धर्मग्रंथद्वेष आणि वास्तव !
बांगलादेशातील ‘बांगलादेश गोनो राईट्स कौन्सिल’चा नेता आणि ‘जमात-ए-इस्लामी’चा प्रमुख नुरुल हक नूर याचा सहकारी तारिक रहमान यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हिंदु धर्मग्रंथांविषयी मुक्ताफळे उधळली. काय तर म्हणे, हिंदूंचे धर्मग्रंथ ‘अश्लील’ आहेत. ते कोणतेही नैतिक शिक्षण देत नाहीत. ‘हे बोलणे म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला’, असाच प्रकार होय ! ‘बांगलादेश गोनो राईट्स कौन्सिल’चे संयुक्त संयोजक आणि नुरुल हक नूर यांनीही रहमान यांची ‘री’ ओढत म्हटले, ‘‘आम्हाला हिंदूंविषयी पुष्कळ द्वेष आहे.’’ बांगलादेशात वर्ष २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना लक्ष्य करत अशा स्वरूपाची विधाने केली जात आहेत. तारिक रहमान यांचे वक्तव्य ऐकून किती हिंदूंचे रक्त सळसळले ? किती हिंदूंनी त्यांना विरोध केला ? किती जणांनी त्यांना ठामपणे खडसावले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील; कारण हिंदूंनाच त्यांच्या धर्मग्रंथांविषयी देणे-घेणे नसल्याने ‘कुणी काही का बोलेना, मला कुठे फरक पडतो ?’, अशीच संकुचित मानसिकता सर्वांची झाली आहे. हिंदूंच्या अशा स्थितीचा अपलाभ हिंदुद्वेष्टे घेतात आणि अत्यंत हीन दर्जाची विधाने करून हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेतात. खरे पहाता हिंदूंच्या केसालाही धक्का लावण्याचे कुणाचे धैर्य होऊ नये, अशी स्थिती निर्माण व्हायला हवी होती; पण खेदाची गोष्ट म्हणजे हिंदूंना न्यून लेखून अनेक ठिकाणी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार केले जातात. मग त्यांच्या धर्मग्रंथांना कोण विचारणार ? ख्रिस्ती, बौद्ध, मुसलमान, शीख आणि यहुदी यांच्या धर्मग्रंथांविषयी ‘ब्र’ काढण्याचे कुणाचेही धाडस होत नाही; कारण ते सर्वजण लगेचच आक्रमकपणे संघटित होतात आणि संपूर्ण देश हादरवून सोडतात; पण हिंदूंच्या संदर्भात तसे काहीच होत नाही. थोडक्यात सर्वधर्मसमभावाच्या दबावाखाली रहाणार्या हिंदूंनी ‘आ बैल मुझे मार’, अशीच स्वतःची गत करून घेतली आहे. तारिक रहमानने जे विधान केले, त्यानुसार ‘हिंदूंचे धर्मग्रंथ कोणते ?’, हाच प्रश्न अनेक हिंदूंना पडला असेल. इथपासूनच जर प्रारंभ झाला, तर त्या विरोधात आवाज उठवणे कदापि शक्य होणार नाही.
हिंदूंच्या धर्मग्रंथांना ‘अश्लीलते’चे लेबल लावणारे उद्या त्यांच्यावर बंदीची मागणी करण्यासही धजावतील. ही वेळ आपल्याला येऊ द्यायची नाही. तत्पूर्वीच आपण संघटित होऊन धर्मद्वेषी फुत्कार करणार्यांना खडसावले पाहिजे. हिंदूंनी कूपमंडूक वृत्ती न बाळगता धर्मरक्षणासाठी एक व्हायला हवे. भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार असणार्या देशांमध्येही हिंदू, हिंदु देवता आणि हिंदूंचे धर्मग्रंथ यांचा गौरव व्हायला हवा, यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय प्रत्येक हिंदूने करावा. तसे झाल्यासच तारिक यांच्यासारख्यांची बोलती आपोआप बंद होईल. एरव्ही अन्य धर्मियांच्या संदर्भात जरा कुठे खुट्ट झाले की, विरोधाचे अस्त्र उगारणारे तथाकथित निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी तारिक यांच्या विधानावर आता मूग गिळून गप्प का ?
अल्पसंख्यांकांची दयनीय स्थिती !
वर्ष २०२२ मध्ये बांगलादेशात १५४ अल्पसंख्यांकांच्या हत्या झाल्या. ‘बांगलादेश नॅशनल हिंदु ग्रँड अलायन्स’च्या मते अल्पसंख्यांक असणार्या ३९ महिलांवर बलात्कार झाला. (त्यांपैकी २७ महिला सामूहिक बलात्काराला बळी पडल्या.) पीडितांपैकी १४ जणांचा बलात्कारानंतर मृत्यू झाला. ४२४ अल्पसंख्यांकांनी जीव देण्याचा प्रयत्न केला होता, तर ८४९ जणांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. ९५३ जणांवर नियोजित आक्रमणे झाली, तर १२७ जणांचे अपहरण झाले. बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या ८.५ टक्के, तर मुसलमानांची ९० टक्के आहे. थोडक्यात काय, तर बहुतांश हिंदू अन्याय-अत्याचारांना मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. त्यांच्या या दुर्दशेकडे कोण लक्ष देणार ? त्यांना सुरक्षित जीवन कोण मिळवून देणार ? जेथे हिंदूंच्या धर्मग्रंथांविषयीच अश्लील विधाने केली जातात, तेथे हिंदूंना तरी वाली कोण ठरणार ?
धर्मग्रंथ अश्लील नसल्याचे पुरावे !
हिंदूंच्या धर्मग्रंथांना ‘अश्लील’ आणि निष्क्रीय समजू पहाणार्यांना त्यांचे सामर्थ्य ठाऊक नाही. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये ऋषिमुनींनी हिंदु धर्माची महती, वैशिष्ट्ये आणि आचारधर्माचे नियम यांचे विस्तृत विवेचन केले आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, दर्शने, स्मृति, ऋचा, रामायण, श्रीमद़्भगवद़्गीता, दासबोध हे हिंदूंचे प्रमुख धर्मग्रंथ आहेत. या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून ईश्वरप्राप्ती करणे, म्हणजे ज्ञानयोगाची साधना करण्यासारखेच आहे. महान हिंदु तत्त्वचिंतक पू. सीताराम गोयल हे साम्यवादी होते; परंतु त्यांनी ध्यानाद्वारे देवतांच्या अस्तित्वाची अनुभूती घेतली. ‘हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये साधू-संतांनी सांगितलेल्या शाश्वताची अनुभूती घेण्याची पद्धत सत्य आहे’, यावर त्यांची श्रद्धा दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. भारताचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ‘‘भगवद़्गीता आपल्याला नैतिकता शिकवते. सामाजिक कल्याणाच्या संदर्भात स्वतःचे दायित्व शिकवणारा हा ग्रंथ आहे. त्यातील अनेक नीतीकथा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील.’’ डॉ. महंमद हाफिज सैयद यांनी ‘भगवद़्गीता हा ग्रंथ संपूर्ण मानवजातीसाठी उपयुक्त आहे’, असे म्हटले आहे. ‘‘विश्वात जितके ग्रंथ आहेत, त्या सर्वांमध्ये भगवद़्गीतेसारखे सूक्ष्म आणि उन्नत विचार कुठेही मिळत नाहीत’’, असे विचार जर्मनीतील विचारवंत डॉ. विल्हेल्म फान हुंबोल्ट यांनी व्यक्त केले. साक्षात् ऋषिमुनीलिखित धर्मग्रंथ अश्लील कसे ठरतील ? या सर्व महनीय लोकांचे हे विचार म्हणजे हिंदूंच्या धर्मग्रंथांवर टीका करणार्यांसाठी चपराकच आहे. वर्ष २०२२ मधील गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लाख ५३ सहस्र १२४ व्या वर्षाचा आरंभ झाला. ही वर्षे मोजणेही एखाद्या विज्ञानवाद्याला अशक्यप्राय असेल. हिंदु संस्कृती इतकी प्राचीन असतांना हिंदूंचे धर्मग्रंथ अश्लील कसे ठरू शकतात ? वरील सर्व पुरावे तारिक यांचे विधान असत्य ठरवण्यास पुरेसे आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःची हिंदुद्वेषी खदखद वेळीच थांबवावी !
हिंदूंच्या धर्मग्रंथांना महान ठरवणार्या विचारवंतांचे विचार म्हणजे तारिक रहमान यांच्यासाठी चपराकच होय ! |