परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाचा नामजप करतांना शांत वाटणे आणि श्रीकृष्‍णाचा नामजप करतांना आनंद जाणवणे, यांमागील कारणमीमांसा

१. अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मला श्रीरामाचा नामजप करतांना शांत वाटते आणि श्रीकृष्‍णाचा नामजप करतांना आनंद जाणवतो. पुढच्‍या पुढच्‍या टप्‍प्‍यांच्‍या अनुभूती शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती या क्रमानुसार येतात, म्‍हणजे प्रथम आनंदाची आणि नंतर शांतीची अनुभूती असते. युगांनुसारही हा क्रम लक्षात येतो. आधी त्रेतायुग झाले आणि नंतर द्वापरयुग झाले. त्रेतायुगात श्रीरामाचा अवतार झाला. त्‍याचा नामजप करतांना मला शांत वाटले. नंतरच्‍या द्वापरयुगात श्रीकृष्‍णाचा अवतार झाला. त्‍याचा नामजप करतांना आनंद वाटला.

२. अनुभूतींमागील कारणमीमांसा

२ अ. प्रथम सत्‍ययुग, नंतर त्रेता, मग द्वापर आणि सर्वांत शेवटी कलियुग, असा चार युगांचा क्रम आहे. सत्‍ययुगामध्‍ये मनुष्‍याच्‍या सात्त्विकतेचे प्रमाण सर्वाधिक होते. पुढे चौथ्‍या युगापर्यंत प्रत्‍येक युगात ती सात्त्विकता उत्तरोत्तर न्‍यून होत गेली. अनुभूतींच्‍या क्रमाचा विचार केला, तर अद्वैताची (‘मी आणि ईश्‍वर एकच आहोत’ ही) अनुभूती सर्वश्रेष्‍ठ अनुभूती मानली जाते. तिच्‍या खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर शांतीची अनुभूती श्रेष्‍ठ आहे. त्‍यापुढे उतरत्‍या क्रमाने आनंद, चैतन्‍य, भाव आणि सर्वांत कनिष्‍ठ स्‍तरावर शक्‍तीची अनुभूती मानली जाते. सत्‍ययुगात मनुष्‍याची सात्त्विकता सर्वाधिक असल्‍यामुळे सर्व जण अद्वैताच्‍या, म्‍हणजे सर्वोच्‍च अनुभूतीच्‍या स्‍थितीत होते. पुढे मनुष्‍याची सात्त्विकता थोडी न्‍यून झाली आणि सात्त्विकतेच्‍या क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्‍या त्रेतायुगात श्रीरामाचा अवतार झाला. त्‍यामुळे त्‍याचा नामजप करतांना अनुभूतींमध्‍ये श्रेष्‍ठतेत दुसर्‍या क्रमांकावर असलेली शांतीची अनुभूती आली. त्रेतायुगाच्‍या तुलनेत अल्‍प सात्त्विकता असलेल्‍या तिसर्‍या क्रमांकाच्‍या द्वापरयुगात श्रीकृष्‍णाचा अवतार झाला. त्‍यामुळे त्‍याचा नामजप करतांना अनुभूतींमध्‍ये तिसर्‍या क्रमांकावर असलेल्‍या आनंदाची अनुभूती आली.

२ आ. श्रीरामाचे तत्त्व श्रीविष्‍णूच्‍या निर्गुण रूपाशी अधिक संबंधित आहे; म्‍हणून श्रीरामाचा नामजप करतांना निर्गुण रूपाशी संबंधित असलेली शांतीची अनुभूती आली. श्रीकृष्‍णाचे तत्त्व श्रीविष्‍णूच्‍या सगुण रूपाशी अधिक संबंधित आहे; म्‍हणून श्रीकृष्‍णाचा नामजप करतांना निर्गुण रूपाशी अल्‍प निगडित असलेली आनंदाची अनुभूती आली. युगांनुसार देवतांचा त्‍या त्‍या रूपात कार्य करण्‍याचा स्‍तर पालटतो. त्‍यामुळे त्‍या रूपांनुसार अनुभूती येण्‍याचे स्‍वरूपही पालटते.

२ इ. देवतांच्‍या गुणवैशिष्‍ट्यांनुसारही अनुभूती आल्‍या. श्रीरामाचे नाव घेतले की, श्रीरामाची शांत मुद्रा असलेले रूप डोळ्‍यांसमोर येते. याउलट श्रीकृष्‍णाचे नाव घेतले की, श्रीकृष्‍णाची आनंदी मुद्रा असलेले रूप डोळ्‍यांसमोर येते. ‘श्रीकृष्‍णाने बाललीलांच्‍या माध्‍यमातून भक्‍तांना, तसेच रासक्रीडेच्‍या माध्‍यमातून गोपींना पुष्‍कळ आनंद दिला’, असे श्रीकृष्‍णाच्‍या चरित्रात आहे. श्रीरामाचा नामजप करतांना श्रीरामाच्‍या शांतीमय रूपाला जुळणारी शांतीची, तर श्रीकृष्‍णाचा नामजप करतांना श्रीकृष्‍णाच्‍या आनंददायी रूपाला जुळणारी आनंदाची अनुभूती आली.’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले (२६.३.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक