अवैध वाळूची वाहतूक करणारे गोवा आणि सिंधुदुर्ग येथील २८ डंपर कह्यात !
|
मालवण – मालवण तालुक्यातील देवली सडा येथे महसूल विभागाच्या पथकाने १२ जानेवारी या दिवशी मध्यरात्री केलेल्या कारवाईत ८० ब्रास अवैध वाळू आणि वाळूची वाहतूक करण्यासाठी आलेले गोवा अन् सिंधुदुर्ग जिल्हा येथील एकूण २८ डंपर कह्यात घेतले. ही कारवाई चालू असतांना डंपरचे चालक पसार झाले. यासह तोंडवळी येथील कालावल खाडीपात्राच्या जवळ उभारण्यात आलेले २६ ‘रॅम्प’ महसूल विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केले. (रॅम्प बांधले जाईपर्यंत प्रशासन काय करत होते ? – संपादक) या कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.
तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाचे पथक दिसल्यानंतर काही चालकांनी ट्रकमधील वाळू रस्त्यावर ओतली. ज्या डंपरमध्ये वाळूचा साठा सापडला, ते डंपर मालवण तहसील कार्यालयात आणण्यात आले. उर्वरित डंपर आणि साठा केलेली वाळू यांचा पंचनामा करण्यात आला. ही कारवाई चालू असतांना डंपरमध्ये वाळू भरण्यासाठी आलेला जेसीबीचा चालक जेसीबीसह पळून गेला. पळून गेलेले डंपरचालक, तसेच जेसीबी यांची अन्य माहिती महसूल विभागाकडून घेण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकासिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळूउपसा, वाळूची अवैध वाहतूक आदी प्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी कायद्याचे कठोर पालन करणे आवश्यक ! |