देवद येथील सनातनच्या आश्रमातील आनंद, उत्साह आणि चैतन्य यांनी भारलेले साधक अन् देवद आश्रमातील विलक्षण पालट झालेले वातावरण !
देवद आश्रमात झालेले पालट इतके आश्चर्यकारक आहेत की, त्यासंदर्भात काहीतरी सर्वांना कळावे म्हणून ‘लेख लिहावा’ असे मला वाटत होते. पण मी लेख लिहिण्याआधीच सौ. कीर्ती जाधव हिने आधीच एक इतका परिपूर्ण लेख लिहिला आहे की, आता मी लेख लिहिण्याची मला आवश्यकता वाटत नाही. कीर्तीचे अभिनंदन करावे तेवढे थोडे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१३ ते वर्ष २०१५ या कालावधीत मी पूर्णवेळ देवद आश्रमात राहून साधना आणि सेवा करत होते. त्यानंतर मी रामनाथी आश्रमात सेवेसाठी गेले. वर्ष २०२१ मध्ये देवाने मला पुन्हा देवद आश्रमात काही दिवस सेवेसाठी येण्याची संधी दिली. देवद आश्रमात आल्यावर मला ‘आश्रमात पुष्कळ पालट झाला आहे’, असे जाणवले. ‘देवाने मला आश्रमातील वातावरण आणि साधक यांमध्ये झालेले चांगले पालट अनुभवण्याची अन् त्यातून शिकण्याची संधी दिली’, असे मला वाटले.
१. त्रासदायक शक्तीचे आवरण एका क्षणात नष्ट झाल्याचे जाणवणे
आश्रमाच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताक्षणी माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे सर्व आवरण एका क्षणात नष्ट झाले.
२. चैतन्यात वाढ होणे
५ – ६ वर्षांनंतर देवद आश्रमात आल्यावर मला ‘आश्रमातील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे’, असे जाणवले.
३. साधकांना भेटल्यावर आश्रमातील वातावरण आणि साधक यांविषयी जाणवलेली सूत्रे
आश्रमात आल्यावर मी सर्व साधकांना भेटले. तेव्हा मला आश्रमातील वातावरण आणि साधक यांमध्ये विलक्षण पालट जाणवला. देवद आश्रमाची पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यात मला जाणवलेला पालट बाजूच्या सारणीत दिला आहे.
४. आश्रमातील सर्व वयस्कर साधक उत्साही आणि आनंदी असून ‘तरुणांना लाजवतील’, अशी सेवा करत असणे
सर्व सूत्रांपेक्षा मला एक सूत्र विशेष महत्त्वाचेे वाटले, ‘देवद आश्रमात वयस्कर साधकांची संख्या तरुणांपेक्षाही अधिक आहे; पण आश्रमातील सर्व वयस्कर साधक ‘तरुणांना लाजवेल’, अशी सेवा करतात. सर्व वयस्कर साधक रात्री वेळेत झोपून सकाळी लवकर उठतात. त्यांची दिनचर्या त्यांच्या नियोजनाप्रमाणे अगदी काटेकोरपणे चालू असते. सर्व वयस्कर साधकही अत्यंत उत्साही आणि आनंदी असतात.
५. सर्व साधकांकडे पाहून उत्साह वाटून ‘त्यांच्याप्रमाणे झोकून देऊन अधिक तळमळीने प्रयत्न करूया’, असे वाटणे अन् परिणामी आधीच्या तुलनेत साधिकेच्या प्रयत्नांच्या गतीत वाढ होणे
आश्रमातील सर्व जण आता त्यांच्या सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांतून आनंद घेतांना दिसतात. त्यामुळे साधकांकडे पाहून माझाही साधनेचा उत्साह वाढला असून ‘यांच्याप्रमाणे झोकून देऊन तळमळीने प्रयत्न करायला हवेत’, असे मला वाटू लागले आहे. परिणामी आधीच्या तुलनेत माझ्या प्रयत्नांची गती वाढली आहे.
६. साधकांमधील चांगल्या पालटांमुळे आश्रमातील वातावरणात उत्साह आणि आनंद यांचे प्रमाण वाढले आहे. देवद आश्रमाविषयी लिहून देतांनाही मला पुष्कळ आनंद जाणवत आहे.
७. कृतज्ञता
अलीकडे माझ्या साधनेचे प्रयत्न न्यून झाले होते. त्यामुळे देवद आश्रमात आल्यावर मला वाटले, ‘माझे साधनेचे प्रयत्न वाढण्यासाठी आणि देवद आश्रमातील साधकांकडून भाव अन् तळमळ शिकण्यासाठीच देवाने मला इकडे पाठवले आहे.’ यासाठी मी भगवंताच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
८. प्रार्थना
‘हे गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुझ्याच कृपेने मला देवद आश्रमातील आनंद, उत्साह आणि साधनेचे आध्यात्मिक वातावरण अनुभवण्याची अन् त्यातून शिकण्याची संधी मिळाली. तुला अपेक्षित असे मला शिकता येऊन माझ्यामध्ये साधनेची तळमळ निर्माण होऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना करते.’
– सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.२.२०२१)