नांदेड येथील कु. लक्ष्मी येडलेवार हिला ‘राष्ट्रीय बाल शौर्य’ पुरस्कार घोषित !
२६ जानेवारीला देहली येथे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार !
नांदेड – जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडी सावळी गावातील कु. लक्ष्मी येडलेवार (वय १३ वर्षे) या विद्यार्थिनीला भारत शासनाकडून यंदाचा ‘राष्ट्रीय बाल शौर्य’ पुरस्कार घोषित झाला आहे. २१ सप्टेंबर २०२१ या दिवशी लक्ष्मी हिने विद्युत् तारेला चिकटलेला स्वतःचा लहान भाऊ चि. आदित्य याला जीव धोक्यात घालून वाचवले होते. पुरस्कार मिळाल्याविषयी लक्ष्मी हिने आनंद व्यक्त केला. तिला आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना भेटायचे आहे, तसेच पुढे पुष्कळ शिकून आधुनिक वैद्य किंवा जिल्हाधिकारी व्हावे, अशी तिची इच्छा आहे.
( सौजन्य: गाव माझा न्यूज )
येत्या २६ जानेवारी या दिवशी देहली येथे या पुरस्काराने तिचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कारामुळे तिच्या थडी सावळी गावातील ग्रामस्थांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. तिच्या या शौर्याचे आता राष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. कु. लक्ष्मी हिचे आई-वडील दोघेही शेतमजूर आहेत.