साधनेची तळमळ असणारी पुणे येथील युवा साधिका कु. विदिशा भालचंद्र जोशी (वय १८ वर्षे) !
(विदिशा (विद़् + ईशा) म्हणजे विद्येची देवता)
कु. विदिशा भालचंद्र जोशी हिचा उद्या पौष कृष्ण अष्टमी (१५.१.२०२३) या दिवशी १८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. विदिशा जोशी हिला १८व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. शांत स्वभाव
अ. ‘कु. विदिशा लहानपणी इतरांच्या घरी गेल्यावर शांत बसायची. तिला ‘इतरांच्या वस्तूंना हात लावू नये किंवा हट्ट अथवा दंगा करू नये’, हे कधी सांगावे लागले नाही. तिचे इतर मित्र-मैत्रिणी पुष्कळ दंगा करायचे. माझ्या मैत्रिणीही मला नेहमी म्हणत, ‘‘विदिशा तुला कधीच त्रास देत नाही.’’
आ. वर्ष २०११ मध्ये विदिशा ६ वर्षांची असतांना पुणे जिल्ह्यातील बालसाधकांसाठी असलेल्या शिबिरात सहभागी झाली होती. त्या वेळी शिबिर घेणार्या साधिकांनी ‘ती पुष्कळ शांत आहे. सगळ्यांचे ऐकते. हळू आवाजात बोलते’, असे तिचे गुण सांगितले होते.
२. समजूतदार
काही काळ आमची आर्थिक स्थिती चांगली नसतांना ती इतर मुलांप्रमाणे हट्ट करायची नाही. ही समज तिला लहान वयातच होती. एखादी गोष्ट समजावून सांगितल्यावर ती ऐकते.
३. एकपाठी
अ. कु. विदिशा अडीच वर्षांची असतांना आम्ही (मी आणि माझे यजमान) प्रतिदिन घरात श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणत असू. ते ऐकून तिचीही श्रीरामरक्षा पाठ झाली होती. लहानपणी श्लोक म्हणणे, भगवद़्गीतेचा अध्याय म्हणणे, अशा पाठांतर स्पर्धेत ती सहभागी होत असे. त्यात तिला पारितोषिकही मिळत असे.
आ. ती ६ व्या इयत्तेत असतांना एका पाठांतर स्पर्धेत तिने भगवद़्गीतेतील १५ वा अध्याय म्हणून दाखवला होता. त्या स्पर्धेत तिचा पुणे शहरात प्रथम क्रमांक आला होता. त्या वेळी पारितोषिक म्हणून मिळालेले ३ सहस्र रुपये तिने सनातन संस्थेला अर्पण केले होते.
४. धर्माचरणाची आवड
अ. विदिशा प्रत्येक सणाला रांगोळी काढते. तिला पारंपरिक वेशभूषा करायला आवडते. ती सणांच्या दिवशी आवडीने साडी नेसते. प्रत्येक सणाच्या वेळी ‘योग्य काय आहे ?’, हे जाणून घेण्याची तिची इच्छा असते.
आ. लहानपणी सनातन संस्थेच्या धर्मसभांमध्ये बालकक्षात ती आवडीने सहभागी होत असे.
इ. ती ‘भरतनाट्यम्’ शिकत आहे. ती नृत्याचा सराव मनापासून करते. श्रीकृष्ण, शिव आणि देवी यांच्या स्तुती असलेल्या रचनांवर आधारित नृत्य करतांना ती आनंदी असते. त्या वेळी तिच्या तोंडवळ्यावर भाव जाणवतो. एका कार्यक्रमात श्रीकृष्णावर आधारित नृत्य करतांना ती श्रीकृष्ण झाली होती. त्या वेळी तिची पुष्कळ भावजागृती झाली होती.
५. व्यष्टी साधनेचे प्रयत्न
अ. नामजप करणे, देवीकवच आणि बगलामुखी स्तोत्र म्हणणे, आवरण काढणे, स्वयंसूचना सत्र करणे इत्यादी व्यष्टी साधनेचे प्रयत्न ती करते. पूर्वी स्वभावदोष निर्मूलन सारणी लिखाण झाले नाही, तर तिच्याकडून ‘राहू दे. नंतर करू’, असे विचार होत असत. आता ती नियमित सारणी लिहिण्याचा प्रयत्न करते. ‘तिचे व्यष्टी साधना पूर्ण करण्याचे गांभीर्य वाढले आहे’, असे मला वाटते.
आ. सध्या ती बारावीत आहे. अभ्यास करतांना मध्येच भजनाची एखादी ओळ तिच्याकडून म्हटली जाते. यावरून असे वाटते की, तिची अंतर्मनातून साधना चालू असावी. तिला नामजप करायला पुष्कळ आवडतो.
६. साधनेची तळमळ
आम्ही दोघी एकमेकींना ‘सेवेची सूत्रे पूर्ण होत आहेत ना ? साधनेचा आढावा दिला जात आहे ना ?’, हे विचारत असतो. घरात कोणताही प्रसंग घडला, तर ‘साधनेच्या दृष्टीने काय योग्य आहे ?’, यावर आम्ही चर्चा करतो. तेव्हा ती वयाने लहान असूनही ‘योग्य दृष्टीकोन कसा असायला हवा ?’, हे सांगते. आपत्कालीन सूत्रांमध्ये लागवडीविषयी सर्व सूत्रे समजून घेतांना ‘साधना म्हणून काय करायला हवे ?’, या संदर्भात तिचा विचार चालू झाला आहे. तिचा प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा देण्याचा भाग वाढला आहे.
७. भाव
अ. नोव्हेंबर २०२१ मध्ये रामनाथी येथे झालेल्या युवा शिबिरात ती सहभागी झाली होती. तेथून आल्यापासून तिच्या मनात ‘साधना होऊन आपल्यामध्ये पालट झाला पाहिजे. आता वेळ वाया न घालवता आपण साधना करायला हवी’, असा विचार सतत असतो.
आ. संतांचा सत्संग मिळाला, त्यासाठी तिला पुष्कळ कृतज्ञता जाणवत आहे. ‘सत्संग आणि शिबिर यांतून पुष्कळ शिकायला मिळाले आहे ?’, याची तिला जाणीव झाली आहे. रामनाथी आश्रमातील चैतन्यदायी वातावरणाचे स्मरण होऊन तिच्या डोळ्यांत सतत भावाश्रू येतात.
८. अनुभूती
अ. युवा शिबिराच्या वेळी ती रामनाथी आश्रमात गेली होती. त्या वेळी शिबिरार्थींना एका संतांचा सत्संग मिळाला. त्याच दिवशी घरी पाच-सहा जास्वंदीची फुले फुलली होती. ती फुले पाहून ‘आज तिला एका संतांची भेट झाली असेल’, असे वाटून मला पुष्कळ आनंद झाला. ती रामनाथीहून आल्यापासून घरात आणि तिच्या हातावर दैवी कण दिसत आहेत.
आ. पूर्वी माझा (कु. विदिशाची आई) ३ घंटे नामजप होत नव्हता. ‘एवढा नामजप पूर्ण कसा होणार ? हा नामजप पूर्ण करण्यासाठी वेळेचे कसे नियोजन करायचे ?’, असे विचार मनात असायचे. विदिशा आश्रमात जाऊन आल्यानंतर ती सूत्रे सांगत असतांना तिच्यातील भावामुळे माझ्यामध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण झाले. आता माझ्यात नामजप पूर्ण करण्याची ओढ वाढली आहे. आता माझा ३ घंटे नामजप नियमित होत आहे आणि माझे साधनेचे प्रयत्न होऊ लागले आहेत.
९. कु. विदिशामध्ये जाणवलेले स्वभावदोष : राग येणे आणि आळशीपणा.’
– सौ. विनया जोशी (कु. विदिशाची आई), पुणे (१९.१.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |