कर्करोगासारखी दुर्धर व्याधी झाली असतांना ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी (वय ५९ वर्षे) यांनीअनुभवलेली गुरुकृपा !
‘मला मागील ४ वर्षांपासून अधून-मधून पोट दुखण्याचा त्रास होत होता. त्या वेळी सर्व प्रकारच्या पडताळण्या करूनही योग्य निदान होत नव्हते. जानेवारी २०२१ मध्ये पुणे येथील नवले रुग्णालयात पडताळणी करतांना तेथील आधुनिक वैद्यांनी माझ्या पोटात कर्करोगाची गाठ असल्याचे सांगितले.
१. रुग्णाईत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे
त्या काळात माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना होत असे आणि ‘परम पूज्य’ असाच नामजप होत होता. मी सतत ‘ईश्वरेच्छेने सर्वकाही होऊ दे’, अशी प्रार्थना करत होतो.
२. शल्य विशारद गजानन वाघोलीकर परात्पर गुरु डॉक्टरांसारखेच दिसत असणे आणि त्यांच्या माध्यमातून ‘परात्पर गुरु डॉक्टरच शस्त्रकर्म करणार आहेत’, असे वाटून निश्चिंत होणे
माझी धाकटी मुलगी कु. श्वेताच्या माध्यमातून मला योग्य आधुनिक वैद्य भेटले. आधुनिक वैद्य (शल्य विशारद) गजानन वाघोलीकर परात्पर गुरु डॉक्टरांसारखेच दिसत असल्यामुळे ‘परात्पर गुरु डॉक्टरच माझे शस्त्रकर्म करणार आहेत’, असे मला वाटले आणि मी निश्चिंत झालो.
३. संत, सद़्गुरु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !
३ अ. मंत्रजप करतांना ‘परात्पर गुरु पांडे महाराज मंत्रजप करत आहेत’, असे जाणवणे आणि ऊर्जा मिळून मन स्थिर होणे : कर्करोगाचे निदान झाल्यानंतर कु. श्वेताने (धाकट्या मुलीने) देवद आश्रमातून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सिद्ध केलेले मंत्रोपाय मागवून घेतले. या मंत्रोपायांच्या वेळी ‘परात्पर गुरु पांडे महाराज समोर आहेत आणि तेच मंत्रजप करत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या मंत्रांच्या माध्यमातून मला प्रचंड ऊर्जा मिळून माझे मन स्थिर झाले.
३ आ. शस्त्रकर्माच्या ४ दिवस आधी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी भ्रमणभाष करणे आणि त्यांच्याकडून ऊर्जा मिळून सकारात्मकता वाढणे : शस्त्रकर्माच्या ४ दिवस आधी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी मला भ्रमणभाष केला. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरच मला आश्वस्त करत आहेत’, असे मला जाणवत होते. त्यांच्या बोलण्यातून मला ऊर्जा मिळून माझ्यातील सकारात्मकता वाढली.
३ इ. प्रारब्ध भोगून संपल्यावर उन्नती होणार असल्याचे सांगून सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आश्वस्त करणे : त्यानंतर २ दिवसांनी सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘हे अनेक जन्मांचे प्रारब्ध आहे. ते याच जन्मात भोगून संपणार आहे. हे एवढे भोगून संपल्यानंतर तुमची आध्यात्मिक उन्नती होऊन तुम्ही लवकर पुढे जाल.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनात विचार आला, ‘सद़्गुरूंनी सांगितल्यानुसार होणार आहे. तो त्यांचा संकल्पच झाला आहे.’
३ ई. मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर, सद़्गुरु राजेंद्रदादा, पू. (सौ.) अश्विनीताई आणि अन्य संत या सगळ्यांनी धीर दिल्याने सकारात्मक ऊर्जा मिळाली अन् मन स्थिर झाले.
३ उ. भावसत्संगात सांगितलेल्या दृष्टीकोनामुळे ‘प्रारब्धभोग भोगण्यास देव शक्ती देणार आहे’, असे वाटणे : माझ्या शस्त्रकर्माच्या काळात झालेल्या भावसत्संगात ‘भगवान श्री जगन्नाथाने भक्ताला प्रारब्ध भोगायला कसे साहाय्य केले ?’, हा विषय श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितला. तेव्हा ‘देव मलाही शक्ती देऊन माझेे प्रारब्ध सुसह्य करणार आहे’, असे मला वाटले.
३ ऊ. एवढे मोठे शस्त्रकर्म होऊनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने कोणताही त्रास न होणे : माझे शस्त्रकर्म ११.३० घंटे चालू होते. त्या वेळी माझ्या शरिरातील पूर्ण स्वादुपिंड आणि पित्ताशय, लहान आतडे अन् यकृत यांचा काही भाग काढावा लागला. शस्त्रकर्म संपल्यानंतर ‘गाढ झोपेतून जागा झालो आहे’, असे मला वाटले. माझे एवढे मोठे शस्त्रकर्म होऊनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला कोणताही त्रास झाला नाही. माझे पाय थोडे दुखत होते; परंतु मला पोटाचा काही त्रास झाला नाही. गुरुदेवांनी माझ्यावर केवढी मोठी कृपा केली ! जणूकाही ‘माझा पुनर्जन्मच झाला आहे’, असे मला वाटले.
३ ए. कुटुंबीय स्थिर असणे : आमच्या घरातील सर्व जण साधक असल्याने सगळे स्थिर होते. हीसुद्धा गुरुकृपाच म्हणावी लागेल. गुरुदेवांनी आम्हा सर्व कुटुंबियांना स्थिर ठेवून आमच्याकडून साधना आणि सेवा करवून घेतली.
४. कृतज्ञता
ज्या रुग्णालयात शस्त्रकर्म झाले, तेथील मुख्य आधुनिक वैद्य गजानन वाघोलीकर यांनी आमच्याकडून शस्त्रकर्मासाठी अल्प रक्कम घेऊन आम्हाला साहाय्य केले. ‘ही सर्व गुरुकृपाच आहे’, असे मला वाटले. त्याबद्दल कृतज्ञता ! महान श्री गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांनी, म्हणजेच प्रत्यक्ष श्रीमहाविष्णूने आम्हाला एवढ्या मोठ्या प्रसंगातून अलगदपणे बाहेर काढले आणि मला जीवनदान दिले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.९.२०२१)
श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांच्या आजारपणात त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती१. सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी(श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांची पत्नी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५४ वर्षे)१ अ. गणपति मंदिरात बसून यजमानांसाठी नामजप करत असतांना ‘नामजप यजमानांपर्यंत पोचत असेल का ?’, असा विचार येणे आणि त्याच क्षणी यजमानांच्या हृदयात सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांच्या चरणपादुका दिसणे : ‘माझे यजमान श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांना त्यांच्या शस्त्रकर्माच्या दिवशी छातीवर दाब जाणवत होता. तेव्हा माझी मुलगी कु. श्वेता हिने सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजप विचारून तो नामजप मला करायला सांगितला. मी रुग्णालयाच्या आवारातील गणपति मंदिरात बसून नामजप करत होते. त्या वेळी ‘मी करत असलेला नामजप यजमानांपर्यंत पोचत असेल का ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्याच क्षणी मला यजमानांच्या हृदयात सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांच्या चरणपादुका दिसल्या. तेव्हा माझ्या मनातील शंका दूर होऊन ‘परात्पर गुरुमाऊली यजमानांच्या समवेत आहे’, असे मला वाटले. मला परात्पर गुरुदेवांचे चैतन्य मिळून हलकेपणा जाणवला. ‘परात्पर गुरुमाऊली आमच्यासाठी किती करत आहे !’, असे वाटून माझा भाव जागृत होऊन मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.’ २. सौ. शैलजा (कलावती) कट्टी (श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांची मोठी मुलगी), पलूस, सांगली.२ अ. वडिलांच्या आजारपणात भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न १. ‘एकदा बाबांच्या एका तपासणीसाठी मी त्यांच्या समवेत रुग्णालयात गेले होते. तेव्हा मी ‘रामनाथी आश्रमात जात आहे’, असा भाव ठेवला. तेव्हा मला रुग्णालयात चैतन्य जाणवत होते. २. आम्ही रुग्णालयात जातांना ‘बाबा परात्पर गुरुदेवांना भेटायला जाणार आहेत आणि गुरुदेवच त्यांना तपासणार आहेत’, असा माझा भाव होता. ३. बाबांना रुग्णालयात भरती केल्यावर ‘सतत भावप्रयोग करणे आणि नामजप करणे’, असे प्रयत्न देवानेच माझ्याकडून करवून घेतले. ‘देवच शिकवत आहे आणि देवच करवून घेत आहे’, असे मला वाटत होते. ४. बाबांच्या शस्त्रकर्माच्या दिवशी माझ्याकडून सतत नामजप आणि प्रार्थना होत होत्या. ‘परात्पर गुरु डॉक्टर इतरांच्या साहाय्याने शस्त्रकर्म करत आहेत. परात्पर गुरु पांडे महाराज शस्त्रकर्म होत असलेल्या ठिकाणी मंत्रपठण करत आहेत’, असे मला जाणवत होते.’ (या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (१०.९.२०२१)) |
|