पंचतत्त्वांशी संबंधित सिद्धांत संतांच्‍या बाबतीत लागू न पडणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात’, हा सिद्धांत सर्वसाधारण वस्‍तू आणि व्‍यक्‍ती यांच्‍या संदर्भात लागू पडतो, संतांच्‍या बाबतीत नाही ! याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

शब्‍द : सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या संदर्भात तिचे गायन एका विशिष्‍ट काळापेक्षा अधिक वेळ ऐकल्‍यास कंटाळा येतो; मात्र संतांनी स्‍वतः गायलेली पदे ऐकतांना त्‍यांचे गायन कानांना सुमधुर वाटते आणि पुष्‍कळ काळ ती पदे ऐकता येतात, उदा. प.पू. भक्‍तराज महाराज यांनी गायलेली भजने.

स्‍पर्श : सर्वसाधारण वयस्‍कर व्‍यक्‍तीची त्‍वचा रखरखीत जाणवते; मात्र वयस्‍कर संतांच्‍या त्‍वचेला स्‍पर्श केल्‍यास तिचा स्‍पर्श मऊ असतो, उदा. सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु (सौ.) सखदेव आजी यांच्‍या त्‍वचेचा स्‍पर्श अगदी मऊ असायचा.

रूप : सर्वसाधारण व्‍यक्‍तीचे हस्‍ताक्षर किंवा चेहरा, म्‍हणजे रूप वाईट असले, तर त्‍यातून वाईट स्‍पंदने जाणवतात; मात्र संतांचे हस्‍ताक्षर किंवा चेहरा वाईट असला, तरी त्‍यातून चांगली स्‍पंदने जाणवतात.

रस :  सर्वसाधारण व्‍यक्‍तीच्‍या घरी शिजवल्‍या जाणार्‍या अन्‍नाची चव सर्वांनाच आवडते असे नाही; मात्र संतांच्‍या आश्रमातील महाप्रसाद किंवा संत करत असलेल्‍या भंडार्‍याच्‍या वेळी केला जाणारा महाप्रसाद सर्वांनाच रूचकर लागतो.

गंध : सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीच्‍या शरिराला दुर्गंध येतो. तो जाण्‍यासाठी तिला सुगंधी द्रव्‍यांचा वापर करावा लागतो; मात्र संंतांच्‍या शरिराला सतत दैवी गंध येत असतो, उदा. प.पू. भक्‍तराज महाराज यांची अंघोळ होण्‍यापूर्वीही त्‍यांच्‍या शरिराला नेहमी दैवी गंध येत असे.’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले (१६.४.२०१६)