हिंदूंच्या प्रत्येक समस्येवर एकच उपाय – ‘शिवाजी’ नावाचा मंत्र ! – पू. संभाजी भिडेगुरुजी
मकरसंक्रांतीच्या दिनी नागोठणे (जिल्हा रायगड) येथे शिवतेजाला झळाळी !
नागोठणे (जिल्हा रायगड) – आज महाराष्ट्रात आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहोत; पण केवळ मोर्चे काढून लव्ह जिहाद संपणार आहे का ? थुंकलेला शिरकुर्मा खायला जाणारे हिंदू आज लव्ह जिहादला कारणीभूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीशी एकरूप झाले होते. तुळजामाता म्हणजेच भारतमाता आहे. ‘शिवाजी’ केवळ नाटक आणि चित्रपट यांतील मनोरंजनासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेला उपाय हाच रोग मुळासकट नष्ट करणारे लव्ह जिहादवरील आयुर्वेदिक औषध आहे. लव्ह जिहादसह हिंदूंच्या प्रत्येक समस्येवर एकच उपाय आहे, तो म्हणजे ‘शिवाजी’ नावाचा मंत्र, असे शिवतेज जागृत करणारे उद़्गार पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी काढले. नागोठणे येथे १५ जानेवारी या दिवशी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी २ सहस्रांहून अधिक शिवभक्त आणि धर्माभिमानी उपस्थित होते.
पू. गुरुजी पुढे म्हणाले की, देव, देश आणि धर्म यांसाठी जगणारा समाज निर्माण करणे, हेच आमचे ध्येय आहे. हा संपूर्ण देश आम्हाला ‘शिवाजी’ आणि ‘संभाजी’ रक्तगटाचा बनवायचा आहे. हिंदवी स्वराज्याचा दिवा काळजात लावणारा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. जिथे जिथे हिंदवी स्वराज्याचा हुंकार आहे, तिथे तिथे अशरीर रूपाने छत्रपति शिवाजी महाराजांचे अस्तित्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हते. ते राष्ट्र आणि धर्म यांसाठी लढले. राम आणि कृष्ण यांच्या दुर्बिणी डोळ्यांना लावून शिवचरित्राकडे पाहिलेत, तर तुम्हाला ते वेगळे दिसेल. दुष्टांचे निर्दालन केल्यावर संतांचे संरक्षण आपोआप होते. छत्रपती शिवरायांनी हेच करून धर्मसंस्थापना केली.
‘दैनिक ‘सनातन प्रभात’ किती जण वाचतात ?’ असा प्रश्न पू. भिडेगुरुजी यांनी या सभेमध्ये व्यासपिठावरून विचारला. |
पू. गुरुजींनी पेण आणि पनवेल येथेही शिवभक्तांची घेतली भेट !
पू. गुरुजींनी प्रथम पनवेल आणि नंतर पेण येथील शिवभक्तांची भेट घेतली. त्यांनी पनवेल येथे उपस्थितांना मार्गदर्शनही केले.