श्रीक्षेत्र माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’साठी रंगीत विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !
परिपूर्ण सेवा केल्याने गुरूंचे मन जिंकता येते ! – सद़्गुरु सत्यवान कदम‘५.१२.२०२१ या दिवशी सद़्गुरु सत्यवान कदम यांनी माणगाव, जिल्हा सिंधुदुर्ग येथील साधकांना पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले. ‘प्रत्येक सेवा गुरुदेवांच्या चरणांजवळ जाण्यासाठी आहे. परिपूर्ण सेवा ईश्वरचरणी रुजू होते. त्यामुळे सेवा परिपूर्ण होण्यासाठी चांगले नियोजन करणे आवश्यक आहे. सर्व सेवा सूक्ष्मातून आधीच झालेल्या आहेत. जसे भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर युद्धाच्या संदर्भातील सर्व काही अगोदरच घडले असल्याचे अर्जुनाला दाखवून ‘तू केवळ निमित्तमात्र आहेस’, असे सांगितले, तसे आपल्या गुरुदेवांनी सर्व नियोजन आधीच केले आहे. आपण केवळ निमित्तमात्र आहोत. (प्रत्यक्षातही साधकांनी याचा अनुभव घेतला.) साधकांनी सातत्याने भगवंताच्या अनुसंधानात रहायला हवे. व्यष्टी साधना चांगली झाली की, समष्टी सेवाही चांगली होते आणि त्यातून आनंद मिळतो. गुरूंचे मन जिंकण्याची गोष्ट म्हणजे ‘सेवा !’ श्रीक्षेत्र माणगाव येथे दत्तगुरु, श्री यक्षिणीदेवी, तसेच प.प. टेंब्येस्वामी महाराज यांचेे चैतन्य पुष्कळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. साधकांनी ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करतांना सनातनच्या ग्रंथांमधील चैतन्याचा अनुभव घ्यायला हवा.’’ (२०.१२.२०२१) सद़्गुरु सत्यवान कदम ओळखीचे नसूनही त्यांच्यातील चैतन्य जाणवून मंदिरातील मूकबधिर सेवकाने त्यांना वंदन करणे‘साधकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी सद़्गुरु सत्यवान कदम यांनी माणगावची ग्रामदेवता श्री यक्षिणीदेवीला श्रीफळ ठेवले. नंतर त्यांनी दत्तमंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले. त्या मंदिरात एक मूकबधिर सेवक आहेत. ते सर्वांना तीर्थप्रसाद देत होते. ते स्थानिक साधकांच्या परिचयाचे असल्याने ‘ग्रंथप्रदर्शन कक्ष कसा आणि कुठे लावायला हवा ?’, याविषयी साधकांना हाताने खुणा करून सांगत होते. साधक त्याप्रमाणे करत असतांना तेथे सद़्गुरु सत्यवान कदम आले. त्या वेळी तीर्थप्रसाद देणारे ते सेवक उठून उभे राहिले आणि कक्षाच्या बाहेर येऊन त्यांनी सद़्गुरूंना वंदन केले. सद़्गुरु सत्यवान कदम ओळखीचे नसूनही त्यांच्यातील चैतन्य त्या मूकबधिर सेवेकर्यांना जाणवल्याचे पाहून आम्हा सर्व साधकांचा भाव जागृत झाला. गुरुदेवांनी आम्हाला असे महान सद़्गुरु दिले, याविषयी आमच्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’ – श्री. वामन परब, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग (२०.१२.२०२१) |
श्री सातेरीदेवी (पावशी) येथील जत्रोत्सवानिमित्त विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती‘आम्ही यावर्षी प्रथमच रंगीत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्री सातेरीदेवी (पावशी) येथील जत्रोत्सवाचा लेख आणि विज्ञापने प्रसिद्ध करण्याचे नियोजन केले. १. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रंगीत विज्ञापने मिळत असून तेच आमच्याकडून प्रयत्न करवून घेत आहेत’, असे जाणवणेएका जिज्ञासू उद्योजकांनी आम्हाला दैनिकासाठी विज्ञापन दिले. इतकेच नव्हे, तर त्यांनी स्वतःहून आम्हाला विज्ञापने देऊ शकणार्या व्यक्तींची नावे सांगितली. गावातील अन्य काही प्रतिष्ठित व्यक्तींनीही स्वतःहून आम्हाला विज्ञापने दिली आणि विज्ञापने देऊ शकणार्या व्यक्तींची नावे सांगितली. ‘ही विज्ञापने मिळवण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला सूक्ष्मातून विज्ञापनदात्यांची नावे सुचवत आहेत आणि तेच आमच्याकडून प्रयत्न करवून घेत आहेत’, असे आम्हाला जाणवत होते. २. विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना प्रत्येक साधकाला गुरुदेवांचा संकल्प आणि त्यांचे चैतन्य यांची अनुभूती येणेरंगीत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवाचा असा लेख प्रथमच प्रसिद्ध करत असूनही ‘साधकांची तळमळ, संघटित प्रयत्न, सकारात्मकता आणि गुरुदेवांचे आशीर्वाद’ यांमुळे अल्प कालावधीत आम्हाला अनेक विज्ञापने मिळाली. प्रत्येक साधक सेवेच्या कालावधीत गुरुदेवांचा संकल्प आणि चैतन्य यांची अनुभूती घेत होता. कोरोना महामारीचा काळ आणि अवेळी पडणारा पाऊस अशा प्रतिकूल वातावरणातही विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना आम्हाला पुष्कळ आनंद दिल्याविषयी परात्पर गुरुदेव आणि सद़्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ |
१. श्री. हेमंत पावसकर, माणगाव, ता. कुडाळ
१ अ. काही वयोवृद्ध साधक, तसेच आजारपणामुळे बाहेर पडणे अशक्य असलेले साधक यांनी विज्ञापने मिळवणे : ‘श्रीक्षेत्र माणगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) महाराज दत्तमंदिरात होणार्या दत्तजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला प्रतिवर्षी पुष्कळ प्रयत्न करून कृष्णधवल विज्ञापने मिळत असत. मी साधकांना सांगितले, ‘‘यावर्षी आपल्याला रंगीत अंक काढायचा आहे. त्यासाठी विज्ञापने मिळवण्यासाठी आपण सकारात्मक राहून प्रयत्न करूया.’’
काही साधकांनी यापूर्वी विज्ञापने मिळवण्याची सेवा कधीच केली नव्हती. साधकांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांना विज्ञापने मिळू लागली. तेव्हा साधकांच्या उत्साहात वाढ झाली. काही वयोवृद्ध साधकांनी, तसेच आजारपणामुळे बाहेर पडणे अशक्य असलेल्या साधकांनीही विज्ञापने मिळवली.
१ अ १. आजारपणामुळे अंथरुणावर असूनही समष्टी सेवा करवून घेण्यासाठी गुरुदेवांना तळमळीने प्रार्थना करून नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडून विज्ञापने मिळवणारे श्री. उदय कोरगावकर ! : श्री. उदय कोरगावकर मागील अनेक वर्षे आजारपणामुळे अंथरुणावर आहेत. ते चाकांच्या आसंदीवरून (‘व्हिलचेअर’वरून) घरात फिरतात. ते नियमितपणे व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात आणि त्याचा आढावाही देतात. त्यांना विज्ञापन मोहिमेविषयी समजल्यावर त्यांनी गुरुदेवांना ही समष्टी सेवा करवून घेण्यासाठी तळमळीने प्रार्थना केली. त्यांनी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांची नावे काढून त्यांना संपर्क केले. तेव्हा त्यांच्याकडून विज्ञापने मिळाली. यातून त्यांनीही गुरुदेवांची कृपा आणि समष्टी सेवेतील आनंद अनुभवला.
१ आ. विज्ञापने मिळवण्याची समयमर्यादा संपत आल्यावरही विज्ञापने मिळणे आणि ‘आपण केवळ निमित्तमात्र आहोत’, याची प्रचीती येणे : विज्ञापने मिळवण्याची समयमर्यादा संपत आल्यावरहीआम्हाला विज्ञापने मिळत होती. ही गुरुकृपा अनुभवत असतांना ‘आपण केवळ निमित्तमात्र आहोत’, याची आम्हाला प्रचीती आली.
गुरुदेवांनी आम्हा साधकांकडून सेवा करवून घेतली. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आम्हाला आपल्या चरणांशी ठेवून आमच्यावर असाच कृपेचा वर्षाव करावा’, अशी गुरुचरणी प्रार्थना !’
२. श्रीमती शुभांगी सावंत, माणगाव
२ अ. व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगाला नियमितपणे जोडल्यामुळे समष्टी सेवेची तळमळ वाढून विज्ञापने मिळवणे : ‘मला यापूर्वी विज्ञापने मिळवण्याचा अनुभव नव्हता; मात्र मी व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगाला नियमितपणे जोडल्यामुळे माझी समष्टी सेवेची तळमळ वाढत होती. ‘दत्तजयंतीनिमित्त विज्ञापने घेण्याचा उपक्रम (मोहीम) राबवायचा आहे’, हे समजल्यावर मी विज्ञापने मिळवण्याचे उद्दिष्ट ठरवले. मी प्रथमच समाजातील एका व्यक्तीला सनातनचे कार्य सांगून विज्ञापन मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला लगेचच विज्ञापन दिले. गुरुदेवांनी मला या सेवेतून आनंद दिला.
३. श्री. सदानंद पावसकर, माणगाव
३ अ. विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना ‘गुरुदेव सतत समवेत आहेत’, असे जाणवणे : ‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करत असतांना गुरुदेवच मला ‘विज्ञापन मिळवण्यासाठी कुणाकडे जायचे ?’, हे सुचवत होते. मी त्यांना प्रार्थना करून ‘गुरुदेव, आमच्या समवेत या’, असे सांगून जात होतो. त्यानंतर एखाद्या व्यक्तीकडे गेल्यावर ती पुष्कळ सकारात्मक राहून आम्हाला लगेच विज्ञापन द्यायची.’ अशा प्रकारे ‘गुरुदेव सतत माझ्या समवेत आहेत’, याची मला अनुभूती आली. गुरुदेवांनी मला या सेवेतून पुष्कळ आनंद दिला. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
४. श्री. दिगंबर काणेकर, कुडाळ
४ अ. पुतणीशी १२ वर्षांपासून असलेला दुरावा संपुष्टात येऊन तिच्याकडून विज्ञापन मिळणे : ‘मी वैयक्तिक मतभेदांमुळे माझ्या पुतणीशी गेली १२ वर्षे बोलत नव्हतो. विज्ञापने मिळवायचे ठरल्यावर मी नातेवाइकांच्या नावांची सूची करत असतांना गुरुदेवांच्या कृपेने मला पुतणीकडून विज्ञापन घ्यायचे सुचले. मी गुरुदेवांना प्रार्थना करून तिला भ्रमणभाष केला. तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला. आम्ही एकमेकांशी पुष्कळ वर्षांनी बोलल्यामुळे आमच्यातील मतभेद संपुष्टात आले. तिने मला विज्ञापन दिले. मला हे केवळ गुरुदेवांच्या कृपेने अनुभवता आले, त्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
५. श्री. सदानंद सावंत, कालेली, तालुका कुडाळ
५ अ. ‘श्री. आनंद साधले या विज्ञापनदात्यांनी ‘आम्ही तुमची वाट पहात आहोत’, असे सांगून मला विज्ञापन दिले आणि माझ्याकडून सनातन पंचांग मागून घेतले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २०.१२.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |