पिंपरी (पुणे) येथील २ अनुदानित शाळांमध्ये अवघे ३-४ विद्यार्थी !
बोगस पटसंख्या दाखवून १०० टक्के अनुदान लाटत असल्याचा प्रकार उघडकीस
पिंपरी (पुणे) – शहरातील ‘ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालय, किवळे’ आणि ‘कमला नेहरू प्राथमिक विद्यालय, चिंचवड स्टेशन’ या खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये अवघी ३-४ विद्यार्थी संख्या आहे; मात्र प्रतिवर्षी बोगस पटसंख्या दाखवून शासनाकडून मिळालेले अनुदान घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरात महापालिका, खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील पट गळतीची नेमकी कारणे शोधणे, त्यावर उपाययोजना करणे यांसाठी २० पटसंख्येच्या खालील शाळा शोधण्याचे काम चालू केले आहे. त्याअंतर्गत हा प्रकार समोर आला. (बोगस पटसंख्या दाखवून सरकारचे अनुदान लाटणार्या संबंधितांकडून सर्व पैसे वसूल करून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. – संपादक)
या दोन्हीं शाळांना इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग मान्यता आहे. चिंचवड स्थानकाच्या शाळेतील वर्गखोल्या पडक्या आणि गळक्या स्थितीत आहेत. त्यामध्ये शाळा भरते. अनुमाने १० पटसंख्या बोगस दाखवली जात आहे. सध्या ५ विद्यार्थी पटावर आहेत. त्यापैकी २-३ नेहमीच अनुपस्थित असतात. तरीही एक मुख्याध्यापिका आणि ४ शिक्षक आहेत, तर किवळेची शाळा पत्र्याच्या २ छोट्या खोल्यांत असून त्यातच इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग भरतात. पहाणी केलेल्या दिवशी नेहरू विद्यालयामध्ये दुसरी, पाचवी आणि सातवीच्या वर्गात एक-एकच विद्यार्थी बसलेला होता, तर तिसरी आणि चौथीचा वर्ग भरलाच नाही. हीच स्थिती किवळे येथील ‘ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालया’ची आहे.
शिक्षण विभागाचे अधिकारी संजय नाईक म्हणाले की, या दोन्ही शाळांची पहाणी करून चौकशी करण्यात येईल. त्याचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवण्यात येईल, तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इतर शाळांमध्ये करण्यात येईल.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांच्या संख्येवरून करण्यात येणारा भ्रष्टाचार म्हणजे शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होय ! |