द्वेष पसरवणार्या वृत्तनिवेदकांना हटवा ! – सर्वोच्च न्यायालय
नवी देहली – टी.आर्.पी.साठी (‘टार्गेट रेटिंग पॉईंट’साठी) वृत्तवाहिन्या बातम्या सनसनाटी बनवतात. द्वेष पसरवणार्या वृत्तनिवेदकांना कार्यक्रमांतून हटवले पाहिजे. द्वेष पसरवणार्या गोष्टी देशासाठी धोकादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकांवरील सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. आक्षेपार्ह आणि द्वेषपूर्ण विधानांवर कारवाई करण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील मत व्यक्त केले.
१. सुनावणीच्या वेळी ‘न्यूज ब्रॉडकास्टर्स आणि डिजिटल असोसिएशन’कडून (‘एन्.बी.एस्.ए.’कडून) सांगिण्यात आले की, आम्ही या संदर्भातील प्रकरणांची सुनावणी करत आहोत. वादग्रस्त व्हिडिओ हटवले जातात; मात्र सुदर्शन टीव्ही, रिपब्लिक टीव्ही यांसारख्या काही वाहिन्या आमच्या सदस्य नाहीत.
२. उत्तराखंड सरकारने न्यायालयात सांगितले की, त्यांच्या राज्यात द्वेषपूर्ण विधानांच्या संदर्भात एकूण ११८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
३. उत्तरप्रदेश सरकारने सांगितले की, द्वेषपूण विधानांविषयी तेथे एकूण ५८१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
४. केंद्र सरकारने सांगितले की, जोपर्यंत गंभीर समस्या निर्माण होत नाही अथवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा प्रकरणांत केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही.
न्यायालयाने मांडलेली सूत्रे
अ. सर्व काही टी.आर्.पी.साठी चालत आहे. वृत्तवाहिन्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. त्या घटनांचे सनसनाटी पद्धतीने सादरीकरण करतात. दृश्यांद्वारे ते समाजामध्ये फूट पाडत आहेत. वृत्तपत्रांच्या तुलनेत वृत्तवाहिन्या लोकांना अधिक प्रभावित करत असतात. आपले दर्शक असे प्रसारण पहाण्याइतपत सक्षम आहेत का ?
आ. न्यायालयाने या वेळी ‘एन्.बी.एस्.ए.’च्या अधिवक्त्यांना विचारले की, जर वृत्तवाहिन्यांवर कार्यक्रम सादर करणारा सूत्रसंचालक समस्या निर्माण करत असेल, तर काय केले पाहिजे ? ‘एन्.बी.एस्.ए.’ने या संदर्भात पक्षपात करू नये. त्यांनी किती वेळा अशा सूत्रसंचालकांना हटवले आहे ? थेट प्रक्षेपित होणार्या कार्यक्रमांना सूत्रसंचालकच उत्तरदायी असतो; कारण त्याच्याकडे त्याचे नियंत्रण असते. जर तो निष्पक्ष नसेल आणि एकाच पक्षाची बाजू समोर आणत असेल, तर तो दुसर्या पक्षाचा आवाज बंद करू शकतो, एका पक्षाविषयी प्रश्न उपस्थित करणार नाही. एका प्रकारे हा पक्षपातच आहे.
इ. वृत्तवाहिन्यांवरील वृत्तांचा परिणाम संपूर्ण देशावर होत असतो. त्यांनी लक्षात ठेवायला हवे की, त्यांना त्यांच्या मनातील गोष्टी सांगण्याचा अधिकार नाही. जे सूत्रसंचालक कार्यक्रमाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांना हटवून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल केला पाहिजे.
ई. जेव्हा एखादी वृत्तवाहिनी लोकांना बोलावते, तेव्हा ती लोकांना शिव्याही देते. उदाहरण म्हणून पाहिले तर नुकतेच एका व्यक्तीने विमानामध्ये एका महिलेवर लघवी केल्याची घटना घडली. त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर माध्यमांनी तिच्याविरोधात अश्लाघ्य शब्दांचा वापर केला. हा प्रकार एका खटल्यासारखा आहे. कृपया कुणाला अपकीर्त करू नका. प्रत्येकाला अस्मिता आहे.