संपूर्ण भारतात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा !
आळंदी (पुणे) येथे विराट हिंदु जनगर्जना मोर्च्यात मागणी
आळंदी (जिल्हा पुणे) – येथे एका महिलेने येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी देऊन एका कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. या घटनेची नोंद घेत महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या संतभूमी अलंकापुरी नगरीत धर्माच्या रक्षणासाठी १४ जानेवारी या दिवशी ‘विराट हिंदु जनगर्जना मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात धर्मांतरबंदीचा कायदा लागू करावा, या मागणीला वाचा फोडण्यासाठी आणि याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. मोर्च्याचा प्रारंभ सद़्गुरु जोग महाराज संस्थेपासून ध्वजपूजनाने झाला. तेथून चाकण चौक, भैरवनाथ चौक मार्गे जाऊन शेवटी महाद्वार चौकात पसायदानाने मोर्च्याची सांगता झाली.
या मोर्च्यामध्ये ‘जय श्री राम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘भारतमाता की जय’, ‘आळंदीचे पावित्र्य राखलेच पाहिजे’, ‘धर्मांतरविरोधी कायदा झालाच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात येत होत्या. उपस्थित वारकरी ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करत होते. या मोर्च्यामध्ये वारकरी संप्रदाय, आळंदी आणि परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विविध गावांतील नागरिक, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहस्रोंच्या संख्येने सहभागी झाले होते. सकल हिंदु समाजाच्या वतीने या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.