संकटग्रस्त महिलांच्या साहाय्यासाठीचा ‘१८१’ हेल्पलाईन क्रमांक स्वतंत्रपणे कार्यरत होणार !
मुंबई, १२ जानेवारी (वार्ता.) – संकटग्रस्त, पीडित महिलांना तातडीने साहाय्य देण्यासाठी कार्यरत असलेला ‘१८१’ ‘टोल फ्री’ क्रमांक आतापर्यंत मुख्यमंत्री हेल्पलाईन क्रमांकामध्ये विलीन होता. यापुढे मात्र हा ‘टोल फ्री’ क्रमांक महिला आणि बाल विकास आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे कार्यरत होणार आहे. यामुळे प्रत्येक मासाला किती संकटग्रस्त महिला साहाय्यासाठी संपर्क करतात ? याचे राज्याचे आकडे उपलब्ध होणे सुलभ होणार आहे.
१. ‘१८१’ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर पोलीस, अग्नीशमनदल, रुग्णवाहिका आदी आपत्कालीन सेवा उपलब्ध होणार आहेत. हा क्रमांक २४ घंटे कार्यरत रहाणार आहे. शासकीय योजना, कार्यक्रम आदींविषयी माहिती, तसेच हुंडा प्रतिबंधक अधिकारी, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, संरक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क करण्यास या क्रमांकावरून साहाय्य देण्यात येणार आहे.
२. मानसिक समुपदेशन, कायदेशीर साहाय्य यांसाठीही संबंधितांची संपर्क करून देण्यासाठीही या क्रमांकावरून साहाय्य देण्यात येणार आहे. ज्या महिलांना कोणत्या परिस्थितीमुळे किंवा शारीरिक आव्हानांमुळे दूरभाषवर बोलता येणे शक्य नाही, त्यांना या क्रमांकावर संदेश पाठवण्याचीही सुविधा असणार आहे. हा हेल्पलाईन क्रमांक चालवण्यासाठी एकूण २६ पदांना मान्यता देण्यात आली आहे.