बिहारमधील रावणराज !
बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी नालंदा विश्वविद्यालयाच्या १५ व्या दीक्षांत समारंभात बोलतांना ‘मनुस्मृति, गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरितमानस आणि आताच्या काळातील ‘बंच ऑफ थॉट्स’ ही पुस्तके देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करतात’, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. या वक्तव्याला अनेक संत, महंत यांनी विरोध केला असून अयोध्या येथील जगद़्गुरु परमहंस आचार्य यांनी चंद्रशेखर यांचे त्वरित त्यागपत्र मागितले आहे. ‘मनुस्मृति’ आणि ‘श्रीरामचरितमानस’ हे हिंदूंचे धर्मग्रंथ, तर ‘बंच ऑफ थॉट्स’ हे पू. गोळवलकरगुरुजी यांनी लिहिलेले पुस्तक ! यावरून चंद्रशेखर यांना हिंदूंच्या श्रद्धेय ग्रंथांमुळे पोटशूळ उठला आहे, हे वेगळे सांगायला नको. भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यामुळे चंद्रशेखर काहीही बरळू शकतात. ‘एखाद्या इस्लामी देशात इस्लामी धर्मग्रंथांविषयी बोलण्याचे दुःसाहस तेथील मंत्र्याने केले असते, तर काय झाले असते ?’, याचा विचारही आपण करू शकत नाही. भारताच्या कणाकणांत श्रीराम आहे, किंबहुना भारताच्या आत्म्यात ‘श्रीराम’ आहे. ‘आदर्श जीवन कसे जगायचे ?’, ‘प्रत्येक नाते कसे जपायचे ?’, याचा आदर्श त्याने हिंदूंना घालून दिला आहे. त्याही पुढे जाऊन जेव्हा एखाद्या राजासमोर ‘कुटुंबहित कि जनहित ?’, असा पर्याय असेल, तेव्हा राजाने ‘जनहित हेच सर्वस्व मानले पाहिजे’, असा आदर्श वस्तूपाठ समष्टी जीवन जगणार्यांना घालून दिला. या जनहितापायीच श्रीराम सीतामातेचा त्याग करू शकला. त्यामुळे पुढील अनेक युगे जेव्हा ‘आदर्श राजा’ किंवा ‘आदर्श राज्य’ यांविषयी चर्चा होईल, तेव्हा रामराज्यच समोर येईल.
अशा श्रीरामाचे वर्णन असणार्या ‘श्रीरामचरितमानस’ला ‘समाजात फूट पाडणारे’ म्हणणारे शिक्षणमंत्री बिहारला लाभणे यापेक्षा दुर्दैव ते काय ? चंद्रशेखर यांच्याआधी राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी काही दिवसांपूर्वी ‘द्वेषाच्या भूमीवर श्रीराममंदिराची निर्मिती होत आहे. उन्माद करणारे रामाला बंदी बनवतील’, असे वक्तव्य केले होते. भारत हा देश श्रद्धाळू आणि धार्मिक लोकांचा देश असून कोट्यवधी सामान्य हिंदूंच्या श्रद्धांना जाणीवपूर्वक डिवचण्याचे काम राष्ट्रीय जनता दलाचे नेते करत आहेत. प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांंसारख्यांना जर तुम्ही आदर्श मानत नाही, त्यांची भूमी तुम्हाला आदर्श वाटत नाही, तर ‘अशांचे आदर्श कोण ?’, हाही प्रश्न या निमित्ताने समोर येतो. हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांच्यावर टीका केल्याने स्वस्तात प्रसिद्धी मिळते. त्यामुळे अशा प्रकारचे वाचाळवीर ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, याप्रमाणे वक्तव्य करतात. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुणी हिंदूंचे आदर्श पुरुष आणि ग्रंथ यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका करणार असतील, तर केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, म्हणजे परत कुणी अशी वक्तव्ये करण्याचे धाडस करणार नाही.
श्रीरामाचे वर्णन असणार्या ‘श्रीरामचरितमानस’संदर्भात अयोग्य वक्तव्य करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाईच आवश्यक ! |