वस्तू आणि सेवा कर भरण्याविषयीच्या अडचणी सोडवण्यासाठी आज कुडाळ येथे सभा
कुडाळ – केंद्र आणि राज्य सरकार यांच्या वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) खात्याच्या काही अधिकार्यांची मनमानी चालू आहे. जी.एस्.टी. कायद्यातील कलम १६(४)मधील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून व्यापार्यांना वेठीस धरल्याच्या अनेक तक्रारी व्यापारी महासंघाकडे प्राप्त झाल्या आहेत. कर भरूनही व्यापार्यांना त्रास दिला जातो. या माध्यमातून नियमितपणे कर भरणार्या व्यापार्यांना देशोधडीला लावण्याचा केला जाणारा प्रयत्न उधळून लावायचा आहे. यासाठी व्यापार्यांना येणार्या अडचणींची माहिती संकलित करून पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यासाठी व्यापारी महासंघ आणि जी.एस्.टी. टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जानेवारी या दिवशी दुपारी ३.३० वाजता कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या सामाईक सुविधा केंद्रात सभेचे आयोजन केले आहे. या सभेला जी.एस्.टी.च्या अनुषंगाने अडचणी असलेल्या सर्व संबंधितांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर आणि सागर तेली यांनी केले आहे.