हिंदु धर्मशास्त्र आणि जातीव्यवस्था !
भारताचे जगभरात नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. अनुमाने २ सहस्र वर्षांपूर्वीच्या भारतात जातींची सैद्धांतिक आणि व्यावहारिक स्थिती कशी होती ? हे माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात शशी शेखर शर्मा यांच्या ‘धर्मशास्त्र आणि जातींचे वास्तव’, या पुस्तकामध्ये या मान्यतांचे एक अत्यंत रोचक आणि परिपूर्ण परीक्षण मिळते. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
१. विदेशी विद्वान आणि संशोधक यांनी शेकडो वर्षांपूर्वी वर्तवलेली भारतातील जातींची सैद्धांतिक अन् व्यावहारिक स्थिती !
भारताचे सहस्रो वर्षांपासून जगात एक विशेष स्थान आहे. याविषयी मागील २ सहस्र ५०० वर्षांपासून अनेक विदेशींचे ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत. त्यातील अनेक जणांनी बराच काळ भारतात घालवला आहे. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणातून येथील इतिहास आणि जनजीवन यांच्याविषयीची प्रत्यक्ष माहिती मिळते, ज्यावर शंका घेण्यास जागा नाही. विशेषत: निरनिराळ्या कालखंडात आणि विविध देशांमधून आलेले ते विदेशी विद्वान अन् संशोधक यांच्या गोष्टींची तुलनाही त्यांच्या प्रामाणिकतेला पुष्टी देतात. त्यामुळे २ सहस्र, १ सहस्र किंवा ४०० वर्षांपूर्वी भारतात जातींची सैद्धांतिक आणि व्यावहारिक स्थिती कशी होती ? हे समजून घेणे, हे अत्यंत मजेशीर आणि महत्त्वाचे आहे. त्याला सध्याच्या प्रचलित बौद्धिक धारणांसमोर ठेवून तपासणेही आवश्यक आहे. याविषयी शशी शेखर शर्मा यांच्या ‘धर्मशास्त्र एवं जातीयों का सच’ (धर्मशास्त्र आणि जातींचे वास्तव) या पुस्तकामध्ये या धारणांचे एक अत्यंत मजेशीर आणि परिपूर्ण परीक्षण मिळते. हे पुस्तक देहलीच्या ‘प्रभात प्रकाशना’ने छापले आहे.
१ अ. ‘सर्व जाती-प्रजातींच्या समान अधिकारांचा आदर करणारे भारतीय’, असे म्हणणारा ग्रीक इतिहासकार मेगास्थनीज !
या पुस्तकात सर्वाधिक जुने आणि ठोस पुरावे ग्रीक इतिहासकार मेगास्थनीजचे (ख्रिस्त पूर्व ३५०-२९०) मिळतात, ज्याने भारतात पुष्कळ काळ घालवला होता. त्याच्या ‘इंडिका’ या पुस्तकात लिहिले आहे, ‘भारतीय लोक साधनसंपन्न आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरयष्टीचा दर्जा प्रमाणापेक्षा अधिक आहे. त्यांना त्यांच्या बांधेसूद आकारावरून ओळखता येऊ शकते. भारतात कधी दुष्काळ पडला नाही आणि पौष्टिक अन्नाचीही कधी न्यूनता राहिली नाही. येथील लोकसंख्येत असंख्य आणि विविध जाती-प्रजातींचे लोक रहातात. त्यात एकही मूळ विदेशी नव्हता, तर सर्व स्थानिक होते.’ मेगास्थनीज याने हिंदु प्रथांविषयीही सांगितले. त्याविषयी त्याने म्हटले आहे, ‘भारतियांमध्ये एक स्थापित विधी आहे की, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यातील कुणालाही गुलाम बनवले जाऊ शकत नाही. उलट आपले स्वातंत्र्य भोगतांना सर्व लोक अन्य सर्वांच्या समान अधिकारांचा आदर करतील.’
मेगास्थनीज याला भारत ७ सामाजिक श्रेणींमध्ये संघटित दिसून आला; परंतु त्याच्या विवरणामध्ये शुद्रांचा कुठेच उल्लेख नाही. तत्कालीन भारतीय समाजात कुणी पीडित असल्याची शक्यता दिसत नाही. तो परत परत केवळ भारतियांची मुक्त, सरळ आणि मोकळी प्रवृत्ती यांच्याविषयी सांगतो. मेगास्थनीजला दिसले की, भारतीय कायदे सरळ आहेत आणि लोक कायद्याला अल्प प्रमाणात शरण जात होते.
१ आ. भारतीय समाजात कोणत्या शुद्र किंवा पीडित वर्गाचा उल्लेख न करणारा ग्रीक इतिहासकार आर्रियन !
दुसरा ग्रीक इतिहासकार आर्रियन (वर्ष ८६-१६०) यानेही त्या गोष्टींना दुजोरा दिला. तसेच त्याने असेही लिहिले, ‘भारतीय लोक त्यांचे काम आणि व्यवसाय करत होते, तसेच त्यांच्याच समाजात लग्न करणे पसंद करत होते. आर्रियन यानेही भारतीय समाजात कोणत्या शुद्र किंवा पीडित वर्गाचा उल्लेख केला नाही. उलट तर्कवाद्यांचे (ब्राह्मणांचे) जीवन सर्वांत कठीण असल्याचे सांगितले.
१ इ. भारतात शुद्र किंवा पीडित जातींचा प्रसंग आढळून न येण्याविषयी सांगणारे प्रसिद्ध चिनी विद्वान फाहियान !
प्रसिद्ध चिनी विद्वान फाहियान (वर्ष ३३७-४२२) चे विस्तृत विवरण आढळून येते. तो अनेक वर्षांपर्यंत भारतात राहिला होता आणि त्याने येथे पुष्कळ भ्रमण केले होते. त्याने मथुरा आणि जवळपासच्या साम्राज्याविषयी लिहिले आहे. त्याने लिहिले आहे, ‘लोक प्राचुर्य (विपुल) साधनसंपत्तीत आणि प्रसन्नतेने रहातात. त्यांना ना लोकसंख्येचे वहीखाते माहिती आहे ना दंडाधिकारी आणि कायदे. त्यांच्यावर राज्य करण्यासाठी राजांना दंडात्मक यंत्रणेचीही आवश्यकता नाही. या देशाचे लोक कोणत्याही जिवाची हत्या करत नव्हते.’ याच संदर्भात फाहियान याने चांडाळांचा उल्लेख केला आहे की, ते शिकार आणि मांसविक्रीचे काम करत होते. केवळ या कारणाने त्यांची घरे शहर किंवा गावांच्या बाहेर होती. काही विद्वानांनुसार फाहियान याने चांडाळ म्हणून खाटिकांचा उल्लेख केला आहे. जे काही असेल; पण फाहियानच्या वर्णनामध्ये कोणत्याही शुद्र किंवा पीडित जातींचा प्रसंग आढळून येत नाही. त्यांनी चांडाळांनाही ‘पीडित’ म्हटले नव्हते.
१ ई. भारतात कोणत्याही जातीचा छळ न झाल्याचे सांगणारा चिनी विद्वान हुएन सांग !
याच प्रकारे चिनी विद्वान हुएन सांग (वर्ष ६०२-६६४) हाही ८ वर्षांहून अधिक काळ भारतात राहिला होता. त्याने १५ मास नालंदामध्ये अध्ययन केले होते. त्याने ब्राह्मणांवर जरूर टीका केली; पण त्याने ब्राह्मणांचे पावित्र्य आणि शालीनता यांची प्रसिद्धीही केली आहे. त्या काळी चिनी भारताला ‘इंतु’ म्हणजे चंद्र म्हणत असत; कारण येथील ऋषि आणि साधूसंत यांच्या ज्ञानाचा प्रकाश विश्वाला चंद्रासारखे मार्गदर्शन करत होता. त्यामुळे हा देश सुप्रसिद्ध झाला.
हुएन सांग यानेही गावाच्या बाहेर रहाणार्या समुदायाचा उल्लेख विशेष व्यवसायाच्या आधारे केला आहे, जसे खाटीक, कोळी, नर्तक, जल्लाद आदी; परंतु ते कोणत्याही शोषण किंवा छळ यांनी पीडित असल्याचे सांगितले नाही. वास्तविक त्यांचे ज्या प्रसन्न चित्ताने आणि सहजतेने वर्णन केल्याचे आढळून येते, त्यातून हेच समजते की, हुएन सांग सहज, शांतीप्रिय, सामंजस्यपूर्ण समाजाची गोष्ट करत आहे. त्याने भारतात ‘चार वर्णां’चीही चर्चा केली आहे. ज्यात शुद्र शेतकरी जे नांगर चालवून शेती करण्याचे काम करत होते.
कायदा आणि व्यवस्थेविषयी हुएन सांग याने धर्मशास्त्र, स्मृति आदींचा कोणताही उल्लेख केला नाही; परंतु त्याने येथील प्रशासन सरळ असल्याचे सांगितले. राज्यांकडून कुटुंबांची नोंदणी होत नव्हती आणि कुणाकडूनही बलपूर्वक काम करून घेतले जात नव्हते. मांसाहाराला वाईट समजले जात होते. त्यामुळे मांसाहारी लोक शहराच्या बाहेर थोडे दूर रहात होते; परंतु कोणत्याही जातीच्या छळवादाचा संकेत हुएन सांग यानेही केला नाही.
१ उ. भारतीय समाजात कोणताही भेदभाव न आढळणारा इराणी विद्वान अल् बरूनी
प्रसिद्ध इराणी विद्वान अल् बरूनी (वर्ष ९७३-१०४८) यानेही भारतात विस्तृत भ्रमण केले होते. त्याने भारतीय दर्शन, विज्ञान, गणित आणि महान शास्त्रे यांचे अध्ययन करण्यासह सामाजिक जीवनही खोलवर पाहिले होते. त्याने स्वत: ‘महाभारत’ आणि ‘रामायण’ वाचले होते. तसेच ‘पतंजलि’, ‘भगवद्गीता’ यांसह अनेक ग्रंथांचे त्याने फारसी भाषेत भाषांतरही केले होते. बरूनीच्या विवरणांमध्ये धर्मशास्त्रांच्या नावाचाही उल्लेख नाही. केवळ एकदा त्याने मनुस्मृतीचा उल्लेख केला; पण तेही तिला कोणतेही महत्त्व न देता. बरूनीच्या संपूर्ण लेखनामधून एवढाच निष्कर्ष निघू शकतो की, भारतीय समाजात दर्शन, विज्ञान, योग आणि महाकाव्ये यांचाच अधिक प्रभाव होता.
अल् बरूनीच्या विस्तृत सामाजिक वर्णनांमध्येही कोणतेही सामाजिक शोषण किंवा दमन यांचा उल्लेख नाही. उलट त्याने हिंदूंच्या ३ विशेष गुणांची नोंद घेतली होती.
१. हिंदु लोक मृत्यूला घाबरत नाहीत.
२. ते खोटे बोलत नाहीत.
३. त्यांना त्यांच्या ज्ञानाचा मोठा अभिमान आहे.
अल् बरूनीला भारतीय समाजात कोणताही भेदभाव किंवा लहान-मोठा भेद दिसून आला नाही. त्याने लिहिले की, हिंदू त्यांच्या सामाजिक समूहाला ‘वर्ण किंवा रंग’ यांनी पुकारत होते आणि जन्मानुसार संघटित वाटत होते; पण सर्व वर्णांचे लोक एकत्र रहात होते. वैश्य आणि शुद्र यांच्यात विशेष अंतर नव्हते. बरूनी यानेही विशेष व्यवसाय करणारे समूह स्वत:च शहराच्या बाहेर रहात असल्याचा उल्लेख केला आहे, ज्यांना अंत्यज समुदाय (शूद्र जातीच्या खालील समाज) म्हटले आहे; परंतु त्यांची सामूहिक स्थिती सशक्त सांगितली आहे. कोणत्याही मान्यता किंवा धर्मशास्त्र यांच्यानुसार कुणाला नीच समजण्याचा कोणताही संकेत अल् बरूनी याने दिला नाही.
१ ऊ. जगप्रसिद्ध इतालवी खोजी आणि कूटनीती तज्ञ मार्काे पोलो, फ्रेंच डॉ. फ्रांस्वा बर्नियर आणि जर्मन मिशनरी जोसेफ टायफेनथालेर
अशाच प्रकारे पुढे जगप्रसिद्ध इतालवी खोजी आणि कूटनीती तज्ञ मार्काे पोलो (वर्ष १२५४-१३२४), फ्रेंच डॉ. फ्रांस्वा बर्नियर (वर्ष १६२५-१६८८) जर्मन मिशनरी जोसेफ टायफेनथालेर (वर्ष १७१०-१७८५) इत्यादींच्या विस्तृत वर्णनांमध्येही भारतीय समाजाची अनेक वैशिष्ट्ये आढळून येतात. त्यात सर्वाधिक अनोखी गोष्ट हीच आहे की, कुणीही हिंदु समाजात कोणतीही गुलामी, सामाजिक द्वेष, शोषण-छळवणूक आदींचा थोडा संकेतही दिलेला नाही. उलट बर्नियर आणि टायफेनथालेर यांनी मुसलमान राजवटीतील हिंदूंच्या वाईट स्थितीचे अनेक वेळा वर्णन केले आहे.
२. भारतात अनेक शतकांपासून जातीभेद असल्याचा खोटा अपप्रचार करणार्यांचा शोध घेणे आवश्यक !
अशा पद्धतीने भारताच्या इतिहासातील २ सहस्र ५०० वर्षांमध्ये सरासरी दृष्टीने पाहिले, तर परकीय अवलोकन करणार्या विविध इतिहासकारांनी ‘भारतीय समाजात जातीय संबंधांच्या स्थितीमध्ये कोणतीही नकारात्मक गोष्ट दर्शवत नाही’, असे सांगितले आहे. असे काही असते, तर एखाद्या विदेशी विद्वानाची दृष्टी ते स्पष्टपणे पाहू शकली असती. त्यामुळे सत्य हेच आहे की, भारतात अनेक शतकांपासून जातीभेद असल्याच्या अनेक खोट्या गोष्टी रेटण्यात आल्या असून त्या राजकारणाने प्रेरित आहेत. भारतात जातीभेद हा अनेक शतकांपासून जुना आणि हिंदु धर्माचे अंग असल्याचे सांगणे, खोटे लिहिणे अन् प्रसारित करणे केव्हापासून चालू झाले ? आणि कुणी चालू केले ? याचा शोध घेणे आवश्यक आहे. ज्यावर कधी ना कधी वेगळा विचार करणे उपयुक्त ठरेल.
३. भारतातील सामाजिक इतिहासाला कलुषित होण्यापासून वाचवणे ही काळाची आवश्यकता !
भारतात जातीवर आधारित समाज असणे आणि क्रूर धर्मशास्त्रीय नियमांनी राज्य चालण्यासारख्या खोट्या गोष्टी ब्रिटीश राजवटीच्या काळातच प्रसारित करणे चालू झाले होते. शशी शेखर शर्मा यांचे हे पुस्तक याला मोठ्या प्रामाणिकपणे दाखवते. थोड्या संशोधनानेही दिसते की, भारतीय इतिहासाच्या संदर्भात अशा कुटील गोष्टी प्रसारित करण्यात ख्रिस्ती मिशनरींची सर्वांत महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांनी ‘फोडा आणि राज्य करा’, याप्रमाणे ‘द्वेष पसरवा आणि धर्मांतरित करा’, याचे शैक्षणिक-प्रचारात्मक धोरण स्वीकारले.
या सर्व अलीकडच्या गोष्टी आहेत की, याचे कुणीही स्वत: परीक्षण करू शकतो. वास्तविक अलीकडे अनेक विदेशी विद्वानांनीही याची नोंद घेतली आहे; परंतु दुर्दैवाने यात भारतातच चालू असलेले संकीर्ण राजकारण आणि निहित स्वार्थ यांमुळे आडकाठी टाकण्याचे काम केले जाते, तसेच खोट्या प्रचारांना आश्रय दिला जातो. आपल्याला हे योग्य प्रकारे ओळखून आपल्या सामाजिक इतिहासाला कलुषित होण्यापासून वाचवणे आवश्यक आहे.’
– प्रा. शंकर शरण, देहली (डिसेंबर २०२२)
(लेखक राजकारणशास्त्राचे प्राध्यापक आणि वरिष्ठ स्तंभकार आहेत.)