ए.पी.एम्.सी. वाहतूक शाखेच्या वतीने ५०० हून अधिक रिक्शाचालकांचे प्रबोधन !
नवी मुंबई, १५ जानेवारी (वार्ता.) – ‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३’च्या निमित्ताने ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने ए.पी.एम्.सी. परिसरातील ५०० हून अधिक रिक्शाचालकांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरस्त्राण (हेल्मेट) घालण्याविषयी जनजागृती करून विनामूल्य शिरस्त्राणाचे वाटप करण्यात आले.
‘या जनजागृतीमुळे आमची वाहतूक नियमांविषयी पुन्हा एकदा उजळणी होऊन नियमांचे पालन करण्याविषयी अधिक गांभीर्य निर्माण झाले’, अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज रिक्शा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष नितीन भोसले यांनी व्यक्त केली.
या वेळी ए.पी.एम्.सी. वाहतूक शाखेच्या वाहतूक निरीक्षक विमल बिडवे यांनी वाहतूक पोलीस कर्मचार्यांसह ए.पी.एम्.सी. क्षेत्रातील विविध रिक्शा थांब्यावरील रिक्शाचालकांचे रस्ता वाहतुकीच्या संदर्भात प्रबोधन केले. यामध्ये वाहतुकीचे नियम पाळणे, नियमानुसार जेवढी प्रवासी वाहतूक करणे आवश्यक आहे, तितक्याच प्रवाशांची रिक्शातून वाहतूक करणे, रिक्शा चालवतांना खाकी किंवा पांढरा गणवेश परिधान करणे, ओळखपत्र आणि बॅच शर्टावर दर्शनी भागामध्ये लावलेला असणे, रिक्शाचे ‘फिटनेस’, ‘पीयूसी’, तसेच प्रवासी आणि चालक यांचा ‘इन्शुरन्स’ नियमितपणे अद्ययावत् ठेवणे, याची माहिती बिडवे यांनी उपस्थित रिक्शाचालकांना दिली. सिग्नल न तोडणे, विरुद्ध दिशेने रिक्शा न चालवणे, नियमानुसार भाडे घेणे, अतीवेगाने वाहन न चालवणे, मद्य पिऊन वाहन न चालवणे, ओव्हरटेक न करणे, ‘नो पार्किंग’ असलेल्या जागांमध्ये वाहने उभी न करणे याविषयीही प्रबोधन करण्यात आले.
प्रबोधन करूनही जे वरील नियमांचे पालन करण्यास चालढकल करत असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुतोवाच बिडवे यांनी केले.