घाटकोपर येथे १४ जानेवारीला होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त भव्य वाहनफेरी !
भगवे फेटे आणि भगव्या टोप्या यांमुळे परिसरात हिंदुत्वाचा जल्लोष
मुंबई, १३ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घाटकोपर (मुंबई) येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ १३ जानेवारी या दिवशी वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ५० हून अधिक वाहनचालकांनी वाहनफेरीत सहभाग घेतला. भटवाडी येथील श्री सिद्धी गणेश मंदिर येथे उद्योजक श्री. दीपक पंडित यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. धर्मनिष्ठ श्री. राजेश कारेकर यांनी श्रीफळ वाढवले. मंदिराचे पुजारी श्री. नयन जोशीगुरुजी यांनी या वेळी विधीवत् मंत्रपठण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्फूर्तीदायक घोषणांनी वाहनफेरीस आरंभ करण्यात आला.
ध्वनीक्षेपकावरून हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात येत होते. वाहनफेरीत सहभागी धर्मनिष्ठ हिंदूंनी आपापल्या वाहनांवर भगवे ध्वज बांधले होते. वाहनचालकांनी डोक्यावर बांधलेले भगवे फेटे आणि घातलेल्या भगव्या टोप्या यांमुळे परिसरात हिंदुत्वाचा जल्लोष दिसून येत होता. राष्ट्र-धर्मजागृतीपर घोषणांमुळे फेरीमार्गात नवचैतन्य निर्माण झाले.
सुवासिनी स्त्रियांनी ठिकठिकाणी धर्मध्वजाचे पूजन करून वाहनफेरीवर पुष्पवृष्टी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांची वेशभूषा केलेले बालसाधक वाहनफेरीचे आकर्षण केंद्र ठरले. अमृतनगर सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फेरीचा समारोप करण्यात आला.
या वाहनफेरीत हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक आणि सनातन संस्थेच्या मुंबई प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी या वेळी उपस्थितांना संबोधित केले.