पू. नीलेश सिंगबाळ सद़्गुरु पदावर विराजमान होण्याच्या सोहळ्याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
‘२९.६.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ८१ टक्के असून ते सद़्गुरु पदावर विराजमान झाले आहेत’, असे एका सोहळ्याच्या माध्यमातून घोषित करण्यात आले. या आध्यात्मिक सोहळ्याचे देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
१. सोहळा चालू होण्यापूर्वी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे सूक्ष्मरूप दिसून त्यांच्या व्यष्टी गुणांमुळे त्यांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भगवान शिवाचे रूप, तर त्यांच्या समष्टी गुणांमुळे त्यांच्या डोक्यावर गुरुतत्त्वाकडून आशीर्वादाचा ओघ येतांना दिसणे
‘पू. नीलेश सिंगबाळ यांना सद़्गुरु घोषित करण्याच्या सोहळ्याची पूर्वसिद्धता चालू असतांना मी डोळे मिटून नामजप करत होतो. त्या वेळी मला एक व्यक्तीरेखा (देहाच्या केवळ कडा दिसून तोंडवळा किंवा अन्य कोणताही भाग न दिसणे) दिसली. त्या व्यक्तीरेखेच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भगवान शिवाचे रूप होते, तर तिच्या डोक्यावरील भागावर गुरुकृपायोगाच्या बोधचिन्हातून (गुरूंच्या चरणांशी नतमस्तक शिष्य आणि शिष्याला आशीर्वाद देतांना गुरु) आशीर्वादाचा पांढरा शुभ्र ओघ येतांना दिसत होता. ‘आज ज्या जिवाचा सन्मान होणार आहे, त्यांचे व्यष्टी गुण भगवान शिवाप्रमाणे (वैराग्य, योग्याप्रमाणे घरादाराचा त्याग केलेला, सतत साधनारत, कठीण परिस्थितीतही शांत राहून साधना करणे इत्यादी) असल्यामुळे त्याच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भगवान शिवाचे दर्शन होत आहे. याउलट त्या जिवाचे समष्टी गुण आदर्श शिष्याचे आहेत, यामुळे त्याच्यावर सतत गुरुतत्त्वाचा (टीप) आशीर्वाद कार्यरत रहातो.’
टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी साकारलेले गुरुकृपायोगाचे बोधचिन्ह (गुरूंच्या चरणांशी नतमस्तक शिष्य आणि शिष्याला आशीर्वाद देतांना गुरु) हे ‘गुरुतत्त्वा’चे प्रतीक आहे. या चित्रातून ‘गुरूंच्या चरणांशी तन, मन, धन आणि अहं अर्पण करून नतमस्तक झालेला शिष्य’, हे गुरुकृपायोगाची शिकवण दर्शवते, तर शिष्याला आशीर्वादाच्या माध्यमातून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य देतांना गुरु हे गुरुतत्त्वाच्या कार्याचे प्रतीक आहेत.
२. सोहळा चालू झाल्यापासून उपस्थित सद़्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीमुळे विविध सूक्ष्म नाद आणि सप्तरंग कार्यरत असल्याचे दिसून मंगलमय वातावरणाची अनुभूती येणे
सोहळा चालू झाल्याच्या क्षणापासून मला अनेक सूक्ष्म नाद (सतार, बासरी, एकतारी इत्यादी) ऐकू येत होते. वायूमंडलात सप्तरंगांची छटा दिसत होती आणि वातावरणात मंगलतेची स्पंदने (चैतन्य + आनंद) अनुभवता येत होती. ‘सोहळ्यात उपस्थित सद़्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीमुळे सोहळा पूर्णपणे आकाशतत्त्वाच्या स्तरावर होत असल्याने सूक्ष्म नाद ऐकू येत होता, त्याच प्रकारे सद़्गुरु आणि संत यांच्याकडून प्रक्षेपित सगुण, सगुण-निर्गुण, निर्गुण-सगुण आणि निर्गुण अशा सर्व स्तरांचे चैतन्य एकत्रित आल्याने वायूमंडलात सप्तरंगांची छटा दिसत होती. संत हे चैतन्याचे स्रोत असून ते अंतर्मनातून आनंदावस्थेत असल्याने मंगलतेचे (चैतन्य + आनंद) वातावरण सिद्ध झाले’, असे जाणवले.
३. सोहळ्यात विविध धर्मप्रचारक संतांनी विविध राज्यांतील आश्रम आणि सेवाकेंद्रे यांचे वर्णन केल्यावर सूक्ष्मातून भारताच्या नकाशावर त्या-त्या ठिकाणी ‘धर्मपीठ’ निर्माण होतांना दिसणे आणि ही ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची सूक्ष्म प्रक्रिया असल्याचे जाणवणे
सोहळ्याच्या आरंभी विविध धर्मप्रचारक संतांना त्यांच्या राज्यातील आश्रम आणि सेवाकेंद्रे यांची वैशिष्ट्ये सांगायला सांगितली. पू. रमानंद गौडा, पू. अशोक पात्रीकर आणि अन्य संत ही माहिती सांगत असतांना मला सूक्ष्मातून भारताचा नकाशा दिसला. या नकाशावर आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या स्थानांवर ‘धर्मपिठे’ निर्माण होतांना दिसली. या संदर्भात असे जाणवले, ‘हिंदवी स्वराज्यासाठी आध्यात्मिक शक्ती मिळावी; म्हणून समर्थ रामदासस्वामींनी संपूर्ण भारतात ११ ठिकाणी मारुतीची देवळे बांधली. वर्तमानकाळाच्या तुलनेत त्या काळातील समाज धर्माचरणी असल्याने देवळांच्या माध्यमातून सात्त्विकता ग्रहण करणे त्यांना शक्य होते. या प्रकारे समाजातील सात्त्विकता वाढवण्याचे कार्य समर्थ रामदासस्वामींनी केले. वर्तमानकाळातील समष्टीची देवळांच्या माध्यमातून सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता नसल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सुप्त संकल्पामुळे विविध राज्यांत आश्रम आणि सेवाकेंद्ररूपी देवळे निर्माण झाली. समष्टी उद्धारासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे या देवळांमध्ये दगडाच्या मूर्ती नसून कृती, विचार आणि आचरण यांतून क्षणोक्षणी साधनेची शिकवण देणारे चालते-बोलते देव, म्हणजेच संत अन् सद़्गुरु निवास करतात. ‘ज्या स्थानातून धर्म आणि साधना यांची तात्त्विक अन् प्रायोगिक दोन्ही प्रकारची शिकवण दिली जाते’, ते स्थान ‘धर्मपीठ’ होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रम आणि सेवाकेंद्रे यांच्या माध्यमातून ‘धर्मपिठे’च निर्माण केली आहेत. काळानुसार ही धर्मपिठे शक्ती प्रक्षेपित करून ‘हिंदु राष्ट्र’ साकारण्याचे कार्य करणार आहेत. त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत समष्टीला धर्म आणि साधना यांचे मार्गदर्शन करणार आहेत.
४. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ वाराणसी आश्रमाचे वर्णन करत असतांना ‘ॐ’कार आणि डमरू यांचे सूक्ष्म नाद ऐकू येणे अन् सभास्थळी कैलासाचे वायूमंडल निर्माण होणे
सोहळ्यात वाराणसी आश्रमाच्या संदर्भात मनोगत व्यक्त करण्यासाठी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांना व्यासपिठावर बोलावण्यात आले. पू. नीलेश सिंगबाळ मनोगत व्यक्त करत असतांना मला सूक्ष्मातून प्रथम ‘ॐ’कार आणि काही वेळाने डमरूचा सूक्ष्म नाद ऐकू येऊ लागला. याच प्रकारे सूक्ष्मातून सभास्थळी कैलासाचे वायूमंडलही निर्माण झाले होते. (या वेळी कार्यक्रमस्थळी थंडावा वाढला होता.) ‘वाराणसी आश्रमाच्या संदर्भात मनोगत व्यक्त करतांना सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्यातील शिवतत्त्वात वाढ होत असल्याने सूक्ष्म स्तरावर तसे पालट होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
५. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ मनोगत व्यक्त करतांना सर्व कुंडलिनीचक्रांवर स्पंदने जाणवून अंगावर रोमांच येणे आणि त्या वेळी ईश्वराने त्यांची कर्म, भक्ती अन् ज्ञान या टप्प्यांद्वारे स्थूल आश्रमातून सूक्ष्म आश्रमव्यवस्थेकडे होणार्या साधनायात्रेची वाटचाल दाखवणे
सद़्गुरु नीलेश सिंगबाळ वाराणसी आश्रमाच्या संदर्भात मनोगत व्यक्त करत असतांना मला माझ्या सर्व कुंडलिनीचक्रांवर स्पंदने जाणवत होती आणि अधून-मधून अंगावर रोमांचही येत होते. सद़्गुरु नीलेशदादा बोलत असतांना त्यांच्या बोलण्यात कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग या तिन्ही योगमार्गांतील आध्यात्मिक दृष्टीकोनांचा समावेश होता. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘साधना करणार्या जिवाचे त्याच्या कर्मस्थळाशी कर्म, भक्ती आणि ज्ञान यांपैकी एका स्तरावर नाते जुळते. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे त्यांच्या कर्मस्थळाशी कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही स्तरांवर नाते जोडले गेले आहे. त्यामुळे त्यांची स्थूल आश्रम संकल्पनेतून (चार भिंती, म्हणजे आश्रम अशी संकल्पना) सूक्ष्म आश्रम संकल्पनेकडे (स्वतःचे जीवन हेच आश्रम आहे, उदा. संन्यासाश्रम इत्यादी) वाटचाल झाली आहे.
५ अ. सद़्गुरु नीलेशदादांनी खडतर साधनारूपी योग्य क्रियमाणाद्वारे वाराणसी आश्रमातील खडतर प्रारब्ध नष्ट करणे : वर्तमान कलियुगातील एखादी भूमी किंवा वास्तू यांचे त्यात रहाणार्या व्यक्तींशी अधिकाधिक १० टक्के समष्टी प्रारब्ध असते. वाराणसी आश्रमातील भूमीचे हे प्रारब्ध २० टक्के, म्हणजे दुप्पट होते. यामुळे वाराणसी आश्रमात सूक्ष्मातील वाईट शक्तींचे आक्रमण पुष्कळ अधिक प्रमाणात व्हायचे. सद़्गुरु नीलेशदादा यांनी अनेक कष्ट सहन करून आश्रमातील अनेक कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन केले आणि आश्रमातील समष्टीकडूनही करवून घेतले. या प्रकारे साधनेचे योग्य क्रियमाण वापरल्यामुळे वाराणसी आश्रमातील खडतर प्रारब्ध अल्प होऊन त्या ठिकाणी सात्त्विकता निर्माण होऊ लागली आणि आता तिथे दैवी पालटही होत आहेत, उदा. आपतत्त्वामुळे लाद्यांवर (टाईल्सवर) पाण्याच्या लाटांप्रमाणे लहरी दिसणे.
५ आ. आंतरिक भक्ती आणि गुरुकृपा यांमुळे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ हे आश्रमातील देवाण-घेवाण हिशोबामध्ये न अडकता भक्तीपथावर अग्रेसर होणे : अनेक वर्षे एका वास्तूत रहाणार्या व्यक्तीचा त्या वास्तूशी देवाण-घेवाण निर्माण होतो. त्यामुळे पुढे ती व्यक्ती त्या स्थानात अडकण्याची शक्यता असते. असे असतांनाही आंतरिक भक्ती आणि गुरुकृपा यांमुळे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ वास्तूच्या देवाण-घेवाण हिशोबात अडकले नाहीत. त्यांच्यातील आंतरिक भक्तीमुळे त्यांच्यात ‘आश्रमजीवन’, म्हणजे चार भिंतीत रहाणे नव्हे, तर ‘आश्रमात रहाणार्या साधकांना स्वीकारून त्यांच्यात गुरुरूप पहाणे, म्हणजे आश्रमजीवन’, अशी आश्रमजीवनाची भक्तीयुक्त संकल्पना निर्माण झाली. ज्या वेळी वास्तूत रहाणारा जीव मनातून त्या वास्तूपासून अलिप्त होऊन त्याकडे देवत्वाच्या दृष्टीने पाहू लागतो, त्या वेळी ‘दृष्टी तशी सृष्टी’ या न्यायाप्रमाणे प्रत्यक्ष वास्तूतही तसे पालट होऊ लागतात. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्यातील अशा उत्कट भक्तीमुळे वाराणसी आश्रमातील निसर्गही सात्त्विक होऊन त्या वास्तूत अनेक दैवी पालट झाले, उदा. जास्वंदीच्या झाडाला दोन रंगांची फुले येणे, वार्याने पडणारे आंबे झाडावर टिकून रहाणे, आंब्याच्या झाडांना पुष्कळ आंबे येणे इत्यादी.
५ इ. कर्म आणि भक्ती या स्तरांच्या साधनेमुळे सद़्गुरु सिंगबाळ यांच्यात ‘आत्मज्ञान’ प्रकट झाल्याने त्यांचे जीवन आचरण हेच धर्मशास्त्रात वर्णन केलेल्या आश्रम जीवनाप्रमाणे होणे : आदर्श शिष्यांना गुरु अंतरातून मार्गदर्शन करतात. सद़्गुरु नीलेश सिंगबाळ प्रथम कर्माच्या स्तरावर, तर पुढे भक्तीच्या स्तरावर आश्रमजीवन जगले. या प्रकारे त्या-त्या काळात गुरूंनी दिलेल्या आज्ञेचे पालन करत गुरूंना अपेक्षित जीवन जगल्याने त्यांच्यात आता ‘आत्मज्ञान’ निर्माण होऊ लागले आहे. ज्या वेळी शिष्यात आत्मज्ञान निर्माण होते, त्या वेळी त्याच्या मनातील शंका आणि विकल्प सर्व नष्ट होऊन त्याच्याकडून त्या-त्या काळात ईश्वराला अपेक्षित आचरण होऊ लागते. या प्रकारे साधना केल्यामुळे सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे पूर्ण जीवन धर्मशास्त्रात वर्णन केलेल्या ऋषिमुनींच्या आश्रम जीवनाप्रमाणे झाले आहे. आत्मज्ञान झाल्याने त्यांना आता साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पूरक मार्गदर्शन करणेही शक्य होत आहे.’
(क्रमशः)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२२, रात्री १०.३०)
|