‘शंकरवाडी’ हेच मेट्रो स्थानकाचे नाव कायम ठेवावे ! – आमदार रवींद्र वायकर
मुंबईमध्ये ‘मेट्रो ७’ मार्गावरील स्थानकाचे नाव पालटल्याचे प्रकरण
मुंबई – येथील दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) या ‘मेट्रो – ७’ प्रकल्पाचे काम चालू आहे. या मार्गावरील शंकरवाडी स्थानकाचे नाव ‘मोगरा विलेज’ करण्यात आले आहे. यापूर्वी असलेले ‘शंकरवाडी’ हेच नाव ठेवावे, अशी मागणी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आमदार रवींद्र वायकर यांनी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’चे आयुक्त श्रीनिवासन् यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शंकरवाडी स्थानकाचे नाव पालटल्याविषयी स्थानिकांनी आमदार रवींद्र वायकर यांची भेट घेऊन प्रशासनाविषयी असंतोष व्यक्त केला. याविषयी रवींद्र वायकर यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘शंकरवाडी’ हे नाव अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. शासकीय नोंदीतही हेच नाव आहे. हे नाव पालटून ‘मोगरा विलेज’ केल्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून ‘शंकरवाडी’ हेच नाव ठेवण्यात यावे.