श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस तैलाभिषेकाने प्रारंभ !
२ वर्षांनंतर यात्रेला भव्य स्वरूप प्राप्त
सोलापूर – येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या महायात्रेस १३ जानेवारीपासून प्रारंभ झाला. बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून पूजाविधी पूर्ण करून ७ मानाचे नंदीध्वज ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले होते. या वेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने पालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी हब्बूवाड्यात नंदीध्वजाची पूजा केली.
दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी नंदीध्वज सिद्धरामेश्वर मंदिरात पोचले. या वेळी मार्गामध्ये अनेक ठिकाणी नंदीध्वज आणि श्री सिद्धरामेश्वर यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. ६८ लिंगांना तैलाभिषेक करून रात्री विलंबाने नंदीध्वज हब्बूवाड्यात परत आले. मागील २ वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरवण्यावर निर्बंध होते; मात्र यंदा यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.