फोंडा (गोवा) येथील सौ. राधा गोपी (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती
१. लहानपणापासून देवाची आवड असणे
‘मला लहानपणापासून देवाची भक्ती करायची आवड होती. मी वेळ मिळेल, तेव्हा पोथी आणि ग्रंथ यांचे वाचन करत असे. मला मार्गात देऊळ दिसल्यावर मी तेथे दर्शनासाठी जात असे.
२. सनातन संस्थेशी संपर्क
२ अ. सत्संगाला जाण्याची ओढ लागणे : एकदा मी फोंडा (गोवा) येथील विठ्ठलाच्या देवळात बसले होते. तेथे एक साधक माझ्याजवळ येऊन मला म्हणाले ‘‘आत सत्संग चालू आहे. तेथे का बसत नाही ?’’ त्यानंतर मी लगेच त्या सत्संगात जाऊन बसले. तेथे साधक म्हणत असलेली भजने ऐकून मला चांगले वाटल्याने मला तेथून उठून जावेसे वाटत नव्हते. मला मराठी भाषा चांगल्या प्रकारे समजत नसूनही मनाला एक प्रकारचा उत्साह जाणवत होता. प्रत्येक मंगळवारी सत्संग होत असे. ‘मंगळवार कधी येतो आणि कधी मी त्या सत्संगाला जाते ?’, असे मला वाटायचे.
२ आ. नामजप चालू केल्यावर अनुभूती येणे : सत्संगात कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायला सांगितला होता. मी नामजप चालू केल्यावर मला आणखी चांगले वाटले आणि विविध अनुभूती आल्या.
२ इ. गोवा येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांची भेट झाल्यावर भावजागृती होणे : वर्ष १९९३ मध्ये रामनाथी (गोवा) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी झाली. त्या गुरुपौर्णिमा सोहळ्यात मला सहभागी होता आले. प.पू. भक्तराज महाराज यांचा पाद्यपूजन सोहळा पाहून माझी भावजागृती झाली. त्यानंतर महालक्ष्मी मंदिर (पणजी) येथे माझी त्यांच्याशी दुसर्यांदा भेट येथे झाली. त्या वेळी ते सहज बोलतांना म्हणाले, ‘‘माझे आरोग्य चांगले नसल्यामुळे ‘मी परत गोव्यात येईन कि नाही ?’, हे सांगता येत नाही.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू वहात होते. ‘मला काय होत आहे ?’, हे मला कळत नव्हते. मी एका वेगळ्याच स्थितीत होते.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने अडचणींवर मात करता येऊन सेवा करता येणे आणि वेळोवेळी अनुभूती येणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सेवा करण्याची संधी मिळाली. ‘मला सेवा करतांना बर्याच अडचणी यायच्या. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला त्या अडचणींवर मात करता येत असे आणि माझ्याकडून सेवा पूर्ण होत असे, तसेच मला वेळोवेळी अनुभूती येत असत.
४. अनुभूती
४ अ. घरी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सतत ऐकू येणे आणि तो ऐकून भावजागृती होणे : एक दिवस घरात काम करतांना मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप सतत ऐकू येत होता. मी ‘भ्रमणभाषवर कुणी नामजप लावला आहे का ?’, हे शोधण्याचा प्रयत्न केला; पण भ्रमणभाषवर नामजप चालू नव्हता. तो नामजप ऐकून माझी भावजागृती होत होती.
४ आ. घरी असतांना शरिरावर अकस्मात् पाण्याचे थेंब पडणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ही अनुभूती सांगितल्यावर भावजागृती होणे : एक दिवस झोपण्याच्या खोलीत माझ्या अंगावर पाण्याचे थेंब पडत होते; पण पाणी पडण्यासारखे काही कारण नव्हते. दोन दिवसांनी अशा प्रकारची अनुभूती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगितल्यावर मला पुष्कळ आश्चर्य वाटले आणि माझी भावजागृती झाली.’
४ इ. भीषण अपघातात गंभीर घायाळ झालेल्या मुलाचे प्राण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने वाचणे
४ इ १. मुलाचा मोठा अपघात झाल्यावर ३ अनोळखी व्यक्तींनी भ्रमणभाषवरून संपर्क करून सुनेला अपघाताविषयी कळवणे आणि त्यानंतर सुनेने रुग्णवाहिका पाठवल्यावर मुलाला रुग्णालयात भरती करण्यात येणे : २४.१.२०२१ या दिवशी रात्री ९.३० वाजता माझा मुलगा (विजय) वेर्णा (गोवा) येथून दुचाकीवरून घरी येत होता. त्या वेळी एका मोठ्या उतरणीवरून त्याची दुचाकी घसरली आणि जवळजवळ १० मीटर खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला. त्या ठिकाणी तो बराच वेळ बेशुद्धावस्थेत होता. तो बर्याच वेळाने शुद्धीवर आल्यावर त्याला ३ व्यक्ती समोर उभ्या असलेल्या दिसल्या. मुलाने स्वतःकडचा भ्रमणभाष त्या व्यक्तींकडे देऊन पत्नीला अपघाताविषयी कळवायला सांगितले. माझी सून सौ. स्मिता हिने तेथे रुग्णवाहिका पाठवली आणि मुलाला रुग्णालयात अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले.
४ इ २. त्या ३ व्यक्तींनी अपघातस्थळी मुलाच्या साहित्याचे रक्षण करणे आणि ‘त्यांची नावे ‘शिवशंकर’, ‘उमाशंकर’ अन् ‘गिरिजाशंकर’, अशी असल्याचे कळल्यावर ‘त्या व्यक्ती म्हणजे देवच होते’, असे लक्षात येणे : स्मिता अपघातस्थळी पोचल्यावर तिला त्या तिन्ही व्यक्ती तेथेच बसलेल्या दिसल्या. त्या तिला म्हणाल्या, ‘‘विजयकडे जे साहित्य होते, ते सुरक्षित आहे. त्याच्या साहित्याला कोणीच हात लावला नाही. आम्ही त्याचे रक्षण करत होतो.’’ त्या वेळी स्मिताने त्यांना ‘तुम्ही कोण आहात ?’, असे विचारल्यावर त्यांनी ‘आमची नावे ‘शिवशंकर’, ‘उमाशंकर’ आणि ‘गिरिजाशंकर’, अशी असून आम्ही ‘सिप्ला’ आस्थापनातून आलो आहोत’, असे सांगितले. मी ही नावे असलेल्या व्यक्तींचा सगळीकडे शोध करूनही ते मला कुठेच सापडले नाहीत. तेव्हा मला स्पष्ट झाले, ‘त्या कुणी साध्या व्यक्ती नव्हत्या. ते देवच होते.’
४ इ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूर्याच्या रूपात दर्शन होऊन ‘तेच या संकटातून मुक्त करतील’, याची निश्चिती वाटणे : मला या अपघाताविषयी पहाटे ५ वाजता समजले. त्यानंतर मी रुग्णालयात गेले. मी व्हरांड्यात उभी असतांना मला सूर्याचे दर्शन झाले. तो एकदम लाल दिसत होता. मला सूर्याच्या प्रकाशाच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. मला परात्पर गुरु डॉ. आठवले सूर्याच्या रूपात दिसत होते. त्यांना बघून मला शांत वाटले आणि ‘गुरुदेव मला या संकटातून मुक्त करणार’, असा विचार माझ्या मनात येऊन मी निश्चिंत झाले.
४ इ ४. ‘मुलाच्या शेजारच्या पलंगावर असलेल्या पू. मेनरायआजोबा यांच्या रूपात परात्पर गुरु डॉक्टरच आले आहेत आणि ते मुलाला शक्ती देत आहेत’, असे जाणवणे : माझ्या मुलाला रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवले होते. त्याच्या शेजारच्या पलंगावर पू. मेनरायआजोबा (सनातनचे ४६ वे संत पू. भगवंतकुमार मेनराय (वय ८३ वर्षे)) उपचार घेत होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरच पू. मेनरायआजोबा यांच्या रूपात आले आहेत आणि तेच मुलाला शक्ती देत आहेत’, असे वाटून मला धीर आला. त्या वेळी एका साधकाने माझ्या मुलासाठी रक्तदान केले. मुलगा अपघातात गंभीर जखमी होऊनही गुरुकृपेेने वाचला. ही सगळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा होती.’
– सौ. राधा गोपी, फोंडा, गोवा. (१९.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |