हे कसले लांच्छनास्पद शिक्षणमंत्री !
संत गोस्वामी तुलसीदास यांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहून रामभक्तांवर अनंत उपकार केले आहेत. हा ग्रंथ हिंदुस्थानातील अनेक लोकांचा नित्य वाचनातील ग्रंथ आहे. ४०० वर्षांहून अधिक वर्षे या ग्रंथाचे पारायण करणारे अनेक कुटुंबीय आपल्याला आढळतील. अशा पवित्र आणि लक्षावधी लोकांच्या प्राणप्रिय ग्रंथाविषयी अपशब्द उच्चारणे कुणाही व्यक्तीला शोभा देणारे नाही. असे असतांनाही राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी नालंदा विश्वविद्यालयाच्या १५ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांसमोर अकलेचे तारे तोडले. त्यांना संत गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या ‘श्रीरामचरितमानस’ या ग्रंथातील काही भाग मान्य नाही; म्हणून ‘तो ग्रंथ जाळून टाकावा’, असे विधान केले आहे. त्यांचे हे विधान म्हणजे बौद्धिक आणि वैचारिक विकृतीचे सर्वोच्च टोक आहे.
१. प्रभु श्रीरामांचे सागराने केलेले स्तवन
‘श्रीरामचरितमानस’ या ग्रंथातील सुंदरकांडातील ५ व्या सोपानात (अध्यायात) प्रभु श्रीराम सागरावर सेतू बांधण्यासाठी सिद्ध झाले. त्यासाठी सागराला त्यांनी साहाय्य करण्याची विनंती केली; पण सागर कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास सिद्ध झाला नाही. अखेरीस श्रीरामांनी रुद्र अवतार धारण केला. त्या वेळी घाबरून सागर श्रीरामांना शरण आला. श्रीरामांचे स्तवन करतांना सागर काय म्हणाला, ते एका चौपाईत (अभंगात) संत गोस्वामी तुलसीदास सांगतात…
प्रभु भल कीन्ह मोहि सिख दीन्हीं । मरजादा पुनि तुम्हारी कीन्ही ॥
ढोल, गंवार, शुद्र, पशु, नारी । सफल ताडना के अधिकारी ॥
भावार्थ : प्रभूंनी मला जी शिक्षा केली ते पुष्कळ चांगले झाले आणि चांगला मार्ग दाखवला. आपणच सर्व जीवांची मर्यादा (स्वभाव) निर्माण केली आहे. ढोल, अशिक्षित, शूद्र, पशू आणि स्त्री हे सर्व शिक्षणास पात्र आहेत.
२. संत गोस्वामी तुलसीदास यांच्या चौपाईतील शब्दांचे अर्थ
वर उल्लेखलेल्या चौपाईतील शब्दांचा अर्थच विपरीत केला आहे. आता आपण या विवादित चौपाईतील प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहू.
२ अ. ताडन आणि ताडना : या शिक्षणमंत्र्यांनी ‘ताडना’ या शब्दाचा अर्थ ‘ताडन’ असा घेतला. वास्तविक हे दोन स्वतंत्र शब्द आहेत आणि त्यांचे अर्थही भिन्न आहेत. ‘ताडन’ या शब्दाचे अर्थ मारणे, ओरडणे, दरडावणे असे विविध आहेत. ‘ताडना’ (मानसिक आणि शारीरिक स्तरांवर त्रास देणे) या शब्दाचे असेच विविध अर्थ आहेत.
२ आ. ढोल : या शब्दाचा अर्थ ढोलकी किंवा ढोलक असा आहे. तो तालात ठेक्यात वाजवण्यासाठी योग्य ते शिक्षण घ्यावे लागते. तसे शिक्षण घेतले नाही, तर केवळ आपला हात त्या ढोलकीवर किंवा ढोलकावर आपटला म्हणजे तो वाजतो, म्हणजेच त्यातून ध्वनी प्रकट होतो. कोणत्याही वस्तूवर आघात केल्यावर ध्वनी प्रकट होणारच; पण तो लयबद्ध, ठेक्याप्रमाणे वाजत नाही. म्हणून ढोल वाजवण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे.
२ इ. गंवार : म्हणजे गावंढळ, अशिक्षित ! त्यांना सुद्धा प्रशिक्षित करावे लागते. त्यांच्यावर संस्कार करण्याची नितांत आवश्यकता आहे. एखादा गावंढळ जर शिकण्यास सिद्ध झाला नाही, तर त्याला दरडावून शिकवावे लागते.
२ ई. शूद्र : ही जात नसून वर्ण आहे. माणूस जन्माला आल्यानंतर शूद्रच असतो आणि संस्काराने तो ज्ञानी होतो. अशा कोणत्याही प्रकारे ज्ञान संपादन न केलेल्या माणसाला ज्ञान संपादन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, म्हणजेच ज्ञानी होण्याचा अधिकार आहे.
२ उ. पशू : आपल्याला पशूची शक्ती आणि बळ यांचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी त्याला योग्य ते प्रशिक्षण द्यावे लागते. त्याखेरीज माणसाच्या तो उपयोगी पडत नाही.
२ ऊ. नारी : म्हणजे स्त्री. तिलाही शिक्षणाचा अधिकार असून तीसुद्धा सुशिक्षित असली पाहिजे. गार्गी, मैत्रेयी या महिला सुशिक्षित आणि सुसंस्कृत होत्या. मंडनमिश्र आणि आद्य शंकराचार्य यांच्यात झालेल्या शास्त्रार्थाचा निवाडा करण्यासाठी न्यायाधीश मंडनमिश्राची पत्नी उभय भारती होती. याचाच अर्थ ती विदुषी (विद्वान) होती, म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार होता.
३. शिक्षणमंत्र्यांचे बोलणे हे पदासाठी अपमानजनक !
असे विविध दाखले देऊन संदर्भासह अर्थ अनेक विद्वान आणि अभ्यासक यांनी वेळोवेळी स्पष्ट करून सांगितला आहे. तरीसुद्धा हिंदूंचे श्रेष्ठतम ग्रंथ, साधूसंत, देवीदेवता आणि श्रद्धास्थाने यांना कलंकित, अवमानित अन् त्यांच्याविषयी अनादर निर्माण करण्याचा हीन प्रयत्न एका शिक्षणमंत्र्याने स्नातकांसमोर (विद्यार्थ्यांसमोर) केला आहे. ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. ‘हा माणूस शिक्षणमंत्री पदासाठी पात्र आहे’, असे म्हणण्यासाठी बुद्धी सिद्ध होत नाही. एखादा कावळा राजवाड्याच्या छतावर बसला म्हणून तो गरुड होत नाही. त्याचप्रमाणे अपात्र माणूस उच्च पदावर विराजमान झाला म्हणून प्रकांडपंडित होत नाही. बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी त्या पदाचाही अपमान केला आहे. अशा लोकांविषयी याहून अधिक काय सांगावे ?
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (१३.१.२०२३)