श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे द्वार ८ दिवसांनंतर उघडले !
|
नाशिक – श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गेल्या ८ दिवसांपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद असलेले मंदिराचे प्रवेशद्वार १३ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता उघडण्यात आले. या वेळी विविध आखाड्यांचे साधूसंत, ग्रामस्थ आणि भाविक यांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करून आरती केली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
मंदिराच्या उत्तर दरवाजासमोर ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. साधूसंतांनी गर्भगृहात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. या निमित्ताने मंदिराच्या प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर आणि पिंडीच्या खळग्यातील अंगठ्याच्या आकाराच्या तिन्ही वालुकामय लिंगावर वज्रलेप करण्यात आला आहे. गर्भगृहास चांदीचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. मंदिराच्या सभामंडपात असलेल्या हर्षमहालाचे पुन्हा सौंदर्यीकरण आणि नूतनीकरण केले आहे. सभामंडपातील दर्शनरांगेसाठी बसवण्यात आलेली लोखंडी रेलिंग्ज काढून स्टेनलेस स्टीलची रेलिंग बसवण्यात आली आहेत. उर्वरित संवर्धन कामे लवकरच चालू होतील; मात्र त्यासाठी मंदिर बंद ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी माहिती विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली.