‘म्हादई वाचवा’ मोहिमेचा आज विर्डी, सांखळी येथे मेळावा
म्हादई जलवाटप तंटा
गोव्यातील विरोधक संघटित
पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – विर्डी, सांखळी येथे १६ जानेवारीला होणार्या ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ मोहिमेच्या मेळाव्यासाठी सर्व पर्यावरणवादी, म्हादईप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी राजकीय पक्ष संघटित झाले आहेत. म्हादई वाचवण्यासाठी १६ जानेवारीला दुपारी ४ वाजता जनआंदोलनाला प्रारंभ होईल. ही गोव्याच्या अस्तित्वाची लढाई असून या मेळाव्यात सर्व गोमंतकियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ मोहिमेच्या वतीने पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
Save Mhadei meet on Jan 16 to be held on 10,000 sq m areahttps://t.co/e74NuORXfo#goa #Mhadei #river #wildlife #nature #saveriver #forest
— Gomantak Times (@Gomantak_Times) January 13, 2023
१६ जानेवारी हा गोव्यात जनमत कौल दिन म्हणून पाळला जातो. वर्ष १९६७ मध्ये या दिवशी गोमंतकियांनी ‘गोवा महाराष्ट्रात विलीन करावा कि नाही’, याविषयी मतदान केले होते. त्याच दिवसाचे औचित्य साधून म्हादई नदी वाचवण्यासाठी चळवळ प्रारंभ केली जाणार आहे, असे वक्त्यांनी सांगितले. सर्वांनी पक्ष, संघटना आदी बाजूला ठेवून मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्यात मुख्यमंत्र्यांसह सर्व ४० आमदारांना बोलावण्यात आले असून त्यांच्यासाठी ४० खुर्च्या ठेवण्यात येतील, असेही घोषित करण्यात आले.
(सौजन्य : Prudent Media Goa)
सांखळी येथे मेळाव्याला अनुमती न मिळाल्याने २ दिवसांपूर्वी मेळाव्याचे स्थळ विर्डी-सांखळी पुलाजवळ ठरवण्यात आले. म्हादई प्रश्नावरून रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली आहे. पक्षाचे नेते मनोज परब यांनी ‘१६ जानेवारीला स्वतंत्रपणे सभा घेणार’, असे म्हटले आहे, तर म्हादई पाणीतंटा हा राज्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने त्यासाठी ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ या चळवळीला पाठिंबा दर्शवण्याचा निर्णय रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे. काही प्रमुख नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाच्या मुख्य समितीचे सदस्य गौरेश गावकर, फोंड्याचे सनिश तिळवे, वास्कोचे आंद्रे व्हिएगश, दक्षिण गोव्यातील समितीचे सदस्य पिटर फर्नांडीस यांनी १५ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन म्हादई प्रश्नावरून पक्षाच्या धोरणाचा निषेध केला आणि म्हादई प्रश्नावरून राजकारण होत असल्याचे सांगून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले. १६ जानेवारीला रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे अधिवक्ता पुंडलिक रायकर यांनीही पक्षाचे नेते मनोज परब यांच्यावर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी देत ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ चळवळीला पाठिंबा दिला आहे.
म्हादईचा लढा नक्कीच जिंकू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी – वर्ष २०१२ पासून आतापर्यंत मोपा विमानतळ, तसेच खाणींच्या संदर्भातील लढायांमध्ये गोवा सरकारला यश मिळाले आहे. म्हादई संदर्भात मागील ३० वर्षांपासून कायदेशीर लाढाई चालू आहे. हा लढाही आम्ही नक्कीच जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. म्हादई सूत्रावरून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी १६ जानेवारीला गोमंतकियांना ऑनलाईन संबोधित केले.
CM Dr Pramod Sawant addressing people of Goa on Mhadei https://t.co/oiFUX4FCuw
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) January 15, 2023
ते पुढे म्हणाले, ‘‘म्हादईच्या रक्षणाची लढाई, ही आमच्या अस्मितेची लढाई आहे. आम्ही आमच्या महाधिवक्त्यांच्या माध्यमातून विविध स्तरांवर ही लढाई चालू ठेवली आहे. केंद्राने म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करावे, ही आमची पहिली मागणी आहे. केंद्राने आता संमत केलेला कर्नाटकचा सविस्तर प्रकल्प अहवाल रहित करावा. वन्यजीव संरक्षणाविषयी वन विभाग पत्रव्यवहार करत आहे. त्यामुळे म्हादईवरून कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी या प्रश्नावर संघटित रहावे. आम्ही या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना बोलावले होते; पण कुणीही आले नाही. ते आले असते आणि सर्वपक्षियांचे शिष्टमंडळ घेऊन मी केंद्रात गेलो असतो, तर माझीही बाजू भक्कम झाली असती; पण दुर्दैव ! विरोधकांना म्हादईच्या अस्तित्वाशी देणेघेणे नाही. त्यांना या विषयाचे केवळ राजकारण करायचे आहे, हे लक्षात घ्या.’’
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦