असामान्य कर्तृत्वाचे स्वामी विवेकानंद !
आज, १४ जानेवारी २०२३ स्वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
‘पौष कृष्ण ७ या तिथीला भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांची पूर्वपरंपरा आध्यात्मिक वैभवाने नटलेली आहे. विवेकानंद यांच्या कुळाचा इतिहासही उज्ज्वल असाच आहे. विवेकानंद यांचे आजोबा दुर्गाचरण दत्त यांनी ऐन वयात असतांनाच संन्यास घेऊन परमार्थ वृत्ती स्वीकारली होती. दुर्गाचरणांचे चिरंजीव विश्वनाथ मोठे विद्वान होते. त्यांची ज्ञानलालसा अतुलनीय अशीच होती. त्यांची पत्नी भुवनेश्वरीदेवी याही आदर्श आर्य स्त्री होत्या. त्यांच्या चेहर्यावर दिव्य शक्तींचे तेज ओसंडत असे. रामायण-महाभारतांतील कित्येक भाग भुवनेश्वरीदेवी यांनी मुखोद़्गत केले होते. अशा या उच्च मातापित्यांच्या पोटी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. नामकरणाच्या दिवशी अनेकांनी विवेकानंद यांचे नाव ‘दुर्गादास’ ठेवण्याविषयी सुचवले; परंतु भुवनेश्वरी यांच्या पसंतीने ‘वीरेश्वर’ हे नाव ठेवण्यात आले; पण पुढे नरेंद्र हेच नाव रूढ झाले.
भारतीय सहस्रो वर्षांच्या परंपरेप्रमाणे जगणार ! – स्वामी विवेकानंदभारतातील माणसे आपल्या निसर्गानुसार वाढतात. अभारतीय लोकांनी जी कृत्ये आणि वृत्ती भारतावर लादली, ती आमच्यासाठी नाहीत. परकियांना जे चांगले वाटले, ते भारतियांना जहर (विष) होऊ शकते. हा पहिला धडा आपल्याला आहे; पण इतर शास्त्रे, परंपरा यांच्या स्वतंत्र अशी एक प्रणाली आहे. आपले भारतीय, आपल्या प्रणाली, तसेच आपल्या मागे असलेली सहस्रो वर्षांची परंपरा भारतात आहे. त्याचप्रमाणे आपण वावरणार आणि तसेच आपण जगणार. (साभार : सामाजिक माध्यम) |
लहानपणी स्वामीजींचा स्वभाव हट्टी आणि खोडकर असला, तरी त्यांना साधुसंतांविषयी प्रेम होतेच. अलौकिक बुद्धीमत्ता, खेळाडूपणा, तेजस्विता या गुणांच्या साहाय्याने नरेंद्र यांचे शिक्षण झपाट्याने होऊ लागले. त्यांचा आवाज मधुर होता. बी.ए. ची परीक्षा दुसर्या दिवशी असतांना त्यांच्या हृदयांत अध्यात्मज्ञानाचा दिव्य आनंद निर्माण झाला. त्यांची वृत्ती अध्यात्म चिंतनात गुंगू लागली. यातूनच पुढे त्यांना ‘रामकृष्ण परमहंस’ हे गुरु भेटले. ‘रामकृष्णांचा सहवास, धर्मप्रचारासाठी हिंदुस्थानात भ्रमण, हिमालय आणि तिबेट येथील वास्तव्य, वर्ष १८९३ मध्ये जपानमार्गे अमेरिकेचा प्रवास, धर्मपरिषदेतील असामान्य कर्तृत्व, ‘राजयोग’ या ग्रंथाचे लेखन, रामकृष्ण मठाची स्थापना, वर्ष १८९९ मध्ये परत अमेरिकेस जाण्याची सिद्धता, शारीरिक आजार बळावल्याने सिलोनमधूनच परत हिंदुस्थानात आगमन आणि वर्ष १९०२ मध्ये समाधी अवस्था’, असा स्वामी विवेकानंद यांचा संक्षिप्त जीवनक्रम आहे.’
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन), लेखक – प्रल्हाद नरहर जोशी)