स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांमुळे मनाला होत असलेली जखम बरी होण्यासाठी औषधरूपी स्वयंसूचना देण्याचे महत्त्व !
गुरुदेवांच्या कृपेने मला साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा मिळाली आहे. त्याविषयी चिंतन करतांना गुरुदेवांनी मला सुचवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. बर्फाच्या खड्याला उष्णता मिळाल्यावर तो वितळतो, त्याप्रमाणे मनाला सकारात्मक दृष्टीकोनाची ऊर्जा मिळाल्यावर स्वभावदोषांचा खडा विरघळून मन गुरुचरणी समर्पित होण्यासाठी लायक होत असणे
आपण स्वतःच्या मतावर ठाम न रहाता (आपले मन कठोर न करता) सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, सद़्गुरु, संत आणि उत्तरदायी साधक यांनी दिलेले दृष्टीकोन स्वीकारले, तर आपली साधना करण्याची तळमळ वाढते. आपण स्वभावदोषांना कवटाळून बसल्यास आपल्याला प्रसंगांना सामोरे जातांना संघर्ष करावा लागतो. आपल्याला वाईट वाटते. आपण नकारात्मक स्थितीत जातो. बर्फाचा खडा कठीण आणि धारदार असतो; मात्र त्याला उष्णता मिळाल्यावर तो वितळून त्याचे पाणी होते. त्याप्रमाणे आपण मनाला दिलेल्या सकारात्मक दृष्टीकोनाची ऊर्जा आपल्यातील स्वभावदोषांचा खडा विरघळवून टाकते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, सद़्गुरु, संत आणि उत्तरदायी साधक यांनी दिलेली शिकवण अन् दृष्टीकोन मनापासून स्वीकारून ते आचरणात आणले, तर स्वभावदोषांचा खडा विरघळतो आणि आपले मन गुरुचरणी समर्पित होण्यासाठी लायक होते.
२. आपण स्वतःच्या स्तरावर स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न केल्यास स्वभावदोष दूर होण्यास वेळ लागत असणे; मात्र परमेश्वराला शरण गेल्यावर तो आपल्याला आवश्यक ती क्षमता आणि सकारात्मक विचार देऊन आपले रक्षण करत असणे
आपण स्वतःच्या स्तरावर प्रयत्न न करता परमेश्वराला शरण गेलो, तर तो आपल्याला स्वभावदोष दूर करण्यासाठी आवश्यक क्षमता आणि सकारात्मक विचार देऊन आपले रक्षण करतो. आपण आपल्यातील स्वभावदोषांमुळे एखाद्या परिस्थितीत अडकल्यास मनाशी म्हणतो, ‘हे माझ्यातील स्वभावदोषांमुळे घडले. माझा स्वभावदोष पुन:पुन्हा प्रकट होत आहे. मी काय करू ? मी यातून बाहेर कसे पडू ? यातून माझी सुटका कशी होईल ? या स्वभावदोषामुळे माझी साधना होत नाही. यातून बाहेर पडायला मी न्यून पडत आहे.’ आपण निराश होतो. आपले मन खचते आणि आपला उत्साह हरवतो. आपल्या चेहर्यावर हे स्पष्टपणे दिसून येते. आपण नकारात्मक स्थितीत जाऊन परमेश्वराला विसरतो. आपण निराशेच्या कोषात स्वतःला कोंडून घेतो. स्वतःच्या स्तरावर ‘यातून बाहेर कसे पडायचे ?’, याचा विचार करण्यात काही वेळा काही साधकांचे काही घंटे, दिवस किंवा मास निघून जातात. आपण आनंदापासून वंचित रहातो आणि दुःखी होतो. आपण स्वतःच्या स्तरावर असा विचार करत राहिलो, तर त्या प्रसंगातून आणि स्वभावदोषांतून सुटका व्हायला आपल्याला पुष्कळ वेळ लागेल. आपण प्रसंगात स्वतःच्या स्तरावर विचार न करता देवाचे साहाय्य घेतले, तर आपण प्रसंगातून आणि स्वभावदोषांतून लवकर मुक्त होऊ शकतो.
३. प्रसंगात परमेश्वराला शरण जाऊन प्रार्थना केल्यास प्रसंगातून बाहेर पडण्यास साहाय्य होणे
साधकांनी परमेश्वराला शरण जाऊन प्रार्थना करावी, ‘भगवंता, मला या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे ?, ते मला कळत नाही. तूच मला साहाय्य कर. या प्रसंगात माझ्यातील स्वभावदोषांमुळे मला तुझ्या अनुसंधानात रहाता येत नाही. मी असमर्थ आहे. या स्वभावदोषांमुळे मी माझा आनंद हरवला आहे. आनंद देणारा तूच आहेस. मला साहाय्य कर, मला साहाय्य कर.’’ आपण भगवंताला असे आर्ततेने शरण गेलो, तर परमेश्वर नक्कीच कुणाच्या तरी माध्यमातून आपल्यापर्यंत येईल किंवा आपल्याला योग्य सकारात्मक विचार देईल. परमेश्वर आपल्याला ते विचार जाणण्याची क्षमता देऊन, कृतीत आणून त्या स्वभावदोषांतून मुक्त करील आणि त्या परिस्थितीतून बाहेर काढील.
४. देवाचे साहाय्य घेतल्यावर विहंगम गतीने साधना होत असणे
वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करणे, म्हणजे एखाद्या विशिष्ट गावी पोचण्यासाठी बैलगाडीने प्रवास करण्यासारखे आहे. देवाचे साहाय्य घेणे, म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी विमानाने प्रवास करण्यासारखे आहे.
५. मनाला सकारात्मक दृष्टीकोन देणार्या स्वयंसूचना देण्याचे महत्त्व
आपल्यातील स्वभावदोषांमुळे आपल्याकडून अनेक चुका होत असतात. त्यांचा आपल्यालाही त्रास होतो, तसेच समष्टीलाही त्रास होतो. कधी कधी आपल्यातील स्वभावदोषांमुळे आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात आणि आपले मन दुखावले जाते. आपण त्याविषयी कितीही विसरायचा प्रयत्न केला, तरी विसरत नाही. आपण दिवसभरात ३० ते ४० नकारात्मक विचार करून आपल्या मनाला टोचत असतो. नंतर मनातील नकारात्मक विचारांचे केंद्र एका मोठ्या जखमेच्या रूपाने आपल्याला त्रास देऊ लागते. जखम मोठी झाल्यावर ती बरी होण्यासाठी आपण ५ – ६ वेळा तिला आवश्यक असलेले औषधाचे लेप (स्वयंसूचना देतो) लावतो. त्या खोल जखमेवर वारंवार औषधोपचार केले, तरच जखम लवकर बरी होते. आपण प्रसंगाबद्दल नकारात्मक विचार केल्यास मनाला दुखापत होते आणि आपण थकून जातो. आपण मनाला दिवसातून १५ ते २० वेळा स्वयंसूचना (औषध) दिल्या, तर ती खोल जखम (स्वभावदोष) अल्प कालावधीत बरी होऊ शकते. मनातील नकारात्मक जखमेवर (स्वभावदोषांवर) सकारात्मक औषध (स्वयंसूचना देणे) अनेक वेळा लावल्याने जखम लवकर बरी होऊ शकते. यातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्वभावदोष अधिक असलेल्या साधकांना दिवसातून १५ ते २० वेळा स्वयंसूचना देण्यास का सांगतात ?’, हे माझ्या लक्षात आले.
हे गुरुदेवा, तुम्हीच सुचवलेली ही सूत्रे तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतल्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– श्रीमती मीरा करी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०२२)