावरच थांबणार नसून पाकची पुरती वाताहात होणार आहे, हे शरीफ यांनी लक्षात ठेवावे ! |