तमिळनाडूतील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा !
इस्लामी कट्टरतावादी आणि माओवादी यांच्याकडून मिळत आहेत धमक्या !
(‘झेड-प्लस’ सुरक्षा म्हणजे भरभक्कम सुरक्षा)
चेन्नई – राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांना सातत्याने इस्लामी कट्टरतावादी आणि माओवादी यांच्याकडून धमक्या मिळत असल्याने त्यांना ‘झेड-प्लस’ (भरभक्कम) सुरक्षा देण्यात आली आहे. (अण्णामलाई यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासह त्यांना धमक्या देणार्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा केली, तरच इस्लामी कट्टरतावादी आणि माओवादी यांच्यावर जरब बसेल ! – संपादक) गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर ही सुरक्षा पुरवण्यात आली. या सुरक्षेच्या अंतर्गत त्यांच्या समवेत ३० ते ३३ कमांडो असणार आहेत. ३८ वर्षीय अण्णामलाई हे निवृत्त आय.पी.एस्. अधिकारी आहेत. ते सातत्याने इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात बोलत असतात. कोइम्बतूर येथील बाँबस्फोटानंतर त्यांनी इस्लामी कट्टरतावादावर प्रखर टीका केली होती. तेव्हापासून त्यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. याची नोंद केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली होती.