श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत ३१ जानेवारीला कोल्हापूर येथे महासत्संग !
कोल्हापूर, १३ जानेवारी (वार्ता.) – जागतिक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी ३१ जानेवारीला कोल्हापुरात येत असून त्यांच्या उपस्थितीत महासत्संग आणि १ फेब्रुवारीला श्री महालक्ष्मी होम यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे विश्वस्त श्री. प्रदीप खानविलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी गीतांजली चिन्नन्नावर, डॉ. राजश्री भोसले-पाटील, डॉ. अनिमा दहिभाते, सचिन मुधाळे, डिंपल गजवणी, लीना बावडेकर उपस्थित होत्या.
१. तणावमुक्त आणि आनंदी समाजनिर्माण यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री श्री रविशंकरजी ३१ जानेवारीपासून महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. कोल्हापूरपासून त्यांचा दौरा प्रारंभ होणार आहे. यानंतर श्री श्री रविशंकरजी नांदेड, वाटूर, तुळजापूर आणि पुणे येथे जाणार आहेत. वाटूर येथे ते नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांना भेट देणार आहेत.
२. ३१ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता महासत्संग, संगीत, ज्ञानचर्चा आणि ध्यान होणार आहे. १ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता वैदिक पंडितांकडून महालक्ष्मी होम केला जाईल. हे दोन्ही कार्यक्रम गुरुदेवांच्या सान्निध्यात होणार आहेत. हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.
हे कार्यक्रम तपोवन मैदान, कळंबा रोड येथे आयोजित केले आहेत. या कार्यक्रमास ३ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी होतील. श्री महालक्ष्मी होमानंतर गुरुदेव १ फेब्रुवारीला करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार आहेत.
३. कोल्हापूर येथील स्वयंसेवकांनी वर्ष २०१९ आणि २०२१ च्या पुरात ग्रामीण आणि शहर येथील बाधित कुटुंबे आणि स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी अन्न, कपडे, पाणी, तसेच आवश्यक सामुग्रींसह साहाय्य पोचवण्याची व्यवस्था केली.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने लोकांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्रातील ३३ हून अधिक नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे, तर १०० पेक्षा अधिक जलकुंभ स्वच्छ केले आहेत.