‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे अध्यक्ष सूरज ढोली यांचे निधन !
कोल्हापूर – ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे अध्यक्ष सूरज ढोली (वय ४१ वर्षे) यांचे १२ जानेवारीला हृदयविकाराने निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची परंपरा म्हणजेच शिवकालीन युद्धकला भारतातील मराठी बांधव, युवा पिढी यांना माहिती व्हावी, त्यांनी ती अवगत करावी, या उद्देशाने शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच कार्यरत होता. सूरज ढोली यांच्या पुढाकाराने दांडपट्टा, तलवारबाजी, भाला आदी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात येत असत.
ढोली यांना नरवीर तानाजी मालुसरे, ‘इंडिया गॉट टॅलेंट’ यांसह विविध पुरस्कार मिळाले होते. ‘गरुडझेप’ मोहिमेतील ते अग्रणीचे शिलेदार होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले होते. सूरज यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. हिंदु जनजागृती समिती, तसेच सनातनशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. वर्ष २०२२ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’त त्यांनी आणि त्यांच्या पथकाने प्रात्यक्षिके सादर केली होती.