वाय.सी.एम्. रुग्णालयातील ‘ओ.सी.टी.’ यंत्र खरेदीची चौकशी करावी ! – आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस
पिंपरी (पुणे) – महापालिकेच्या ‘यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालया’त (वाय.सी.एम्.) रुग्णांचे डोळे पडताळण्यासाठी भांडार विभागाने ‘ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी’ (ओ.सी.टी.) यंत्राची खरेदी करतांना घोटाळा झाला. या घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. यंत्र खरेदी करतांना भांडार उपायुक्त, वैद्यकीय अधिष्ठाता, बायोमेडिकल अभियंता यांनी ठेकेदाराशी केलेल्या वाटाघाटीमुळे ‘ओ.सी.टी.’ यंत्र खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली होती.
त्याप्रमाणेच ‘ओ.सी.टी.’ यंत्राच्या खरेदीत महापालिकेने दिलेले ‘स्पेसिफिकेशन’ (यंत्राची तांत्रिक माहिती) आणि ठेकेदाराचे ‘स्पेसिफिकेशन’ यांमध्ये पुष्कळ तफावत आहे. असे असतांनाही आयुक्त शेखर सिंह हे संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. त्यामुळे ‘स्पेसिफिकेशन’ पालटल्याने एका ठेकेदाराचा पुरवठा आदेश रहित केला; मात्र त्यानुसार ओ.सी.टी. यंत्र खरेदीत ‘स्पेसिफिकेशन’ पालटले असतांना पुरवठा आदेश रहित करण्यास आयुक्त नकार देत आहेत. असाही आरोप बनसोडे यांनी केला आहे.